आदिलशाहला आपल्या पायांचे ‘चुंबन’ घेण्यास मजबूर करणारा हंपीचा सम्राट

दख्खनेचा इतिहास अनेक गोष्टींमुळे आपल्याला आश्चर्यचकित करतो. कितीतरी घटना काळाच्या पडद्याआड लपून गेल्या आहेत, ज्यांचे दक्षिणेच्या इतिहासातील महत्व प्रचंड आहे. अशीच घडून गेलेली एक ऐतिहासिक घटना म्हणजे रायचूरचे युद्ध.

या युद्धात जिंकलेल्या एका हिंदू राजाने परकीय शासकाला हरवले आणि आपल्या पायांचे चुंबन घेण्याचे आदेश दिले होते.

इसवी सन 1520 च्या सुमारास बहमनी राज्य विजयनगर साम्राज्याच्या आधारावरच जगत होते. आपल्याच मुकुटातील हिरे विकून गुजराणा करावा काय, अशी परिस्थिती बहमनी सुलतानांवर येऊन ठेपली होती. आदिलशाह, निजामशाह आणि कुतुबशहा बहमनी राज्य वाटून घेण्यासाठी धडपडत होते. या अनागोंदीच्या परिस्थितीचा कृष्णदेवरायाने फायदा घेण्याचे ठरवले.

‘माझ्या राज्यातील एक व्यापारी पळून आदिलशाही प्रांतात घुसला आहे. तो माझ्या पैशांचे देणे लागतो. त्याचा नाश करणे, हे माझे कर्तव्य आहे.’

अशी सबब सांगून कृष्णदेवराय आदिलशहाचा मुलुखात, रायचूरमध्ये ससैन्य घुसला. रायचूरचा किल्ला म्हणजे प्रचंड बलाढ्य. त्यात आदिलशाहने किल्ल्याचे भौगोलिक महत्व जाणून किल्ल्यावर 200 मोठ्या बंदुका आणि असंख्य छोट्या बंदुका ठेवल्या. 30 मोठे गलोल सुद्धा सैन्याकडे होते. 8 हजारांची शिबंदी, 400 घोडदळ आणि 20 हत्ती एवढे सैनिक किल्ल्यावर तैनात असत. एकूणच काय, तर हा किल्ला जिंकणे प्रचंड अवघड गोष्ट होती.

पण कृष्णदेवराय दक्खनेच सम्राट. किल्ल्याच्या बाजूला येऊन थांबलेल्या कृष्णदेवरायाच्या फौजेत दीड हजार घोडेस्वार आणि 50 हजारांपेक्षा जास्त पायदळ सैनिक होते.

लढाईला तोंड फुटले. दिवसरात्र लढणाऱ्या सैनिकांच्या प्रेताने रायचूरचा परिसर भरून गेला होता. इकडे कृष्णदेवरायाने ससैन्य किल्ल्यावर आक्रमण केले. बंदुकीचा बार भरण्यास जेवढा वेळ लागत असे, तेवढ्या वेळात कृष्णदेवराय किल्ल्याजवळ पोहोचे. असे करत करत विजयनगरचे सैन्य किल्ल्यात घुसले. परिस्थिती कितपत चिघळली आहे, याचा अंदाज घेण्यासाठी इस्माईल आदिलशाहच्या सेनापतीने तटबंदीतुन आपले तोंड बाहेर काढताच एका गोळीने त्याचे मस्तक फुटले.

आदिलशाहचा दारुण पराभव झाला. आता त्याच्यासमोर तहाची बोलणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपला एक दूत कृष्णदेवरायकडे पाठवून इस्माईल आदिलशाहने तहाची बोलणी सुरू केली. त्या दूतास कृष्णदेवराय म्हणाला,

“इस्माईलच्या सर्व गोष्टी पूर्ण करताना आणि परत देताना मला नक्कीच आनंद होईल. पण जर यदाल्लकाओने (आदिलशाहने) येऊन आमच्या पायांचे चुंबन घेतले, तरच..”

हा कृष्णदेवरायने उघड उघड केलेला अपमान होता. इस्माईल आदिलशाहला या गोष्टीचा प्रचंड राग आला पण कृष्णदेवरायसमोर त्याचे काहीही चालणार नव्हते.

पण, इस्माईलच्या उत्तराची वाटही न पाहता, कृष्णदेवराय त्याच्या राजधानीकडे चालू लागले. आता मात्र इस्माईलचे धाबे दणाणले. आपण समोर गेलो, तर पायांचे चुंबन घ्यावे लागेल. आणि जर नाही घेतले, तर कदाचित आपले अस्तित्वच आज संपेल अशी भीती त्याला वाटत होती.

शेवटी, इस्माईल आदिलशाहने तिसरा मार्ग स्वीकारला आणि तो पळून गेला. इकडे कृष्णदेवरायाने साऱ्या दख्खनेत आपल्या सामर्थ्याची दवंडी पिटली. एका परकीय शासनकर्त्याला आपल्या पराक्रमाने पायांचे चुम्बन घेण्याची वेळ त्याने आणली होती. इकडे, दक्षिणेतील सर्वोत्तम शहर म्हणून लौकिक असलेल्या विजापूर पूर्ण जळत होते. काही अवशेष सोडल्यास, कृष्णदेवरायाच्या सैन्याने काहीच शिल्लक ठेवले नाही. हंपीच्या सम्राटाने आदिलशाहीला मुळातून उखडले होते.

पुढे, बहमनी राज्याच्या सुलतानाला कृष्णदेवरायाने गादीवर बसवले. जर रायचूरचे युद्ध झाले नसते, तर सन 1520 मधेच बहमनी सुलतानाला अंधारात गुपचूप मक्केला पळून जाण्याची वेळ आली असती. या एकाच गोष्टीमुळे कृष्णदेवरायास ‘यवनराज्यस्थापन आचार्य’ ही पदवी मिळाली.

अशी ही गोष्ट.. एका हिंदू राजाने आदिलशाहला आपल्या पराक्रमाने लोटांगण घालायला लावले आणि आपल्या पायांचे चुंबन घेण्यास मजबूर केले.. पुढे दीडशे वर्षांनी या आदिलशाहीला दख्खनेत अशाच एका धुरंधर राजाने लोटांगण घेण्यास भाग पाडले, त्या पराक्रमी सम्राटाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज’

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.