खुंखार कालीन भैय्यांना एकानं पिक्चरमध्ये काम देतो सांगून चुना लावला होता…

भिडू लोक तुम्हाला रन पिक्चर आठवतो का? त्यात अभिषेक बच्चन होता, भूमिका चावला पण होती. पण पिक्चर लक्षात राहिला तो फक्त एका कार्यकर्त्यामुळं, तो म्हणजे विजयराज. चौकातल्या टपरीवर फाईव्ह स्टार हॉटेलच्या थाटात चहा पिणाऱ्या विजयराजला तीनदा चुना लागतो. एक कार्यकर्ता त्याची बॅग मारतो, दुसरा त्याला छोटी गंगा सांगून नाल्यात डुबकी मारायला लावतो आणि पाच रुपयात चिकन बिर्याणी खायची त्याची हौस कव्वा बिर्याणी खाऊन भागते.

जगात चीन सोडून कुठं कव्वा बिर्याणी मिळायची शक्यता तशी कमीय, पण कुठं स्वस्तात बिर्याणी मिळत असली तर हा सिन बघितलेला कार्यकर्ता दहावेळा पीस चेक करू घेणार हे फिक्स.

पण विजयराजनं कव्वा बिर्याणी खाल्ल्यावर त्याला, ‘भावा तुझा सप्पय सुभाष झालाय’ हे सांगणारा भिडू होता पंकज त्रिपाठी. शप्पथ सांगतोय भिडू! खोटं वाटत असेल तर युट्युबवर जाऊन बघा.

आता बारीक केस, अगदी खुरटी दाढी असणारा पंकज त्रिपाठी लक्षात राहणं तसं अवघडच आहे. कारण पंकज त्रिपाठी म्हणलं की, वासेपुरमधला डेंजर सुलतान, मिर्झापूरमधला खुंखार कालीन भैय्या, ल्युडोमधला वसुली किंग सत्तू भैय्या असे सगळे डॉनच डोळ्यांसमोर येतात. आता पंकज त्रिपाठीनं हलकेफुलके आणि इमोशनल रोलही केले असले, तरी त्याच्या भूमिकांचा एक पॅटर्न फिक्स झालाय तो म्हणजे,

आमच्याशी वाकडं, तर नदीवर लाकडं

कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पंकज त्रिपाठीनं बॉलिवूडमध्ये लय मोठी झेप घेतलीये. एकदम जबरदस्त अभिनय, ऐकत रहावं असं हिंदी आणि फक्त डोळ्यांनी आणि मानेनं इशारे करण्याची नादखुळा पद्धत यामुळं पंकज त्रिपाठी मजबूत हिट झाला. कधीकाळी पिक्चरमध्ये साईड रोल करणाऱ्या या पंकज त्रिपाठीच्या नावावर आता पिक्चर चालतात. मेन म्हणजे अजूनही पाय जमिनीवर ठेवायला तो विसरलेला नाही.

आता भारी काम करत राहिलं की, बॉलिवूडमध्ये कामं मिळतात. पण कसंय बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारायला कायतर जॅक असावा लागतो. कुणाच्या मागं गॉडफादरचा हात असतो, कुणाला नशीबानं एंट्री मिळते, तर अनेकजण स्ट्रगलच्या चाकात फिरत राहतात.

बॉलिवूडमध्ये जम बसवलेला पंकज त्रिपाठी आता सातत्यानं गुंडांच्या भूमिकेत दिसतो. कुणी याच्या वाकड्यात शिरायचा विचार जरी केला, तरी भाऊ पद्धतशीर कार्यक्रम करणार असं चित्र पिक्चरमध्ये असतं. पण याच पंकज त्रिपाठीला स्ट्रगलच्या काळात एकानं बेक्कार चुना लावला होता. याचा किस्सा खुद्द पंकजनंच एका मुलाखतीत सांगितला आहे,

”मी कामाच्या शोधात असताना मला एक एजंट भेटला. त्याची बॉलिवूडमध्ये अनेक लोकांशी ओळख होती. त्यानं मला सांगितलं की पिक्चरमध्ये काम मिळवून देतो, त्याबदल्यात मला थोडे पैसे दे. मी पण त्याला २ का ५ हजार रुपये दिले. त्या एजंटनं पैसे घेतले आणि कल्टी खाल्ली. मी त्या एजंटच्या कंपनीला संपर्क केला आणि तेव्हा कळलं की आपल्याला फसवलं गेलंय. आता पैसे गेले याचं दु:ख तर आहेच, पण तेव्हापासून एक गोष्ट शिकलो की; इथून पुढं फक्त चेकमध्येच पेमेंट करायचं कॅशमध्ये नाही.”

यावरून एक गोष्ट शिकता आली भिडू, कुणी स्वस्तात बिर्याणी देत असलं तरी चेक करून खायची आणि आधी पैसे दे मग काम देतो सांगितलं की हजारवेळा विचार करायचा. जिथं विजयराज आणि कालीन भैय्या गंडले, तिथं आपणही किरकोळीत गंडू शकतोय की.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.