मुंबईचा आयुक्त असणाऱ्या या इंग्रज अधिकाऱ्याने मराठी पोवाड्यांना जगभरात पोहचवलं .

मुंबईत वडाळ्याला ॲकवर्थ लेप्रसी हॉस्पिटल म्हणजेच कुष्ठरोग्यांचे हॉस्पिटल आजही उभे आहे. त्याला जोडूनच ॲकवर्थ लेप्रसी म्युझियम देखील आहे. ज्याच्या नावावरून हे हॉस्पिटल सुरू झालंय त्या ॲकवर्थचा पुतळा देखील इथल्या दाराशी आहे.

अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो हा ॲकवर्थ होता तरी कोण?

हॅरी आर्बथनॉट ॲकवर्थ. मुंबईचा 1891 ते 1896 दरम्यानचा आयुक्त. जन्मला इंग्लंड मध्ये पण कर्मभूमी होती महाराष्ट्र. इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांप्रमाणे ॲकवर्थ हा भारताला लुटायचा देश समजत नव्हता. उलट इथल्या मातीशी त्याच नात जोडलं गेलं होतं.

तो मराठी भाषेचा अभ्यासक होता. जिथे आपण काम करतो तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे असा त्याचा दंडक होता.

मात्र जसा अभ्यास करेल तसा तो मराठीच्या प्रेमात पडत गेला.

खरं तर त्याकाळात मराठीमध्ये साहित्य तसं मोजकंच होतं. मोठमोठे इंग्रज विद्वान मराठी मध्ये संतसाहित्य सोडलं तर काही नाही अशी हेटाळणी करायचे. ज्या काही कथा कादंबऱ्या नाटके लिहिली जात होती ती सर्व संस्कृत मधील भाषांतरे आहेत अशी देखील टीका केली जायची.

पण ॲकवर्थने हे सर्व गैरसमज मोडून काढले. त्याने जगाला दाखवून दिलं की,

मराठी कवितांंना, लोकगीतांना हजार वर्षांचा इतिहास आहे आणि विशेषतः इथले पोवाडे हे जगातल्या सर्वोत्तम साहित्य निर्मिती पैकी एक आहे.

ॲकवर्थ हा ब्रिटिश आयसीएस अधिकारी. इंग्लंड मधील कायदेपंडित. मुंबईच्या कमिशनर पदाची मानाची पोस्ट त्याला मिळालेली. मोठा बंगला, नोकर चाकर दिमतीला होते. मुंबईचा कारभार सुद्धा तो चोखपणे हाताळत होता. आपल्या ऑफिसमध्ये बसून मुंबईच्या राजाप्रमाणे आदेश देत त्याला बसता आलं असत

पण मराठी भाषेच्या प्रेमापायी तो महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकगीतांचा, पोवाड्यांचा अभ्यास करू लागला.

मराठीच्या प्राध्यापकांना लाजवेल इतकं अस्खलित मराठी तो बोलायचा. मुकुंदराजा पासून मोरोपंत वामन पंडित यांच्यापार्यंत मराठीचे थोर कवी आणि संत ज्ञानेश्वरापासून संत तुकोबा पर्यंत संतसाहित्य त्याला मुखोद्गत होते.

त्याच्या याच अभ्यासामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 19 डिसेंबर 1891 रोजी मराठी कविता या विषयावर त्याचे व्याख्यान ठेवण्यात आले. ते आजही आपल्याला वाचायला मिळू शकते. त्यात तो सांगतो,

“मराठी पोवाडा हे अजरामर काव्यप्रकार आहे. ज्यांनी हे पोवाडे रचले ते जवळजवळ निरक्षर होते. त्यामुळे पोवाडे लिहून ठेवले गेले नाहीत तर एकमेकांना सांगून गाऊन पाठ झाल्यामुळे ते टिकून राहिले. गोंधळी लोकांचे काव्य देखील जपून ठेवण्यासारखे आहे.”

ॲकवर्थ यांनी महाराष्ट्रात गावोगावी फिरून तळागाळातल्या भटक्या विमुक्त जमातीनी जपलेले पोवाडे गोळा केले आणि त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. याच विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली.

ते फक्त महाराष्ट्रात येऊन इथले साहित्य पोवाडे यात रमले होते असे नाही त्यांच्या कारकिर्दीत मुंबईत अनेक सुधारणादेखील झाल्या.

ॲकवर्थ कमिशनर असतानाच मुंबईत मलबार हिल ला गव्हर्नरचा मोठा बंगला उभारण्यात आला. आजही जिथे महाराष्ट्राचे राज्यपाल राहतात तोच राजभवन हा बंगला. यापूर्वी मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर परळच्या गव्हर्नर पॅलेसमध्ये राहत असे. तो राजभवनात राहायला गेल्यावर त्याच्या सुरक्षेसाठीचा स्टाफ, सैनिकही मलबार हिलवर बांधलेल्या क्वार्टर्समध्ये राहायला गेले.

माटुंगा आणि वडाळा येथील रिकामे झालेले सर्वन्ट क्वार्टर्स काय करायचे असा प्रश्न उभा राहिला. कमिशनर ॲकवर्थ ने ठरवले की महाराष्ट्रातील कुष्ठरोग्यांच्यासाठी ही जागा देऊन टाकायची.

कुष्ठरोगी महारोगी यांना त्याकाळात समाजात स्थान नव्हते. त्यांना वाळीत टाकले जाई. बाकीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विरोध असूनही मानवतेच्या दृष्टिकोनातून हॅरी ॲकवर्थने या साऱ्यांना आधार म्हणून गव्हर्नरच्या राजवाड्याच्या परिसरात हॉस्पिटल सुरू केले.

आज त्याला आपण ॲकवर्थ लेप्रसी हॉस्पिटल म्हणून ओळखतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.