कव्वा बिर्याणी खाणारा विजय राज एकदा चुकून ड्रग्स प्रकरणात घावला होता…

रन पिक्चरमध्ये हिरो होता अभिषेक बच्चन आणि हिरॉईन होती भूमिका चावला, पण मला-तुम्हाला-आपल्याला रन पिक्चर कशामुळं आठवतो? डोक्याला लय ताण द्यावा लागणार नाय भिडू. उत्तर एकदम सोपं आहे, रन पिक्चर आठवतो तो विजय राजमुळंच.

आपल्या फादरशी भांडून कार्यकर्ता घर सोडून आला, वर खिशात दमडी नव्हती तरी त्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचा होता. आता रस्त्यावरच्या टपरीत एसी नव्हता, तरी भावानं मन मारून चहा प्यायचं ठरवलं. पण चहाचा घोट घेतल्यावर त्यानं ज्या पद्धतीनं त्याच चहानं हात धुतले, अगाआयायायाआय… नादच नाही. त्या एका सिनमुळंच तुम्ही विजयराजचे फॅन होत असताय.

हे कांड झाल्यावर एक कार्यकर्ता येतो आणि विजय राजची बॅग घेऊन जातो, फ्रस्टेट झालेल्या भावाला लागती भूक. त्यामुळं पाच रुपयांच्या बिर्याणीला भुलून गडी कव्वा बिर्याणी खातो. त्यानंतर उचकी लागण्याची जी काय ऍक्टिंग विजय राजनं केल्या, ती खरं उचकी लागलेल्याला पण जमत नसत्या.

आता कुठं आपल्याला त्याची दया यायला लागती, तेवढ्यात एक कार्यकर्ता छोटी गंगा म्हणून त्याला घाणेरड्या नाल्यात डुबायला लावतो. आपला भिडू काळ्या अंगानी बाहेर येतो, एका काकूंना अंघोळ घाला की म्हणतो आणि आगाऊपणा केल्यावर त्यांच्याही शिव्या खातो.

लय रिक्षा फिरवून तुम्हाला हा रन पिक्चरचा किस्सा सांगितला. खरं सांगणार नव्हतो, पण या गड्याची आणि रन पिक्चरची आठवण आल्या की थेट तार लागत असत्या. कारण माणूस एकदम भारी ओ!

बॉलिवूडमधला अभिनेता म्हणलं की, कसं दमदार बॉडी, पोरी घायाळ होतील असला चेहरा, रिंगटोनला ठेवावेत अशी डायलॉगबाजी अशा लै गोष्टी पाहिजेत असं तुम्हाला वाटत असंल, तर एकदा विजय राजकडं बघा. तब्येत नाही, दिसायला काय राजबिंडा नाय, पण अभिनय म्हणजे वांड एकदम.

तर विजय राज हा दिल्लीचा. ‘तू जानता है मेरा बाप कौन है?’ असं दिल्लीत म्हणतात म्हणून असावं, खरं विजय राजचे मदर-फादर काय करतात हे आम्हाला लय शोधूनही आम्हाला घावलं नाही. कॉलेजमध्ये असताना आपण बसायचो तसंच विजय राज निवांत कँटीनमध्ये बसला होता, शेजारच्या टेबलावर नाटकवाली पोरं गप्पा मारत होती. त्यांच्या गप्पा ऐकून भाऊनी ठरवलं आपल्याला पण अभिनय करायचा.

पुढं त्यानी नाटकात कामं करायला सुरुवात केली. नाटकात नाणं चमकतंय म्हणल्यावर भाऊनी जरा मनावर घेतलं आणि ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’मध्ये ऍडमिशन घेतली. जवळपास दहा वर्ष विजय राज नाटकात काम करत होता. त्यानं मनाशी ठरवलं होतं, की नाटकातच करिअर करायचं. एक दिवस ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी त्याचं नाव चित्रपट दिग्दर्शक महेश मथाई यांना रेकमेंड केलं आणि ‘भोपाळ एक्सप्रेस’ चित्रपटापासून त्याचा बॉलिवूडमधला प्रवास सुरू झाला.

आता पुढची सगळी स्टोरी तुम्हाला माहितीचे. त्यामुळं ती काय सांगत बसत नाय. पण रन पिक्चरमध्ये पोट धरून हसवणाऱ्या विजय राजनं गली बॉयमधल्या बापाच्या भूमिकेत काम करताना रडवलंही होतं. त्याला पुरस्कार मिळाले चाहत्यांचं प्रेमही मिळालं. आता सगळं गोड गोड असलं, तर स्टोरी हिट कशी होणार.

विजय राज ‘दिवाने हुए पागल’ या पिक्चरच्या शूटिंगसाठी दुबईला चालला होता. आता विमानतळावर कसलं बेक्कार चेकिंग होतं भिडू. त्या चेकिंगमध्ये विजय राजला धरलं, कारण त्याच्या बॅगमध्ये सहा ग्रॅम गांजा घावला होता. आता सहा ग्रॅमनी तारे दिसतात का नाय हे काय आम्हाला माहीत नाय. पण नियम म्हणजे नियम, त्यामुळं पोलिसांनी विजय राजला उचललंच.

मग तो निर्दोष सुटला कसा?

पोलिसांनी आधी त्याची ब्लड आणि युरीन टेस्ट केली. त्यात कळलं की, विजय राज एकदम क्लिअर आहे. त्याच्या चौकशीत त्यानं असं सांगितलं, ‘की कुणीतरी जाणूनबुजून माझ्या बॅगमध्ये गांजाची पुडी टाकली. ती पुडी अगदी संशयास्पद रित्या ठेवण्यात आली होती. या प्रकरणामुळं मला खूप त्रास झाला.’

लय हार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबई पोलिसांनीही विजय राज निर्दोष असल्याचं सांगितलं आणि भावाला पुन्हा भारतात येता आलं. जर खरंच तसं काही प्रकरण असतं, तर विजय राजची कारकीर्द धोक्यात आलीच असती आणि आपल्याला उगा श्रीमंत कॉलेजमधल्या श्रीमंत पोरांची रटाळ लफडी बघत बसावं लागलं असतं, नाय का? त्यामुळं रोल कुठलाही असो, आपल्याला हसवणारा आणि कधी कधी गंभीर करणारा विजय राज स्क्रीनवर दिसला,की लई भारी वाटतं हेच खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.