‘अधिक’ काय सांगावे…

गोष्ट नव्वदच्या दशकातली आहे. नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र शिकताना आपल्यापैकी प्रत्येकाला प्रश्न पडतो तसाच एक प्रश्न एका मुलाला पडला,

“काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे मग घटनेने त्यांनाचं विशेष दर्जा का दिलाय? त्यांच्या साठी वेगळे कायदे का? काश्मिरी पंडितांना आपली घरे सोडून तिथून पळवून का लावलं गेलं?”

असे अनेक प्रश्न विचारून तो आपल्या शिक्षकांना भंडावून सोडायचा. शिक्षक एक वेगळचं सांगायचे. कट्ट्यावर सोबत बसणारे मित्र काही वेगळंच सांगायचे, कॉलेजमध्ये असणारी काश्मिरी मुले काही वेगळीच बाजू सांगायची. मग कधी पुण्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडित कुटुंबाना भेटून त्यांच्याकडून काही माहिती घेऊन यायचा.

काश्मीरने त्याला भारावून टाकलं होतं. काही प्रश्नांची उत्तरं मिळत होती तर काही प्रश्न नव्याने समोर उभे राहत होते. कॉलेजमध्ये प्रोफेसर सुद्धा त्याच्या प्रश्नांना कंटाळले. शेवटी त्यांनी त्याला सांगितलं,

“तू सरळ काश्मीरला जाऊन बघून ये.”

मुळचा अहमदनगरचा पण शिकायला पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये असलेला हा अधिक कदम. आपल्या मित्रांना घेऊन काश्मीरच्या पंधरा दिवसांच्या अभ्यासभेटीला आला. वर्ष होतं १९९६. तिथ काश्मीर मधल्या खोऱ्यात फिरला. जेवढ फिरेल तेवढा काश्मीरच्या आणखी प्रेमात पडत होता. पंधरा दिवसांचा दौरा साडेतीन महिने लांबला. पण याच साडेतीन महिन्यांनी त्याच आयुष्य बदलून टाकलं.

पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखले जाणारे काश्मीर पण तिथे दहशतवाद, गरिबी बेकारी या प्रश्नांनी पोखरून काढले आहे. युनिसेफ शस्त्रसंघर्षात होरपळलेल्या लहान मुलाचं सर्वेक्षण करत होती. या कामात अधिक कदम देखील सामील झाला. याकाळात त्याने अनेक घटना पाहिल्या हत्या, छळ, अत्याचार, अनाथ मुले, हे सगळ पाहून धक्का बसलेल्या अधिकला जाणवलं की या मुलांच्या शिक्षणासाठी काही तरी केलं तर अनेक प्रश्न सुटतील.

हाच तो क्षण जेव्हा त्याने ठरवले की आपण काश्मीर मध्ये येऊन राहायचे आणि काम करायचं.

त्यातूनच जन्माला आली बॉर्डरलेस फौंडेशन आणि बसेरा ए तब्बसुम. बसेरा ए तबस्सुम म्हणजे आनंदाचं घर. हे एक बालिकाश्रम आहे. अनाथ मुलींसाठी राहण्याचा, शिक्षणाचा सहारा. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच खास मुलींसाठी अनाथाश्रम सुरु करण्यात आलं होतं तेही कुपवाडा सारख्या कायम युद्धमय स्थिती असणाऱ्या जिल्ह्यात.

पण अधिक तिथे गेला आणि सगळ सहज सोप्या रीतीने उभ राहिलं असं नव्हे.

सुरवातीला तिथ जेवणापासून ते राहण्यापर्यंत अनेक प्रश्न होते. दूर महाराष्ट्रातून आलेल्या या हिंदू युवकावर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. हे धर्मांतर करायला आले आहेत आणि मुलीना पळवायसाठी आलेत. अशा अनेक गैरसमजुती बाळगल्या जायच्या. अखेर कोणीतरी भल्या माणसाने त्यांना आसरा दिला. तिथून पुढे हा सिलसिला चालू झाला. आज बावीस- तेवीस वर्षे झाली अधिककडे काश्मीरमध्ये स्वतःचं घर नाही. बालीकाश्रमात मुली असल्यामुळे तिथेही राहण शक्य नाही. तो आजही वेगवेगळ्या काश्मिरी कुटुंबाकडे मुक्काम करतो.

borderless world foundation adhik kadam 1

दहशतवाद्यापासून ते मुल्ला मौलवींचे फतवे यांना भिक न घालता सर्वसामान्य काश्मिरींनी अधिकला आपलं मानलं. तो जे काम करतोय त्यातला प्रामाणिकपणा समजावून घेतला. त्याच्या कामात अडचणी न येऊ देता त्याला मदत करण्याचेच काम आज हजारो काश्मिरी कुटुंब करताना दिसतात.

अवघ्या दोन मुलींसह सुरु झालेल्या या संस्थेत आज लहान बाळापासून सतरा अठरा वर्षांच्या शेकडो मुली आहेत. त्यांच्या वह्या पुस्तकांपासून ते उच्चशिक्षणाची जबाबदारी अधिक कदमने उचललेली आहे.यासाठी लागणारा सर्व पैसा महाराष्ट्रातून अनेक मराठी बांधव उभे करून अधिकला सोपवतात. कुपवाडय़ाच्या केंद्रात छोटेखानी उद्योग केंद्रही चालवले जाते. सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणे, कपडय़ांवर एम्ब्रॉयडरी करणे यांसारखे प्रकल्पही चालवले जातात. कमवा शिकाच्या माध्यमातून मुलीना स्वावलंबी बनवण्याचं काम सुरु आहे. 

