कोरोना काळात फायद्यात असलेला माणूस, २५ हजार कोटींची कंपनी विकत घेतलीय…

कोरोना काळात एका बाजूला उद्योग-धंदा बंद असल्यामुळे अनेकांचा अक्षरशः बाजार उठला आहे. लोकांना २ वेळचं खाण्यासाठी खाण्यासाठी झगडावं लागत आहे, तर जे आजारी आहेत किंवा पॉजिटिव्ह आहेत त्यांना हॉस्पिटल आणि उपचारांनी घाईला आणलं आहे. त्यामुळे एकूणच काय तर सध्या फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे.

पण दुसऱ्या बाजूला याच काळात बाजार न उठलेली देखील काही लोक आहेत. त्यांना कोरोनाचा आणि एकूणच सद्य परिस्थितीचा कोणताही फटका बसलेला दिसत नाही. उलट फायद्यातच आहेत. अशी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोक असली तरी त्यापैकीच एक नाव म्हणजे अदानी ग्रुपचे

गौतम अदानी.

गौतम अदानी यांच्या बाबतीमधील ताजी बातमी सांगायची म्हंटलं तर त्यांच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिडेट या कंपनीने एसबी एनर्जी या कंपनीला खरेदी केलं आहे. आता ही एवढी मोठी कंपनी खरेदी केली म्हणजे किंमत थोडी नसणार हे साहजिकचं. हा करार झालाय तब्बल ३.५ अब्ज डॉलर. म्हणजे भारतीय रुपयांत सांगायचं तर जवळपास २५ हजार कोटी रुपये.

जर आजपर्यंतचा इतिहास बघितला तर रिन्यूएबल सेक्टरमधला हा सगळ्यात मोठा करार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये टाटा पॉवरने वेलस्पन एनर्जीच्या रिन्यूएबल कंपनीला १० हजार कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्यानंतर आता अदानी यांनी २५ हजार कोटींना कंपनी विकत घेतली आहे. 

आज म्हणजे बुधवारी सकाळी या संदर्भातील औपचारिक घोषणा करण्यात आली.

याआधी एसबी एनर्जी कंपनीची कॅनडियन पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाशी चर्चा सुरु होती, पण व्हॅल्युएशनवरून या दोघांची चर्चा फिस्कटली आणि गौतम अदानी यांनी नंबर मारला. वेगाने चर्चा करून अदानी ग्रीन एनर्जीने एसबी एनर्जीमधील सॉफ्टबँक ग्रुपचे ८० टक्के शेअर्स आणि भरती ग्रुपचे २० टक्के शेअर्स असे १०० टक्के शेअर्स घेऊन कंपनी खरेदी केली.

असे होते एसबी एनर्जीचे भारतातील साम्राज्य… 

एसबी एनर्जी इंडिया जवळ सध्या भारतातील ४ राज्यांमध्ये ४ हजार ९५४ मेगावॅटची एकूण रिन्यूएबल क्षमता आहे. यात जवळपास ८४ टक्के म्हणजे ४ हजार १८० मेगावॅट सौर ऊर्जा, ९ टक्के म्हणजे ४५० मेगावॅट पवन आणि सौर अशा हायब्रीड क्षमता तर ७ टक्के म्हणजे ३२४ मेगावॅट पवन ऊर्जेचा समावेश आहे. सोबत इतर देखील संपत्ती आहे.

यात १ हजार ४०० मेगावॅट सौर ऊर्जा चालू स्थितीमध्ये आहे तर ३ हजार ५५४ मेगावॅटची योजना निर्मितीच्या टप्प्यावर आहे. सौर ऊर्जेसंबंधी योजनांचा विकास, नियमन आणि नियंत्रण यासाठी सर्वोत्कृष्ठ संस्था म्हणून एसबी एनर्जीला ओळखलं जातं होतं.  

या सगळ्या योजनांसोबत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या संस्थांनी वीज खरेदीसाठी २५ वर्षांचा करार केला आहे.

या सगळ्याची व्हॅल्युएशन जवळपास २५ हजार कोटी रुपयांच्या घरात करण्यात आलं आहे.

या कराराचा अदानींना कसा आणि काय फायदा होणार?

या अधिग्रहणांनंतर वर सांगितलेलं एसबी एनर्जीचे सर्व साम्राज्य अदानी ग्रीन एनर्जीच्या नावे होणार आहे. तर कंपनीला साधारण ४ हजार ९५४ मेगावॅट क्षमतेचा फायदा होणार आहे. तर कंपनीची एकूण रिन्यूएबल क्षमता २४.३ गीगावॅट (२४ हजार ३०० मेगावॅट) होणार आहे, तर ऑपरेशनला क्षमता ४.९ गीगावॅट पर्यंत जाणार आहे. 

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सला चांगलेच पंख फुटले…

या अधिग्रहनाच्या बातमीनंतर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सला चांगलेच पंख फुटलेले बघायला मिळाले. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी अदानी ग्रीनचा शेअर्स ४४.३० अंकांनी वर १२४३.०५ पर्यंत पोहोचला होता. तर यापूर्वी हा शेअर्स ११९८.७५ वर बंद झाला होता. याआधी सलग २ दिवस ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट देखील लागलं होतं. सद्यस्थितीमध्ये कंपनीचं एकूण बाजारमूल्य १ लाख ९५ हजार कोटी रुपये आहे.

२०३० पर्यंत अदानीनां जगातील सर्वात मोठी रिन्युएबल कंपनी बनवायची आहे…

या बाबतीत गौतम अदानी यांनी सांगितलं कि,

हे अधिग्रहण जानेवारी २०२० मध्ये आम्ही सांगितलेल्या आमच्या ध्येयाच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे. आम्हाला २०२५ पर्यंत जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा कंपनी बनवायची आहे. यात जवळपास २५ हजार मेगावॅटचं लक्ष ठेवण्यात आलं आहे, आणि यापासून केवळ ७०० मेगावॅट लांब आहोत. 

त्यानंतर २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी रिन्यूएबल कंपनी बनवण्याची योजना आखली आहे, याच मार्गाने जातं राहिलो तर ठरवलेल्या वेळेपेक्षा कदाचित ४ वर्ष आधीच आम्ही हे ध्येय गाठू शकतो. त्यामुळे एकूणच पुढच्या काही दिवसात अदानी ग्रीन एनर्जी वाऱ्याच्या वेगाने पुढे जाताना दिसणार यात शंका नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.