कोण होता शांताराम ज्याला भेटायला गिलख्रिस्ट आणि मिस्टर क्रिकेटनं कॅफे लिओपोल्ड गाठलेलं..

एबी डिव्हिलिअर्स इलेक्शनला उभा राहिला, तर बँगलोरचा महापौर सहज बनू शकतो, जॉन्टी ऱ्होड्सनं आपल्या पोरीचं नाव इंडिया ठेवलंय, ग्लेन मॅक्सवेलनं तर डायरेक्ट भारतीय पोरीशीच लग्न केलं (भावा, इथं आमच्याकडची पोरं ताटकळलीत!) जाऊद्या, लग्न काय होत असतात. आपल्या लेखाचा विषय तो नाय. कधीकाळी फॉरेनचे क्रिकेटर्स भारतात यायला लय उत्साही नसायचे. इथलं ट्रॅफिक, रस्त्यांवरची गर्दी काय त्यांना मानवायची नाय. मग आयपीएल आली आणि दिवस बदलले. फक्त अडीच महिन्यात मिळणारे पैशे आणि प्रसिद्धी बघता सगळेच प्लेअर्स भारत माझा देश आहे म्हणायला लागले.

हा आयपीएल सुरू होण्याच्या दोन वर्ष आधीचा किस्सा आहे. २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन टीम भारतात आलेली. त्यांच्या टीममधले तीन दिग्गज खेळाडू ॲडम गिलख्रिस्ट, मायकेल हसी आणि डॅमियन मार्टिन मुंबईतल्या चिंचोळ्या गल्लीत हिंडत होते… तेही एका कादंबरीतला माहोल शोधत!

ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स या शुटरचं नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदा वाचत असाल. हा ऑस्ट्रेलियन अप्पा म्हणजे तसा लय खुंखार विषय, त्यानं एक कांदबरी लिहिली, जिचं नाव होतं ‘शांताराम.’ या कादंबरीचा हिरो म्हणजेच शांताराम- रॉबर्ट्सच्या खऱ्या लाईफवरच बेतलेला होता. या शांतारामला हेरॉईनचं येड लागलेलं. धुंदी धुंदीत भाऊ थेट बँक लुटायला गेला आणि नेमका पोलिसांना घावला. आता ऑस्ट्रेलियातले पोलिस आणि न्यायालय पडले डेंजर. त्यांनी भावाला थेट १९ वर्षांसाठी आत पाठवलं. शांताराम भाऊ फिक्स बॉलिवूडचे पिक्चर बघत असणाराय, कारण तो दोन वर्षांत जेल तोडून फरार झाला. आता ऑस्ट्रेलियात त्याला धरू धरू आत टाकलं असतं, त्यामुळं भावानं गाठला भारत.

इकडं शांतारामनं बॉलिवूडमध्ये एक्स्ट्रा म्हणून काम केलं. मुंबईतल्या झोपडपट्टीत राहिला. छोट्या मोठ्या ड्रग माफियांसोबत ‘बिझनेस’ही केला. थोडक्यात भावाच्या आयुष्याचा एकदम ब्लॉकबस्टर पिक्चर झाला असता. रॉबर्ट्सनं या स्वतःच्या कहाणीवर पुस्तक लिहिलं. त्याच्या एका दोस्ताची आई त्याला शांताराम म्हणायची, भावानं तिलाच आत्या म्हणत पुस्तकाचं नाव नक्की केलं.. शांताराम!

शांतारामचा लेखक- ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
शांतारामचा लेखक- ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स

तुम्ही म्हणाल या सगळ्यात क्रिकेटचा काय संबंध? सांगतो. या पुस्तकाची सगळ्या जगात लय हवा झाली. खुंखार स्टोरी, काळोख्या मुंबईचं अचूक वर्णन या गोष्टी वाचकांना आवडल्या. ऑस्ट्रेलियामध्येही हे पुस्तक चांगलंच गाजलं. त्यावेळच्या टीममधले तीन जण ॲडम गिलख्रिस्ट, मायकेल हसी आणि डॅमियन मार्टिन हे पुस्तक वाचत होते. मुंबईत आल्यावर हे तिघं पुस्तकात तंतोतंत लिहिलेला माहोल अनुभवत होते. असंच फिरता फिरता गिलख्रिस्टला ‘लिओपोल्ड कॅफे’ दिसलं. कुलाब्यात पार १८७१ पासून हे हॉटेल थाटात उभं आहे. २६/११च्या हल्ल्यात हे हॉटेल लक्ष्य झालेलं, पण पुन्हा उभं राहिलं. काहीसं जुनाट, अंधारं असणारं हे हॉटेल परफेक्ट ‘अड्डा’ आहे.

शांताराममध्ये या हॉटेलचं नाव बऱ्याचदा लिहिलंय हे आठवून ही गॅंग आत गेली आणि निवांत बसली. आता असले स्टार क्रिकेटर आपल्याकडे आलेत म्हणल्यावर हॉटेलचा मालक काय हवं काय नको बघायला त्यांच्याकडे गेला. गिलख्रिस्टनं सांगितलं, ‘आम्ही शांताराम पुस्तकामुळं इथं आलोय.’

यावर मालक म्हणले, “मी विचारतो आणि बघतो त्याला आत्ता इकडं यायला जमतंय का,”

पुढच्या काही मिनिटांत शांताराम तिथं आला. पुस्तकाच्या नशेत असलेले हे तिघं डायरेक्ट पुस्तकाच्या लेखकाशीच गप्पा मारत होते. तेही त्यानं कथेत अनेकदा लिहिलेल्या जुनाट, अंधाऱ्या पण तितक्याच भारी जागी बसून!

हे म्हणजे आपण हिंदू वाचून झाल्यावर फर्ग्युसनच्या हॉस्टेलमध्ये आढ्याकडं बघत बसावं आणि नेमाडे गुरुजींनी येऊन आपल्याशी गप्पा माराव्यात असं झालं. या शांताराम कादंबरीचा मराठी अनुवादही आला. इतकंच काय ‘The Mountain Shadow’ नावानं दुसरा भागही आलाय.

क्रिकेट आणि पुस्तक हे दोन बिंदू एका संध्याकाळी असे कनेक्ट झाले आणि दुनिया फार छोटी आहे याचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या भिडूंनी घेतला.

संदर्भ: TheRandomCricketPhotosGuy (ट्विटर)

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.