‘पक्ष संपणार नाही’ असं कार्यकर्ते म्हणतायेत पण महाराष्ट्राचा इतिहास वेगळंच सांगतो….

शिवसेना संपणार काय? राजकारण झालं, राजकारण होईल.. पण पक्ष संपणार नाही अस कार्यकर्ते म्हणत राहतात..पण पक्ष संपतात.. कार्यकर्ते संपतात..नेतृत्त्व संपतं..महाराष्ट्राचा इतिहास तर तेच सांगतो..

1962 साली महाराष्ट्र राज्याच्या निवडणूका झाल्या..ही निवडणूक म्हणजे आपल्या राज्याची पहिली निवडणूक. या निवडणूकीच्या निकालानंतर सर्वात मोठ्ठा पक्ष होता तो, कॉंग्रेस. 264 सदस्य असणाऱ्या या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे 215 सदस्य निवडून आले होते. त्यानंतरचा क्रमांक होता तो शेतकरी कामगार पक्षाचा,अर्थात शेकापचा. शेकापचे या निवडणूकीत 15 सदस्य निवडून आले होते, आणि शेकाप प्रमुख विरोधी पक्ष ठरला होता…

स्थळ होतं पुण्यातील शिवाजीनगरमधील स्वस्तिक बंगला. ११ सप्टेंबर १९४६ चा दिवस होता. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब राऊत, पी. के. सावंत, दत्ता देशमुख, रा. म. नलावडे, रा. ना. शिंदे, सु. त. मोरे, तुळशीदार जाधव, व्यंकटराव पवार एका बैठकीस हजर होते.

तिथंच बैठकांती ठरलं की काँग्रेसच्या अंतर्गत आपला गट स्थापन करायचा. त्याचे नाव ठरले -‘शेतकरी कामगार संघ’

काँग्रेसमध्ये असताना शेतकरी, कामगार आणि समजतील इतर वंचित घटकांसाठी काम करणे आणि काँग्रेसची धोरणं डाव्या विचाराकडे झुकती ठेवणे हे गटाचं उद्दिष्ट होतं. मात्र या सर्व सदस्यांना आपण यात यशस्वी होत आहोत असं काय वाटत नव्हतं. मग स्वातंत्र्यानंतर शेतकरी कामगार संघातील काही नेत्यांनी काँग्रेसविरोधात आपला एक वेगळा पक्ष काढण्याचा निर्णय घ्यायचं ठरवलं. याला यशवंतराव चव्हाणांचा विरोध होता. 

तरीही शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली इतर नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

 या वेळी शेतकरी कामगार पक्षात तीन वेगवेगळे घटक सामील झाले होते. पक्षाचा गाभा असणारा घटक म्हणजे जुन्या ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातून आलेला मध्यम शेतकरी जातीतील मराठा समाजातील कार्यकर्ता होता. तो बऱ्याच वेळ पक्षासोबत कायम राहिला दुसरा घटक काँग्रेस पक्षातून आलेल्या नाराज कार्यकर्त्यांचा होता.

तिसरा घटक असंतुष्ट कम्युनिस्टांचा गट होता. सुरुवातीस शेकापला लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाना पाटील, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव या नेत्यांच्या सभा गर्दी खेचत होत्या. त्या काळात मुंबई राज्य होते. ते मोठे त्रीभाषिक राज्य होते. १९५२ च्या निवडणुकीत शेकापला १३ जागा मिळाल्या. त्याचबरोबर मराठवाडय़ात ११ व विदर्भात २ जागा मिळाल्या. अशा तिन्ही राज्यांत मिळून २६ जागा मिळाल्या. 

काँग्रेसनंतर शेकाप दुसऱ्या क्रमांकाला होता. 

मात्र त्यानंतर शॆकपाला पक्ष फुटीचा पहिला धक्का बसला. मोरे, जेधे, जाधव काँग्रेसमध्ये परत गेले. नव्या शेकापला तसा हा धक्का होता. तरीही पक्षाचे कार्यकर्ते पक्षाला चिटकून होते. 

संस्थापकांच्या पक्षत्यागानंतर शेकापला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संजीवनी देणारी ठरली.

