सरस्वतीचा भक्त असलेल्या आदिलशाहने विजापूरचे नाव विद्यानगर केलेलं

सुलतान म्हटल्यावर गादीसाठी खून खराबा, डोळे फोडायच्या शिक्षा आणि युद्धात होणारी कत्तल एवढचं  तुम्हाला आठवत असेल तर तुमच काय जास्त चुकत नाहीए. आपल्याला जवळपास सगळीकडे अश्याच खुंखार कहाण्या सांगीतल्या गेल्यात.  त्यामुळं आता इब्राहिम आदिलशाह दुसरा हा शांतताप्रिया होता, अहिंसाप्रिय होता असं जास्तीचं ग्यान देणार नाहीए.  तुम्हाला फक्त बादशाहची एक दुसरी बाजू सांगनाराय जी ह्या आधी तुम्ही कधीच ऐकली नसणार.

इब्राहिम आदिलशाह दुसरा हा आदिलशाहीतील सगळ्यात यशस्वी बादशाह म्हणून ओळखला जातो. त्यामुळं तो पराक्रमी असणार, राज्यकारभारात तरबेज असणार हे काय वेगळा सांगायला नको. पण बादशहा जेव्हा संगीतात साहित्यात रमायचा त्याचं दुसरंच रुपडं पाहायला मिळायचं. संगीतावरच्या प्रेमातून बादशहाना ‘किताब ए नौरस’ हे पुस्तक लिहलं होतं.  या पुस्तकाच्या सुरवात जरा बघाच

भाका न्यारी भाव एक

कहा तुर्क कहा ब्राम्हण

नौरस सूर जुगा जोती

आणि सरोगुनी युसात सरसुती माता

इब्राहिम परसादा भायी दुनी

याचा मतितार्थ आहे भाषेने  वेगळे असलेले तुर्क आणि ब्राह्मण भावनेने मात्र एक आहेत. आई सरस्वती तुझा आशीर्वाद असलेले हे नौरास पुस्तक चिरंतर राहील. होय सरस्वती तुम्ही बरोबर वाचलंय! विद्या आणि संगीताची देवता असणाऱ्या सरस्वतीचा बादशाह मोठा भक्त होता.

आपली आई सरस्वती तर वडील गणपती असल्याचं  बादशाह अभिमानाने म्हणत असे.

सरस्वती असणाऱ्या प्रेमापोटीच बादशहाने विजापूरचे नामकरण ‘विज्ञानगर’ करून टाकले होते असा उल्लेख मनू पिल्लई यांच्या  ‘रिबेल सुल्तानस्’ या पुस्तकात सापडतो. ‘किताब ए नौरस’ या पुस्तकातून बादशाहवर असलेला शिव-पार्वती, रामायण , महाभारत यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.    

बादशाह मराठी, कन्नड, तेलगू , संस्कृत या भाषांमध्ये तरबेज होता. या भाषा बोलणारी लोकं आपल्या राज्यात असल्याने या सर्व भाषा त्याने शिकल्या होत्या. मराठे आदिलशाही दरबारात पहिल्यापासूनच होते हे तर आपल्याला माहीतच आहे. बादशहाने फारशी भाषेऐवजी दक्खनी हि भाषा दरबारची भाषा ठेवल्याने मराठयांना फायदा झाला होता. मराठा सरदारांना  दक्खनी भाषेशी जुळवून घेणे सोपे जात होते. त्यामुळेच मराठा सरदारांचे आदिलशाही दरबारात प्राबल्या होते. एकदा अदिलशाही दरबारात असलेल्या मराठीच्या दबदब्यामुळं मुघलदूतही  गडबडला होता.

आता आपला बादशाह आपली भाषा बोलतो, आपल्या धर्माबद्दल आस्था बाळगतो म्हटल्यावर जनताही बादशाहबद्दल आदर ठेवून होती त्यामुळंच जनतेने बादशहाला ‘जगद्गुरू’ हि पदवी दिली होती.

एका मुस्लिम बादशहाला जनतेने ‘जगदगुरु’ हि पदवी देणे बादशाहाच्या जनतेशी असणाऱ्या संबंधांविषयी बरचं काही सांगून जातं.  

मात्र सुन्नी मुस्लिम असणाऱ्या बादशाहला या  ‘लिबरल’ वागण्यामुळं रोषही पत्करावा लागला होता. संगीत इस्लाममध्ये ‘हराम’ असं मानणाऱ्यांनी बादशहाला नामोहरम करून ठेवले होते. मात्र बादशाह आपल्या तत्वांवर कायम होता.  

विशेषतः हिंदू, ख्रिश्चन या धर्मांना इस्लामच्या बरोबरीने वागणूक दिल्याने बादशहाच्या धर्मनिष्ठठेवरच शंका उपस्थित केल्या गेल्या. बादशहाच्या मृत्यूनंतरही त्याला आपण धर्माचे खरे पाईक असल्याचे सांगावे लागेले. ‘तो ख्रिश्चन नव्हता ना मूर्तिपूजक तर तो शुद्ध मुसलमान होता’ असं  त्याच्या समाधीवर लिहण्यात आलंय. आता हे बादशहाणं तर नाही लिहलय कारण आयुष्यभर आपल्या टीकाकारांना फाट्यावर मारत बादशहा आपल्या मर्जीने आयुष्य जगत राहिला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.