विल स्मिथनं मेहनतीनं ऑस्कर कमावला, पण कानफडात मारुन लय काही गमावलं

थाटामाटात, नियमात आणि चर्चेच्या प्रकाशझोतात पार पडणारा, ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. दरवेळी ऑस्कर झाला की, काही ठरलेल्या बातम्या आपण अगदी फिक्स बघतो. या पिक्चरनं मिळवले सर्वाधिक ऑस्कर, भारतीय पिक्चर ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर, या अभिनेत्रीचा रेड कार्पेट लूक बघून तुम्ही व्हाल घायाळ…

यंदाच्या ऑस्करनंतरही अशाच बातम्या पाहायला मिळतील असा अंदाज होता.

नाही म्हणायला ‘writing with fire’ या भारतीय माहितीपटानं सुखद धक्का द्यावा असं कुठंतरी वाटत होतंच. पण यंदाच्या ऑस्करनं धक्का दिला आणि इतका खुंखार धक्का दिला… की आपल्या बत्त्या डीम झाल्या.

या धक्क्याच्या केंद्रस्थानी कोण होतं? विल स्मिथ.

आता विल स्मिथ कोण आहे? हे काय वेगळं सांगायला नको. ऑल टाईम दवणीय ग्रेट ‘चिमणी पाखरं’ नंतर कुठला पिक्चर बघून रडायला आलं असेल, तर ‘Pursuit of Happyness. हळवा, मेहनती आणि सच्चा असणारा बाप विल स्मिथनं असा काही साकारला, की पिक्चर बघून आपल्या वडिलांना मिठी मारावी वाटली. तशी त्याच्या पिक्चरची दुनियादारी लय आहे आणि त्यामुळंच विल स्मिथ आपला फेव्हरिट झाला.

आता यंदाच्या ऑस्करला विल स्मिथ बेस्ट ॲक्टर ठरलाय… त्यानं स्टेजवर जाऊन ती बाहुली पण घेतली. गोष्ट तशी भारी होती, पण त्या आधी लय घाण राडा झाला.

ऑस्कर सोहळ्यात कॉमेडियन ख्रिस रॉक सूत्रसंचालन करत होता. जोक करता करता त्यानं विल स्मिथच्या बायकोवर जोक केला. विल स्मिथ आधी थोडंसं हसला, मग उठून थेट स्टेजवर गेला आणि ख्रिस रॉकला खणखणीत कानपट्टा दिला. नंतर खाली येऊन कचकटून शिवी दिली आणि सांगितलं, ”तुझ्या तोंडून माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस.”

 जिथं खुंखार नियम आहेत, जिथं सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं त्या ऑस्करच्या स्टेजवर असं काही घडलं आणि सगळं जग हँग झालं.

हे सगळं घडल्यानंतर विल स्मिथ ऑस्कर घ्यायला गेला आणि आपल्या भाषणात झाल्या प्रकारची माफीही मागितली. आज कुणाच्या दृष्टीनं तो हिरो आहे, तर कुणाच्या दृष्टीनं झिरो. पण आजचा दिवस आला नसता, तरी विल स्मिथचं महत्त्व काय कमी झालं नसतं.

कारण त्याचा आजवरचा प्रवासही फिल्मी होता.. अगदी बॉलिवूड स्टाईल.

त्याचा जन्म झाला अमेरिकेतल्या फिलाडेल्फीयामध्ये. आई एका शाळेत कामाला होती, वडील युएस आर्मीमधून रिटायर झालेले. स्मिथ १३ वर्षांचा असताना त्याचे आईवडिल वेगळे झाले. स्मिथच्या वडिलांनी त्याला त्याच्या आईला प्रचंड मारहाण केली. आपलं बालपण वडिलांचा मार खाण्यात, त्यांना आईला मारताना बघण्यात आणि घाबरण्यात गेल्याचं त्यानं अनेकदा सांगितलंय.

१३ वर्षांचा असताना स्मिथनं आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

पुढं त्याचं शिक्षण सुरू होतं, चांगले मार्कही मिळत होते, त्याला स्कॉलरशिपही मिळाली. पण गड्यानं ती नाकारली. कारण त्याला रॅपर बनायचं होतं. त्याला हिपहॉप आवडायचं. त्याच्यात मन लाऊन काम केल्यानंतर, विल स्मिथला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्याचा पहिला अल्बम मार्केटमध्ये आला. त्याला प्रतिष्ठेचे दोन ग्रॅमी अवॉर्ड्सही मिळाले.