या लढय़ासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची फौज पक्षाने तयार केली. या लढय़ात जास्तीत जास्त कार्यकर्ते शेकापने उतरवले होते. १९५७ च्या निवडणुकीत शेकापला त्याचा फायदा झाला. या निवडणुका समितीच्या झेंडय़ाखाली लढवण्यात आल्या. त्यात पक्षाने एकूण २७ जागा जिंकल्या. त्यानंतर १९६२ च्या निवडणुकीत पक्षाचे विधानसभेत १५ सदस्य निवडून गेले होते. 

१९६० नंतर मात्र पक्षाला कोणता नवीन अजेंडा देता आला नाही.

जरी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असल्याचा दावा शेकाप करत असला तरी पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसचं नेतृत्व मान्य केलं होतं. त्यामुळे वेळोवेळी पक्षाचे नेते काँग्रेसमध्ये जात राहिले. काँग्रेसमधून सत्तेनजीक जाता येते आणि त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावता येतात अशी मोघम कारणं देउन शेकापचे नेते यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये येतंच राहिले.

काळानुरूप बेरजेच्या राजकारणात अपयश, फुटीरतावाद आणि मिळालेले यश टिकवून ठेवण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी किंवा प्रभावी नेतृत्त्वाचा पक्षप्रवेश या बाबी शेकापला स्वीकारता आल्याच नाहीत. तरीही पक्ष पूर्ण संपला असं म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. 

१९६२- ७८ या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधीपक्ष नेता शेकापचा होता. कृष्णराव धुळप यांनी दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपद भूषविले. याशिवाय दि. बा. पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील यांनाही हे पद भूषविण्याची संधी मिळाली. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये शेकापचे गणपतराव देशमुख यांनी रोजगार हमी खात्याचे मंत्रिपद भूषविले होते. १९७७ मध्ये या पक्षाने जनता पार्टीशी युती केली होती. त्या वेळी त्यांचे सहा खासदार निवडून आले होते.

१९९९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये शेकाप सहभागी झाला. गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. 

अस सांगितलं जातं की शेकापचा पाठींबा इतका महत्वाचा होता की गणपतराव देशमुख यांनाच मुख्यमंत्री करावं अशी चर्चा देखील त्या काळात झाली होती. 

पण शेकापला आता पहिल्यासारखा बेस राहिला नव्हता.

यशवंतरावच्या काळापासून मागे लागेलेला पक्षफुटीचा फेरा शेकापच्या मागे चालूच  राहिला. कोल्हापूरचे त्र्यं. सी. कारखानीस यांना दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये नेले. कृष्णराव धुळप हे भाजपमध्ये गेले. रायगडमध्ये शेकापचे बळ टिकवून ठेवणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर २००४ मध्ये काँग्रेसमध्ये गेले.

पक्षाशी एकनिष्ठा पक्षाशी एकनिष्ठा बाळगून काम करणारे या पक्षाचे काही नेते शेवटपर्यंत पक्षाबरोबर राहिले.

त्यामध्ये अलिबागचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, परभणीचे अण्णासाहेब गव्हाणे, वाळवा-इस्लामपूरचे एन. डी. पाटील आणि सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांचा समावेश होतो. मात्र यामुळे शेकाप काही पॉकेट्स मध्येच म्हणजे रायगड, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मराठवाड्यातील काही पॉकेट्स अशी नावापुरतीच राहिली.

२०१९ ची विधानसभेतील शेकापची कामगिरी पक्षाची सर्वात सुमार कामगिरी होती. 

रायगड जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोल्याचे जागा देखील पक्षाच्या हातातून गेली. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून शामसुंदर शिंदे हे एकमेव शेकापचे उमेदवार निवडून आले. निवृत्त सनदी अधिकारी शिंदे हे भाजपमध्ये होते. परंतु युतीत लोहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिंदे यांनी अंतिम टप्प्यात शेकापची उमेदवारी मिळविली. शिंदे यांच्या विजयात शेकापपेक्षा स्वत:ची ताकद महत्त्वाची ठरली.

कधीकाळी विरोधी पक्षनेता भूषवलेला पक्ष, कधीकाळी महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष, तर कधीकाळी मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आलेला पक्ष आत्ता मात्र राज्याच्या राजकारणातून हद्दपार झाल्यात जमा आहे..

दूसरा पक्ष आहे जनता पार्टी.. 

मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते, मृणाल गोरे, किसनराव बानखेले, गप प्रधान, एस एम जोशी एकापेक्षा एक नेते असणारा हा पक्ष. कधीकाळी महाराष्ट्रात सर्वाधिक पक्ष निवडून आलेला पक्ष पण हा पक्ष देखील लोकांच्या विस्मृतीत गेला.. १९७७ च्या २३ जानेवारीला जनता पक्षाची स्थापना झाली.

संघटना काँग्रेस, भारतीय क्रांतिदल, भारतीय जनसंघ व समाजवादी पक्ष हे चार पक्ष विलीन करून  निवडणुकीत एका प्रबळ विरोधी पक्षाची स्थापना करण्यात आली. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे इंदिरा काँग्रेस ला पर्याय उभा करण्यासाठी परस्परविरोधी विचारप्रणाली असलेले हे पक्ष एकत्र आले होते. आणि १९७७ च्या  लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत पराभव करून जनता पक्षाने इंदिरा काँगेसचा दणदणीत पराभव केला.

महाराष्ट्रातही जनता लाटेचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते.

त्यामुळे १९७८ च्या निवडणुकीत जनता पक्षाने ९९ जागा जिंकल्या. चव्हाण-रेड्डी काँग्रेसला ६९ आणि इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. पण महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यामुळं पहिल्याच निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा जिंकूनही जनता पक्षाला विरोधात बसावं लागलं. 

मात्र वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून जेव्हा शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला आणि जनता पार्टी सत्तेत आली. 

मात्र ही सत्ता जनता पार्टीला काय मानवली नाही. पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती. १९८० मध्ये जनता पक्षाची वाताहत होऊन पार्टीला महाराष्ट्रात फक्त १७ जागा मिळाल्या.

 पक्षाचे नेते बबनराव ढाकणे हे विरोधीपक्ष नेता झाले. मधू दंडवते,बापूसाहेब काळदाते, मृणाल गोरे, किसनराव बानखेले, शरद पाटील, निहाल अहमद, संभाजी पवार, बबनराव ढाकणे, व्यंकटराव पत्की अशा दिग्गज नेते मंडळींनी जनता पक्षाची पडझड रोखून धरली होती.

१९८९ येईपर्यंत पुन्हा काँग्रेसला पक्का पर्याय देण्यासाठी अनेक लहान मोठे पक्ष एकत्र आले होते आणि त्यावेळी जनता पक्षाचं विसर्जन करून चंद्रशेखरांच्या नेतृत्वाखाली १९८९ ला जनता दलाची स्थापना झाली. 

मग जनता पक्षाचा जनता दल झाल्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व मृणाल गोरे यांच्या हातात गेलं.

 १९९० साली मंडल आयोगाची अंमलबाजवणी होऊनही जनता दलाच्या कामगिरीत म्हणावी तितकी सुधारणा झाली नाही १९९० ला या पक्षाला २४ जागाच जिंकता आल्या. शरद पवार यांच्याशी युती करणं हे जनता पार्टीची चूक होती असं आजही पक्षाचे जुने नेते सांगतात. याचं एक उदाहरण १९९० नंतरच पाहायला मिळालं. 

१९९० नंतर जनता दलाच्या बबनराव पाचपुतेंनी आपल्यासोबत 11 आमदार घेवून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

त्यानंतर शरद पवार हेच त्यांचे नेते झाले. 1995 नंतर मात्र बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग म्हणून जनता दलाने राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिग्गज नेत्यांच्या अभावामुळे जनता दल आत्ता लोकांना आकर्षिक करुन घेवू शकत नव्हता. १९९५ च्या निवडणूकीत जनता दलाला ११ जागा जिंकता आल्या. त्यानंतर झालेल्या ९९ च्या निवडणूकीत जनता दलाचे सेक्युलर गटाचे फक्त दोन आमदार निवडून गेले. 

त्यानंतर मात्र पक्षाला आपला एकही आमदार निवडून आणता आला नाही. नाही म्हणायला शरद पाटील यांच्यासारखे नेते विधानपरिषदेवर निवडून गेले मात्र ते देखील पक्षापेक्षा व्यक्तिगत संपर्क यंत्रणेमुळे निवडून गेले. आज नाथाभाऊ शेवाळे, शरद पाटील असे नेते जनता पक्षात उरलेत. एकहाती हे नेते आपल्या पक्षाची खिंड लढवत असतात.. पण एकेकाळी 99 आमदार निवडून देणारा हा पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढताना दिसतो आहे.. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.