अदानींचे पाच बिजनेस जे अंबानींना ओव्हरटेक करण्याची त्यांची स्ट्रॅटेजी दाखवून देतात

२०२२ मध्ये अनेक समीकरणं बदलली ज्यात भारतातील सगळ्यात श्रीमंतांचं समीकरणही बदललं. भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? असं म्हटलं तर या प्रश्चाचं उत्तर आजपर्यंत हमखास ‘मुकेश अंबानी’ असं असायचं. मात्र आता त्या ठिकाणी ‘गौतम अदानी’ हे नाव कोरलं गेलंय. जितका वेळ मुकेश अंबानींना सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी लागला त्यातुलनेत खूप कमी काळात अदानींनी त्यांना ओव्हरटेक केलेलं जगाने बघितलंय.

आता ताजच उदाहरण बघा ना…

अदानी समूह सौदी अरामको आणि ऑइल किंगडमच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडशी करार करत असल्याची माहिती मिळतेय. सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी आहे. ही कंपनी तेव्हा भारतात चर्चेत आली जेव्हा मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल व्यवसायात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न ही कंपनी करत होती. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये दोन वर्षे चर्चाही सुरू होती मात्र हे काही कारणास्तव शक्य होऊ शकलं नाही.

आता याच कंपनीसोबत बिजनेस करण्यासाठी अदानी सरसावले आहेत. अदानी समूह सौदी अरामको कंपनीसोबत भागीदारीची शक्यता शोधत आहे. यामध्ये सौदी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा समावेश असून त्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक बोलणी झाली आहेत. तर यामध्ये सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाचा अरामकोमधील हिस्सा खरेदी करण्याबाबतही चर्चा झाली, असल्याचं सांगण्यात येतंय.

आता या प्रकरणात झालंय असं, सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे हे आपल्याला माहीतच आहे. याने तेल, इंधन खूप महाग झालंय आणि त्याचा तुटवडा भासण्याची चिन्ह आहे. तर देशात मोठी तेलाची मागणी आहे. ज्यामुळे सौदी अरेबियाकडे लक्ष लागलं आहे आणि नेमकं अशा परिस्थितीमध्ये देश येण्याच्या काही काळापूर्वीच म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये अंबानींनी ही तेल कंपनीची डील सोडली. आता हाच चान्स अदानींनी धरलाय.

हा पहिला मुद्दा जिथे अदानी अंबानींना ओव्हरटेक कसं करतात हे दिसतं…

दुसरा मुद्दा म्हणजे इलेक्ट्रिक व्हेईकल बिजनेस.

जानेवारीमध्ये आलेल्या वृत्तानुसार अदानी समूहाने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. यासाठी ग्रुपशी संबंधित असलेल्या एसबी अदानी फॅमिली ट्रस्टने ‘अदानी’ नावाने ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे. शिवाय प्लॅननुसार त्यांनी मार्गक्रमण करण्यास सुरुवातही केलीये. जरी समूहाने अजून कोणत्याच ऑटोमोबाईल लॉन्चची घोषणा केलेली नसली तरी इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेईकलवर लक्ष मात्र त्यांनी केंद्रित केलं आहे.

प्लॅननुसार कंपनी सगळ्यात पहिले स्वतःच्या वापरासाठी गाड्या बनवणार आहे. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक आणि इलेक्ट्रिक कोच यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे, असं समूहाने सांगितलंय.

या घटनेत झालंय असं इलॉन मस्क यांनी भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स लॉन्च करण्याच्या प्रयत्नांना गती दिली आहे. त्यानुसार त्यांची भारत सरकारसोबत चर्चा सुरु आहे. अनेक राज्य सरकारं त्यांना आमंत्रित करत आहेत. अशात स्वस्तात इलेक्ट्रिक वाहन मिळतील का? म्हणून सगळ्यांचं लक्ष अदानींच्या इलेक्ट्रिक गाड्या कधी मार्केटमध्ये येतात याकडे लक्ष लागलं आहे.

स्वस्त इलेक्ट्रिक गाड्यांची ग्राहकांची गरज ओळखून अदानी या बिजनेसमध्ये उतरल्याचे दिसतंय.

तिसरा बिजनेस तो ज्याच्या जोरावर अदानी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात उतरलेत. म्हणजेच ग्रीन एनर्जी बिजनेस.

