लोकांना लसी नाहीत आणि या कंपनीने अभिनेत्रींना फ्रंटलाईन वर्कर घोषित करुन लस दिलीय…

राज्यात मागच्या महिन्याभरापासून सरकारी लस केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण बंद आहे. खाजगीवर सुरु आहे, पण तिकडे स्लॉटची जाम बोंबाबोंम. मागच्या ८ दिवसांपासून लसीचा स्लॉट मिळवण्यासाठी त्या Co-win ऍपवर प्रयत्न करत आहे. जसं टेलिग्रामला अपडेट येईल तसं लॉगिन करतोय. पण लॉगिन करेपर्यंत स्लॉट फुल्ल. तुम्हाला पण अनेकांना असा अनुभव येत असणार गॅरेंटी आहे आपली.

पण तेवढ्यात आज अचानक ‘भाभीजी घर पर है’ मधली अभिनेत्री सौम्या टंडनने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर लस घेतल्याची बातमी बघितली. चक्कीत जाळं झाला ना राव. आता अभिनेत्री आहे म्हणून व्हीआयपी कोट्यातून वगैरे लस मिळाली असेल असं वाटलं. पण बातमी नीट बघितली तर तिला थेट फ्रंटलाईन वर्कर मधून लस मिळालीय ना भिडू.

त्यात सोबत तिचं आरोग्यसेवक असल्याचं ओळखपत्र पण होतं. मात्र प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्रीनं सोशल मीडियावर हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं. तसेच हे आरोप देखील निराधार असल्याचं सांगितलं.

सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आदेश दिले आहेत, त्यात खरं – खोट समोर येईलच.  पण हे ओळखपत्र बघितल्यावर याआधी पण चार दिवसांपूर्वी असचं एका अभिनेत्रीचं प्रकरण घडलं होतं. त्यात पण अगदी डिट्टो ओळखपत्र होतं आणि त्याचं कंपनीचं होतं. या दोन्ही वादग्रस्त ओळखपत्रांवर नाव होतं,

ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड

याआधी चार दिवसांपूर्वीचं तमिळ अभिनेत्री मीरा चोप्रा हिने देखील लस घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात देखील तिने ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेडचे ओळखपत्र दाखवून लस घेतली होती. यात ती सुपरवायझर असल्याचं कंपनीकडून दाखवण्यात आलं होतं.

आमदार निरंजन डावखरे यांनी ट्वीट करत या प्रकारावर म्हटलं होतं की, ठाणे महापालिकेने कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्य केअर कंपनीने चक्क तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मीरा चोप्राला कामावर ठेवलंय.

मीराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय? कि लस घेण्यापूरते आयकार्ड दिले गेले? असा सवाल त्यांनी केला आहे.

त्यानंतर मीरा आणि संबंधित कंपनी प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली. संबंधित ओळखपत्र बोगस असल्याचं म्हंटलं जावू लागलं. भाजपकडून या प्रकरणी मीरा आणि ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनींवर कारवाई करण्याची मागणी केली जावू लागली.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगपालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देखील दिले. डावखरे यांच्याच आरोपानुसार हि कंपनी मागच्या काही काळापासून औषधांची तस्करी देखील करते.

या प्रकरणाच्या आधी एप्रिल महिन्यात देखील मे.ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि कंपनी चर्चेत आली होती. त्यावेळी प्रकरण घडलं होतं लाचखोरीचं. 

२४ एप्रिल २०२१ रोजी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. सोशल मीडियामधून याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. तसंच डॉ. परवेझ शेख नामक एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली होती. सोबतच आणखी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आता या प्रकरणाचा आणि मे.ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. चा काय संबंध. तर लोकमतने २४ एप्रिल रोजी दिलेल्या बातमीनुसार, डॉ. परवेझ शेख  हा या खासगी कंपनीत सल्लागार होता. तेव्हा देखील या खाजगी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी झाली होती.

