ऑस्ट्रेलियाच्या राक्षससेनेत एकच दिलदार माणूस होता, ॲडम गिलख्रिस्ट

आत्ताची ऑस्ट्रेलिया टीम भले वर्ल्डकप जिंकू द्या, त्यांची काय दहशत बसणार नाही. फक्त ऑस्ट्रेलियाच नाही कुठल्याही टीमनं सलग दोन-तीन वर्ल्डकप नेले तरी त्यांना जास्तीत जास्त भारी टीम म्हणून ओळखलं जाईल. कारण दहशत फक्त एकाच टीमची होती आणि राहील. ती म्हणजे रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वातली ऑस्ट्रेलियन टीम.

त्या टीमची नुसती जर्सी पाहिली तरी सगळ्या वाईट आठवणीच डोळ्यांसमोर येतात. २००७ च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत त्यांनी क्रिकेटवर अक्षरश: राज्य केलं. युवराजनं किस्सा केला नसता, तर २०११ मध्येही सुट्टी नसतीच.

त्या टीमकडे दहशत बसावी असं सगळं काही होतं, म्हणजे ओपनिंगला हेडन येणार मारून जाणार, मग क्लार्क, पॉन्टिंग, हसी, सायमंड्स ही टोळी झेलायची. ब्रेट ली, मॅकग्रा, गिलेस्पी, टेट यांच्या भयानक वेगासमोर उभं राहायचं. त्यात स्पीडला टिकलो तर वॉर्नचे वळणारे बॉल बाजार उठवायचेच. हे सगळं कमी होतं, म्हणून ऑस्ट्रेलियाकडं कीपर बॅट्समन पण वांड होता- त्याचं नाव ॲडम गिलख्रिस्ट.

आता ऑस्ट्रेलिया म्हणजे वर्गात पहिली येणारी पण ड वर्गातली पोरं. कारण दंगामस्ती आणि खोड्या करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नव्हतं.पण प्रत्येक वर्गात एक अबोल, निवांत आणि तरीही हुशार पोरगं असतंय – तो होता गिलख्रिस्ट.

पद्धतशीर उंची, कायम हसरा चेहरा, केशरी रंगाचे ग्लोव्ह्ज आणि ओठांना लावलेली पांढरी क्रीम ही गिलख्रिस्टची ओळख. ऑस्ट्रेलियाचा हा किपर वनडेमध्ये हेडनसोबत ओपनिंगला यायचा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सातव्या नंबरला. आधीच हेडन सहन व्हायचा नाही, त्यात गिलख्रिस्टही मारझोड करायचा. टेस्टमध्ये हेडन, पॉन्टिंग, लँगर, क्लार्क, सायमंड्स या सगळ्यांनी हाल करून झाले की उरलासुरला जीव काढून घ्यायची जबाबदारी गिलख्रिस्टवर असायची.

एक जमाना होता जेव्हा किपरचं काम फक्त किपींग करणं एवढंच असायचं. तो बॅटिंगला यायचा पार अकराव्या नंबरला. पण मॉडर्न क्रिकेटमध्ये ही पद्धत खोडली गेली. ज्यामागचं कारण होतं लंकेचा रोमेश कालुवितरणा आणि स्वतः गिलख्रिस्ट. आता या दोघांची नावं घेतल्यावर एकच कॉमन फॅक्टर आठवतो, तो म्हणजे हाणामारीवाली बॅटिंग.

विकेटकिपर तुफानी बॅटिंग करू शकतात हा पायंडा पाडण्यात गिलख्रिस्टचा मोठा वाटा आहे. आपले धोनीअण्णा, पंत, किशन, केएल राहुल ही परंपरा पुढं नेतायत हे पाहून कॉलर फिक्समध्ये ताठ होते.

गिलीची किपींगही भारी होती. आता एकाबाजूनं स्पीड आणि दुसऱ्या बाजूनं टर्न असताना किपींग करणं काय साधं काम नसायचं. पण गिलीनं ते करून दाखवलं.

गिलख्रिस्टचं नाव घेतल्यावर आणखी एक किस्सा आठवतो, तो म्हणजे २००३ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमधला. ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग, गिली आणि हेडननं कडक सुरुवात करून दिली होती. तेवढ्यात अरविंदा डि सिल्व्हाच्या बॉलिंगवर गिलख्रिस्ट विरोधात कॅच आऊटच अपील झालं, बॉल त्याच्या बॅटला लागला होता. पण अंपायर म्हणला नॉटआऊट!

आता सेमीफायनलचं स्टेज, बॉल मस्त कनेक्ट होतोय, अंपायर म्हणतोय नॉटआऊट. तरीही गिलख्रिस्ट पॅव्हेलियनकडे गेला. याला म्हणतात स्पिरीट ऑफ द गेम भिडू.

वांड पोरांमध्ये राहून गिलीनं राडे केले नाहीत, स्लेजिंग केली पण लिमिटमध्ये, कायम हसतखेळत वातावरण ठेवलं, डेक्कन चार्जर्ससोबत आयपीएल जिंकली. क्रिकेटला जंटलमन्स गेम का म्हणतात हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं.

पण त्यानं सगळ्यात महत्त्वाचं काय काम केलं असेल, तर लोकांना किपींगचं येड लावलं. क्रिकेट हा सभ्य खेळ आहे आणि तो लय सभ्यपणानं खेळता येतो, हे त्यानं ऑस्ट्रेलियन टीममध्ये राहून दाखवलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.