जानेवारीत अदानी ग्रीन एनर्जी समूहाच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू तीन लाख करोड इतकी झाली होती. तर या कंपनीवर अदानींचा इतका भर आहे की ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अदानी समूहाने अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच ANIL नावाची नवीन कंपनी देखील स्थापन केली आहे. ANIL सोलार मॉड्यूल, बॅटरी, इलेक्ट्रोलायझर्स आणि विंड टर्बाइन्स तसंच ग्रीन हायड्रोजन जनरेटर अशा इतर ग्रीन एनर्जी प्रकल्पांसाठी लागणारे मुख्य घटक तयार करणार आहे.

याचीच दुसरी कडी म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL). ही कंपनी तिचा रिन्यूएबल एनर्जी खरेदीचा हिस्सा सध्याच्या ३ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत ३० टक्क्यांवर नेण्याची योजना आखतीये. आणि २०३० पर्यंत ७० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तयारी आहे.

हे सर्व अदानी करताय ते हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर. सध्या क्लायमेट चेंज खूप मोठी समस्या बनून जगासमोर उभी आहे. अशात ग्रीन एनर्जी सगळ्यात त्यावर उपाय असल्याने अदानींनी या व्यवसायात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. फक्त भारतचं नाही तर इतर देशांसोबतही त्यांचा हा व्यवसाय विस्तारला आहे.

चौथा बिजनेस आहे पोर्ट्सचा.

अदानी यांनी पोर्टसमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आयात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बंदारांवर सध्या अदानींनी आपलं अधिराज्य प्रस्थापित केलंय. त्यांची देशभरात जवळपास १३ बंदर असून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या आठ सागरी किनारा लाभलेल्या राज्यांत ती आहेत.

तर भारतातील सर्वात मोठं व्यावसायिक बंदर म्हणजे मुंद्रा बंदराचे ऑपरेटर असल्याचा मान अदानींनी मिळवलाय. देशाच्या वाढत्या व्यापार धोरणात अदानी सध्या योगदान देत आहोत. त्यांचे सगळेच बंदर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. अदांनींनीच नितीश कुमार रेल्वे मंत्री असताना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना देशातील मुख्य बंदरे रेल्वेशी जोडणाऱ्या योजनेचं राष्ट्रीय महत्व पटवून दिलं होतं. ज्यामुळे नंतर सरकारचं बंदर-रेल्वे जोडणीचं धोरण आखण्यात आलं होतं.

देशाचा इतर देशांशी व्यवहार होणं हे सुदृढ आतंरराष्ट्रीय संबंधासाठी गरजेचं असतं. नेमकं हेच अदानींनी टिपलं आणि या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते आजवर कायम आहे. अदानी त्यांच्या बंदरांना अधिकाधिक कार्यक्षम बनवत प्रायव्हेट क्षेत्रातही सगळ्यात बलाढ्य बंदर ऑपरेटर म्हणून नावारूपाला आले आहेत.

पाचवा बिजनेस म्हणजे एअरपोर्ट्सचा.

ज्याप्रकारे पोर्ट्सच्या माध्यमातून अदानींनी आंतरराष्ट्रीय व्यापारात हात घातला आहे. अगदी त्याचाच एक भाग म्हणजे अदानी एअरपोर्ट्स. अदानी यांचे भारतभरात ७ ठिकाणी एअरपोर्ट्स आहेत. ज्यात मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमचा समावेश आहे. त्यांच्या या सेवेमध्ये प्रवाशांची ने-आण तर असतेच मात्र सोबतच मालाची देखील वाहतूक होते. तशी कार्गो व्यवस्था करण्यात आली आहे.

फक्त गेल्या तीन वर्षांत अदानींनी भारताच्या जवळपास एक चतुर्थांश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवलं आहे.

अशाप्रकारे साध्याच्या आकड्यांवर लक्ष ठेवून भविष्यातील गणितं काय असतील हे ओळखणं ही अदानींची बिजनेस स्ट्रॅटेजी आहे. याच स्ट्रॅटेजीमुळे त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी हातोडा मारता येतो. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला योग्य वेळ साधता येणं खूप गरजेचं असतं. आणि नेमकं हेच गौतम अदानींना बरोबर जमतं.

म्हणून तर इतक्या कमी काळात त्यांनी अदानींनी ओव्हरटेक केलं आहे आणि आज सगळ्यात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.