अभिनेते प्राणच्या पत्राला घाबरून बीसीसीआयने कपिलच्या प्रशिक्षण खर्चाची जबाबदारी उचलली..

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं काय आपल्याला नवीन नाही. जितके आपले क्रिकेटर लोकं क्रिकेटच्या जाहिराती करतात तितक्या बॉलिवूडमधले हिरो सुद्धा करत नाहीत. आयपीएलच्या टीम्ससुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटी लोकांनी विकत घेतल्या आहेत, इतकंच काय तर बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांनी लग्नही केले आहेत.

तर आजचा किस्सासुद्धा तसाच आहे. त्यावेळी यशाच्या लाटेवर स्वार असणाऱ्या कपिल देवला खेळासंबंधी बऱ्याच अडचणी आलेल्या पण त्यावर अभिनेते प्राण यांनी मार्ग काढला आणि कपिल देवचा पुढचा मार्ग मोकळा केला.

७०-८० च्या दशकात क्रिकेट क्षेत्र धार धरत होतं. सगळीकडे क्रिकेट आपला विस्तार वाढवत होतं. त्यावेळच्या क्रिकेटमध्ये आज जसा खोऱ्याने पैसा मिळतो तसा त्यावेळी नव्हता. खेळाडू फक्त क्रिकेट बद्दल असणारं प्रेम आणि देशाकडून खेळायला मिळणारी संधी यांतच खुश होत असत.

क्रिकेट नियामक मंडळांकडे पैसेच नसल्याने त्याचा परिणाम खेळाडूंना भोगावा लागायचा. जेवण, प्रवास आणि राहण्याची सोय अशा बऱ्याच गोष्टींमध्ये खेळाडूंना तडजोडी कराव्या लागायच्या.

अभिनेते प्राण हे भारतातले जितके खतरनाक व्हिलन म्हणून प्रसिद्ध होते तितकेच ते त्यांच्या क्रिकेट प्रेमासाठीही प्रसिद्ध होते. भारतात होणाऱ्या प्रत्येक कसोटी सामन्यासाठी ते न चुकता हजर असायचे. त्यांना क्रिकेट बद्दल विशेष आवड आणि आकर्षण होतं. आपल्या दोन मित्रांसोबत ते भारताचा प्रत्येक कसोटी सामना पाहायला जायचे.

पुढे त्यांच्या एका मित्राचं निधन झाल्याने त्यांनी मैदानात जाऊन मॅच पाहण्याचं बंद केलं. हे सगळं मित्राचा आदर ठेवावा म्हणून  मात्र टीव्हीवर ते न चुकता मॅच पाहायचे. प्राण फक्त प्रेक्षक म्हणून सामने पाहात नसायचे तर त्यांना क्रिकेटविषयी बरीच माहिती होती.

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन बॉलिंगच्या विविध टेक्निक्स जाणून घ्यायच्या होत्या आणि गोलंदाजीची धार वाढवायची होती. मात्र त्यावेळी क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाला जाण्याचा खर्च उचलण्यास नकार दिला. कारण मंडळचं कंगाल होतं.

प्रशिक्षणाला जायचंच असं कपिल देव यांचं ठरलं होतं, पण आता जायचं कसं हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता. आता यावर उपाय म्हणून त्यावेळच्या मीडियाने या घटनेत थोडाफार हात लावला होता.

त्यावेळचे लोकप्रिय क्रीडा साप्ताहिक स्पोर्टस्विकचे संपादक खलिद अन्सारी यांनी स्पोर्ट्स्वीक आणि काही वर्तमानपत्रांमध्ये भारतीय क्रिकेट मांडली कपिल देव यांना प्रशिक्षणासाठी खर्च देत नाहीए त्यामुळे कपिल देव यांच्या प्रशिक्षणासाठी स्पॉन्सर हवा आहे असे निवेदन दिले. या निवेदनात प्रवासखर्च आम्ही देऊ इतर खर्च स्पॉन्सर करेल असं म्हटलं होतं.

पेपरमधली हि बातमी जेव्हा प्राण यांच्या निदर्शनास आली त्यांनी तडक ठरवलं कि प्रवासखर्चापासून ते  केंद्राचा कपिल देवचा सगळा खर्च ते स्वतः करतील.

ह्या घटनेबाबत कपिल देव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि, अगोदर क्रिकेट मंडळाने हा खर्च उचलण्यास नकार दिला,त्यामुळे अन्सारी यांनी जे निवेदन वृत्तपत्रांमध्ये छापले होते ते पुढे प्राण यांनी वाचले. माझ्यामध्ये चांगला अष्टपैलू खेळाडू होण्याची क्षमता आहे ते सगळ्यात आधी प्राण यांनाच कळलं होतं.

यावर प्राण यांनी तडक निर्णय घेत भारतीय क्रिकेट मंडळाला पत्र लिहून कळवले कि,

तुम्ही प्रशिक्षणाचा खर्च देण्यास तयार नसाल तर हा सगळा खर्च करायला मी तयार आहे. आता प्राण यांच्या या पत्राला घाबरून म्हणा किंवा स्वतःची लाज वाचवण्यासाठी म्हणा क्रिकेट मंडळाने सारा खर्च स्वतःच करणार असल्याचं पत्र प्राण यांना पाठवलं.

पुढे कपिल देवने केलेले विक्रम हे काय सांगायची गरज नाही. मात्र प्राण यांच्या क्रिकेट प्रेमाची कल्पना आपल्याला येते. हा प्रश्न कपिल देवच्या करियरबद्दल अतिशय महत्वाचा तो प्राण यांनी स्वतः सोडवला होता.

कपिल देवने नंतर प्राण यांची भेट देऊन त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.