२००६ सालची एक घटना. सकाळची वेळ.

अधिक एका गावात काही मुलीना गणित शिकवायचं काम करत होता. त्याला कोणीतरी सांगितलं तुम्हाला भेटायला तीनजण आले आहेत. ते अतिरेकी होते.  गावकऱ्यांनी त्या अतिरेक्यांना पाहूनच ओळखलं की आज आपल्या अधिक भैय्याच काही खरं नाही. अधिकला काही ठाऊकच नव्हतं. ते तिघे आले, त्यांनी अधिकची सखोल चौकशी केली. तासभर थांबले आणि निघून गेले.

पुढे काही दिवसांनी एक महिला अधिकच्या संस्थेत आली आणि माझ्या मुलीला अॅडमिशन द्या म्हणून विनवणी करू लागली. पुढे चौकशी केल्यावर तिने सांगितलेली कहाणी थक्क करणारी होती. ती महिला म्हणजे अधिकला भेटायला आलेल्या अतिरेक्याची बायको होती. काही दिवसापूर्वी तो हिजबुल मुजाहिद्दीन चा कमांडर असेला अतिरेकी तिला भेटायला आला होता आणि त्याने जाता जाता तिला सांगितलं होतं,

“मै तो गलत रास्ते निकल चुका हुं. अगर मुझे कुछ हो जाता है तो अपनी बेटी का इधर अॅडमिशन करना. उसका भला हो जाएगा. “

अधिकच्या कामाला याहून वेगळ्या कोणत्या पावतीची गरज नाही. त्याला एकोणीसवेळा वेगवेगळ्या अतिरेक्यांनी उचलून नेले, त्याला मारहाण केली पण त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यावर त्याला सोडून दिलं. आज कितीही कर्फ्यू असू दे अथवा आपत्कालीन स्थिती असू दे , अधिकच्या बॉर्डरलेस फौंडेशनची गाडी कोणीही अडवत नाही.

कारगिल युद्धापासून तो भारतीय जवानांच्या मदतीचीही खूप कामे करत आहे. त्याने काश्मीर लाईफ लाईन नावाच्या इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स सेवेची सुरवात केली आहे. सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफ ला दिलेल्या अॅम्ब्युलन्सनी अगणित लोकांचे, सैनिकांचे प्राण वाचू शकले आहेत. 

10387544 584391961706628 3413468440338768530 n

२०१६ साली काश्मीर मध्ये सर्वात मोठा कर्फ्यू लागला होता. त्यावेळी जवानांना दंगलीला रोखण्यासाठी पलेट गनचा वापर करायला लागला होता. याच्यामुळे कोणी मरत नाही फक्त थोडे फार खरचटते. पण जर हे पलेटस  डोळ्यात गेले तर डोळ्यांच्या नसांना इजा पोहचते, काही दिवसात ऑपरेशन झाले नाही तर माणूस पूर्णपणे आंधळा होतो.

कोणीतरी अधिकला विनंती केली या भरकटलेल्या तरुणानां जर परत प्रवाहात आणायचे झाले तर त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. जर त्यांना तसेच वार्यावर सोडले तर यातून आणखी अतिरेकी नव्याने जन्म घेतील. अधिकने देशभरातून नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम बोलवून घेतली. या टीमने सहा महिन्यात अशा हजारो तरुणांवर शस्त्रक्रिया केली.

आज अधिक आणि त्याची ही बॉर्डरलेस फौंडेशन संस्था काश्मीरच्या तरुणाईला शांततेने जगण्यासाठी प्रेरित करीत आहेत. तिथली एक अख्खी पिढी अतिरेकी होण्यापासून त्यांनी वाचवली आहे. याचा फायदा शेवटी देशाच्या सुरक्षिततेला, भवितव्याला होणार आहे यात काही वादच नाही. 

20663708 1224991797646638 1873276662835576775 n

विशेष म्हणजे एवढा सगळा डोलारा उभा करणारा अधिक एक पैसाही मोबदला घेत नाही. आजही त्याचे आईवडील गावी पत्र्याच्या घरात राहतात. त्याची लढाई संपलेली नाही. मृत्यूची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर सदैव राहिल. एखाद्या वाहून घेतलेल्या संन्यासाप्रमाणे अधिकची एकाकी धडपड सुरूच आहे.

असा हा जातधर्म प्रांत यांच्या सीमापार गेलेला अधिक कदम कोण होणार मराठी करोडपती या शोच्या कर्मवीर स्पेशल भागात येतोय. त्यात त्याचे आणखी अनुभव तो शेअर करेलच. पण सगळ्यात महत्वाच म्हणजे या गेम शो मध्ये तो जेवढी रक्कम जिंकेल ती रक्कम तो स्वतः साठी किंवा काश्मीरमधल्या आपल्या संस्थेसाठी नेणारं नाही तर ती रक्कम महाराष्ट्रातल्या शेतकर्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान करणार आहे. याचे कारण अधिक सांगतो की,

“इतकी वर्ष मला माझ्या मातीने, माझ्या माणसांनी काश्मीरमध्ये काम करण्यासाठी मदत केली, पैसा उभा केला पण मी त्याची परतफेड करू शकत नाही. मी कधी स्वतः पैसा कमावला नाही, या गेम मधून मी जो पैसा जिंकेन ती माझ्या आयुष्यातली पहिली कमाई आहे. हा पैसा मराठी मातीसाठी खर्च झाला तर काही प्रमाणात इथल्या माणसांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मला मिळेल. “

अधिक बद्दल अधिक काय सांगावे? अभिमान वाटतो भिडू.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.