सोलापूरकर भिडूंनी दिलीपकुमारांचा मुगल-ए-आझम अजरामर केला!

कुटं चाललावं बे ?

का न्हई पोश्टर बगून आलो, कसलं केलाय बे यल्ला दासी, लै खतरनाक काल्लाय ! शेम समुर अनारकली हुबारलीय असंच वाटायलय ! लै भारी काढलाय बे !

खरंच जिवंत वाटावं इतकं भारी पोस्टर काढायचे यल्ला आणि दासीं. समोर लाईफ साईझ मधल पोस्टर पाहताना खरोखरीच अनारकली आणि स्लिम समोर उभारलाय असा फील यायचा ! म्हणजे आज जमाना जरी पोस्टरचा असला तरी यल्ला आणि दासींच्या चित्रांची बातच काही और होती. त्यांच्या कुंचल्याने भरलेले रंग सोलापूरकरचं काय तर अख्खा भारत विसरला नाहीये.

यल्ला दासींच्या निमित्ताने का होईना पण दिलीपकुमार आणि सोलापूर यांच नातं मुघल – ए -आजम चित्रपटाच्या संदर्भाने जोडलं गेलं आणि पुढेही सोलापूरशी त्यांचा ऋणानुबंध कायम राहिला.

सोलापुरात आलेल्या दिलीप कुमारांनी यल्ला आणि दासींना कसं एका झटक्यात आपल्या मुघल – ए -आजम चित्रपटाच पोस्टर काढायला तयार केलं त्याचाच हा किस्सा. 

तर १९६० च्या दशकात दिलीपकुमार यांचा गंगा-जमुना हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला होता. संपूर्ण भारतात या चित्रपटाची चर्चा होतीच. तेव्हा सोलापुरातल्या भागवत चित्रपटगृहात हा चित्रपट लावण्यात आला होता. त्यामुळेच दिलीपकुमार सोलापुरात भागवत चित्रपटगृहाला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या गंगा-जमुनाचे काढलेले एक पोस्टर पाहून ते त्या पोस्टरच्या प्रेमातच पडले. 

त्यांनी लागलीच तिथल्या आयोजकांना त्या पोस्टरच्या चित्रकारांची माहिती विचारली. तेव्हा हे पोस्टर सिद्राम दासी आणि विश्‍वनाथ यल्ला या कलावंतांनी काढल्याचे सांगण्यात आले.

वास्तविक पाहता यल्ला आणि दासी या दोन व्यक्ती वेगळ्या होत्या. विश्वनाथ यल्ला आणि श्री सिद्राम दासी. पण यांचं नावं वेगळं कधीच घेतलं जातं नव्हतं. दोघेही खरं तर व्यवसाय बंधू. या दोघांनी एकत्र काम सुरू केलं. कुठल्याही शिक्षणाशिवाय असं चित्र काढणं ही केवळ दैवी देणगीच म्हणावी लागेल. यल्ला दासी यांच्याइतकी ऍक्युरसी आणि लाईकनेस त्या काळी भारतात कुणाचाही नव्हता, पण केवळ आपल्या गावाच्या ओढीने दोघांनीही सोलापूर सोडलं नाही.

यल्ला हे अक्षरलेखन आणि व्यवस्थापनात तर सिद्राम दासी चित्र रेखाटनात कसबी होते. दोघेही कलाकार अतिशय नम्र. आजच्या काळात ब्रश हातात घेतला की कलाकार आधी केस आणि मागोमाग दाढी वाढवून चित्र विचित्र कपडे घालुन मिरवण्यात धन्यता मानतात. मात्र हे दोन्ही कलाकार अतिशय साधे. सिद्राम दासी धोतर आणि सिल्कचा शर्ट, गांधी टोपी डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा अशा वेशात असायचे. जणू साखर पेठेतला एखादा सुताचा व्यापारी गल्ल्यावर बसायला निघालाय असं वाटायचं.

वेष असावा बावळा परी अंगी नाना कळा असलेल्या या कलाकारांना दिलीप कुमारांनी बोलावलं. दिलीप कुमारांसोबत दिग्दर्शक के. आसिफ सुद्धा होते.

त्यांनी या दोन्ही कलावंतांना बोलावून पुढील चित्रपटांसाठी पोस्टर्स काढण्याचा आग्रह धरला. आता दिलीपकुमारांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी लगेचच होकार दिला. त्यानंतर या कलावंतांनी दिलीपकुमार यांच्या “मुगल-ए-आझम’ “कोहिनूर’ या चित्रपटांचे पोस्टर्स दिलीपकुमार यांच्या आग्रहावरून बनवले.

सोलापूरचे कलावंत यल्लाआणि दासी यांच्या जोडगोळीने काढलेल्या दिलीपकुमार यांच्या चित्रपटांचे बनवलेले बॅनर्स व पोस्टर केवळ सोलापूरच नव्हे तर देशातील सर्व मोठ्या शहरांत गाजले. दिलीपकुमार यांचे चित्रपट आणि यल्ला-दासी यांचे पोस्टर्स हे अविभाज्य समीकरण बनले होते.

तसेच या कलावंतांनी पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता, हुबळी, अहमदनगर अशा देशांतील विविध शहरांत चित्रपटांचे पोस्टर्स बनवले. ही कलावंतांची जोडी देशभरात नावारूपाला आणण्याचे काम दिलीपकुमार यांच्या माध्यमातून झाले.

गणपतीला जसं मोरया गोसाव्याचं नावं चिकटलं आणि चिरंतर काळ टिकलं तसंच काहीसं यल्ला आणि दासी यांचं नाव आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.