या तिन्ही प्रकरणाशी संबंधित असलेली मे.ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. कंपनी नेमकी काय आहे?

तर ही ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. हि कंपनी एक खाजगी एनजीओ आहे. संबंधित कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेजवर या कंपनीच्या वेबसाईटचा उल्लेख नाही. केवळ कंपनीचे नाव आणि 079778 09923 हा एक मोबाईल आढळून येतो.

मात्र https://www.zaubacorp.com/ या आर्थिक बाबींची माहिती देणाऱ्या वेबसाईटवर ओमसाई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाबत माहिती आढळून येते. यानुसार ही कंपनी १९ जून २०२० रोजी एनजीओ म्हणून रजिस्टर झाली आहे. त्यांचं अधिकृत भांडवल आहे १० लाख रुपयांचं.

आरोग्य क्षेत्रामधील काम करण्यासाठी हि कंपनी काम करत असते.

या वेबसाईट नुसारचं कंपनीचा पत्ता आहे, जी-२/१७ए, माधवी, प्रेमज्योत सीएचएस घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, चेंबूर, मुंबई शहर. महाराष्ट्र. ४०००४३.

या कंपनीचं जे अधिकृत फेसबुक पेज आहे ते देखील १४ जुलै २०२० रोजी सुरु झालं आहे. तर पहिली पोस्ट आहे ती २५ जुलै २०२० रोजी. त्यानंतर सातत्यानं या कंपनीने आपल्या केलेल्या कामाचे आणि कौतुकांच्या पोस्ट केल्या आहेत. यात अगदी मंत्री, रेल्वे विभाग आदींचा देखील समावेश आहे.

याच पेजनुसार ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. खालिद शेख हे जबाबदारी संभाळत आहेत.

आता हि कंपनी मुख्य काम काय करते?

या कंपनीचे मुख्य काम आहे ठाणे महानगरपालिकेला कोरोना काळात लागणारा सगळा आरोग्य कर्मचारी वर्ग पुरवणे. यात अगदी डॉक्टर्स पासून सुरुवात होते. सोबतच आमदार निरंजन डावखरे यांच्या म्हणण्यानुसार, हि कंपनी महापालिकेचं पार्किंग लसीकरण केंद्र देखील चालवते.

डावखरे यांच्या आरोपानुसार आणि माध्यमांमधील बातम्यांनुसार याच पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर सौम्या टंडन आणि मीरा चोप्रा यांनी लस घेतली आहे. त्यानंतरच हि कंपनी आणि अभिनेत्री वादात सापडल्या आहेत.

या तिन्ही वादांवर कंपनीचं म्हणणं काय?

वर उल्लेख केलेल्या वादांविषयी या कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेल्या अधिकृत नंबरवर संपर्क केला.

तेव्हा, साहिल शेख नामक व्यक्तीने हा फोन उचलला. जेव्हा त्यांना ओम साई आरोग्य केअर मधून बोलत आहेत का असं विचारलं असता त्यांनी ‘हो’ असं उत्तर दिलं.

त्यावर आम्ही त्यांना लसीकरण आणि ओळखपत्र या वादावर त्यांचं मत विचारलं असता ते म्हणाले, मला याबद्दल सांगता येणार नाही. तुम्ही आमच्या सरांना फोन लावा. त्यांनी आम्हाला आणखी एक नंबर दिला. 

या नंबरवर फोन लावला असता तो डॉ. खालिद शेख यांना लागला. ओम साई आरोग्य केअरमध्येच लागला असल्याची खातरजमा करून त्यांना या वादावर मत विचारलं. अभिनेत्री आणि लस हे दोन शब्द उच्चारताच त्यांनी सरळ फोन ठेऊन दिला आणि त्यानंतर उचलला नाही. 

ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेडशी अधिक संपर्क झाल्यानंतर त्यांचं मत जाणून घेऊन ते इथं अपडेट करण्यात येईल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.