गाडी सुसाट सुटली होती, पण ट्विस्ट नसला, तर पिक्चर फिल्मी कसा होणार?

त्याला यश मिळालं, पैसे मिळाले पण पचले नाहीत. तो इनकम टॅक्स डिपार्टमेन्टच्या रडारखाली आला आणि कमाईतला मोठा पार्ट त्याला दंड म्हणून भरावा लागला. पैसे कमवावेत म्हणून त्यानं ‘The Fresh Prince of Bel-Air’ या कॉमेडी टीव्ही शोमध्ये काम करायला सुरूवात केली.

या शो मुळं स्मिथच्या आयुष्यात आणखी एक ट्विस्ट आला, जगानं त्याच्यातल्या अभिनेत्याकडे पाहिलं.

मग अभिनयाच्या गाडीला जो स्टार्टर मिळाला त्याला तोड नाही. बॅड बॉईज असेल, मेन इन ब्लॅक असेल, इंडीपेंडन्स डे असेल, हँकॉक असेल, अल्लादिन असेल… असे लय पिक्चर असतील, आपल्याला विल स्मिथ स्क्रीनवर दिसायचा आणि लय आवडायचा. आलम दुनियेला वाचवणारा हिरो तर तो भारी करायचाच.. पण त्याची कॉमेडीही बाप होती.

या कॉमेडीची सवय त्यानं आपलं दुःख आणि टेन्शन विसरायला लाऊन घेतली होती. कॉमेडीनंच त्याला सुपरस्टार बनवलं.

विल स्मिथच्या आयुष्यतला मोठा माईलस्टोन ठरला, तो म्हणजे २००७ मध्ये आलेला ‘The Pursuit of happyness’ हा पिक्चर. आपल्या मुलासोबतच काम करताना, त्यानं भाषेबिषेची बंधनं तोडून जगाला भारी वाटणारं काम केलं.

पुढचा ट्विस्ट होता, त्याचं आणि जाडा पिंकेट स्मिथचं नातं…

The Fresh Prince of Bel-Air या शो च्या सेटवर ही जोडी भेटली, त्यांच्यातलं प्रेम फुललं. पिंकेट ही विल स्मिथची दुसरी बायको. त्यांचं नातंही अगदी छान सुंदर सुरू होतं. टिपिकल फिल्मी लव्हस्टोरीमध्ये येतात, तसे एपिसोड्स यांच्या नात्याबाबतही होतेच. नातं तुटल्याचा, हे दोघं ओपन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेक बातम्या आल्या. पिंकेटनं हे दोघं एकत्र नसताना आपण दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना, विल स्मिथनं ‘आमचं रिलेशनशिप वेगळं आहे, आम्ही लग्नाला तुरुंग मानत नाही,’ असं मत व्यक्त केलं होतं.

आता ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. पिंकेटला अलोपेकिया एरिएटा नावाचा आजार आहे, ज्यामुळं तिचे केस पूर्णपणे गळालेत. तिनं आपला हा बाल्ड लूकही आत्मविश्वासानं बाळगला. पण ख्रिस रॉकनं तिच्या याच लूकबाबत केलेला जोक विल स्मिथच्या डोक्यात गेला आणि त्यानं ऑस्करच्या स्टेजवर हाणामारी करायला पुढं मागं पाहिलं नाही.

आपल्या बायकोच्या आजारावर झालेल्या जोमुळं ख्रिस रॉकला कानपट्टा देणाऱ्या विल स्मिथवर लई लोकांनी टीका केली, अनेकांनी त्याचं कौतुकही केलं.

पण या सगळ्यात एक गोष्ट झाली, की विल स्मिथच्या ऑस्कर जिंकण्याच्या गोष्टीला बट्टा लागला, कायमस्वरुपीचा.

स्मिथला ऑस्कर मिळाला ‘किंग रिचर्ड’ सिनेमातल्या भूमिकेसाठी. यात त्यानं सेरेना आणि व्हीनस विल्यम्सच्या वडिलांचा रोल केलाय. किंग रिचर्ड मधला असेल किंवा The Pursuit of happyness मधला, बापाच्या रोलनं त्याला बरंच काही दिलं. खऱ्या आयुष्यातल्या बापानं त्याला प्रेरणा दिली असली, तरी त्याच्या लक्षात मात्र मारच राहिला आणि आज बापाच्या भूमिकेनं त्याला पहिला ऑस्कर दिला असला… तरी आपल्या लक्षात मात्र मारच राहील. सगळ्याच फिल्मी स्टोऱ्यांना हॅपी एंडिंग नसतं… हेच खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.