वाडवडिलांनी मिळवलेलं जपणं… दोघांच्या आयुष्यात या ४ गोष्टी सेमच चालूयत

देशातील राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर, सद्या राहुल गांधींच्या नेतृत्वात चालू असलेलं काँग्रेसचं आंदोलन ट्रेंड करतंय.

महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवर लावलेली जीएसटी, तपास यंत्रणाचा गैरवापर या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेली आहे. स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व दाखवून देण्यात काँग्रेस या आंदोलनाच्या निमित्ताने धडपड करतंय.

तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली, तर एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे सर्वात मोठा धक्का ठाकरे घराण्याच्या राजकारणाला बसलेला आहे. पक्षाची पडझड रोखण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सोबतच आदित्य ठाकरे मैदानात उतरले.  

तिकडे राहुल गांधी स्वतःच्या पक्षासाठी मैदानात उतरलेत तर इकडे आदित्य ठाकरे. दोन्ही नेत्यांना मोठ्या राजकीय घराण्याची पार्श्वभूमी. मात्र आज या दोन्ही नेत्यांचा दोघांचा समांतर लढा चालूये.  

त्यांच्या संघर्षाचे मुद्दे काही प्रमाणात समानच असल्याचे दिसून येतात त्याच मुद्द्यांवर चर्चा करूयात.

१. दोघांच्याही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न.  

संपूर्ण देशपातळीवर एकहाती सत्ता असलेला काँग्रेस पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढतोय तर दुसरीकडे प्रादेशिक पातळीवर शिवसेनेच्याही पुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी गटांगळ्या खातायेत.

२०१८ मध्ये पक्षाने ३ राज्यात कशी बशी सत्ता मिळवली असली तरीही अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस कुठेच निवडून आली शिवाय काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं पंजाब राज्य देखील पक्षाच्या हातून गेलं यात पक्षाचं गांधी नेतृत्व कमी पडल्याचा ठपका ठेवला. जिथं एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती अशा पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसने उतरायची हिंमत केली नाही.

काँग्रेस पक्षाला मागच्या २ वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्ष नाही, अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंब सोडून यांना चेहरा मिळत नाहीये, इतकी वाईट वेळ पक्षावर आलेली आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेना पुन्हा आपलं प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आज शिवसेनेत उद्धव ठाकरेंबरोबर ५५ आमदारांपैकी आज केवळ १६ आमदार राहिले आहेत. 

तसं तर राष्ट्रीय पक्ष म्हणून शिवसेना नावालाच आहे. आपला प्रादेशिक पातळीवरचं अस्तित्व अजून टिकवण्यामागे सेनेला मोठी मेहनत करावी लागणार आहे. कारण शिवसेना राज्यात एकहाती सत्ता आणायच्या वल्गना करत असली तरी त्यांना ते शक्य नाही. शिंदे गटाच्या बंडात सामील होत सेनेतली आक्रमक माणसं बाहेर पडली. 

शिवसेनेला आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. 

त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा काढत आहेत, ग्रामीण महाराष्ट्रात दौरे काढून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

२. दोघांनाही लेगसी सिद्ध करायला लागेल. 

आता लेगसी म्हणजे काय तर घराण्याच्या नावाचा दबदबा कायम ठेवावा लागेल.

भारतीय राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा आला कि पाहिलं नाव काँग्रेसचंच काढलं जातं. पंडित नेहरू-  इंदिरा गांधी- राजीव गांधी आणि आता राहुल गांधी अशी पिढी काँग्रेसचं नेतृत्व करत आली. प्रत्येक ‘गांधी’ने काँग्रेसचा विस्तारच केला मात्र राहुल गांधींकडे पक्षाची धुरा आली तेंव्हापासून पक्षाच्या पडझडीला सुरुवात झाली  सद्या तरी खमक्या ‘गांधी’ म्हणून ते समोर आलेले दिसतायेत.

गांधींचे खरे वारसदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी तसेच सहानुभूती आणि राजकीय पुनरागमन करण्यासाठी राहुल गांधी यांना अनेक संधी येत आहेत. याच संधींचा फायदा घेत त्यांना काँग्रेसला फक्त गांधीच वाचवू शकते असं पर्सेप्शन निर्माण करत स्वतःची ‘लेगसी’ सिद्ध करायला लागेल.   

आदित्य ठाकरेंचं बघायचं तर, 

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ती सावरण्याचा आणि सेना पुन्हा नव्याने उभारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असून त्यात आदित्य ठाकरेंची भूमिका खरी महत्वाची ठरत आहेत.

शिवाय आदित्य ठाकरेंच्या पुढे ठाकरे’ असण्याची नैतिक जबाबदारी पार पाडण्याचं आव्हान आहे, ‘ठाकरे’ नेतृत्व म्हणून समोर येणं, ठाकरे नावाचा राज्यात असलेला दबदबा आणि ताकद पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.   

३. कुटुंब.

ठाकरे कुटुंबाची गोष्ट बघायची झाली तर, 

शिवसेनेला पहिल्यांदाच बंडखोरीचा सामना करावा लागत नाहीय, याआधी देखील पक्षात बंडखोरी झालीय. यावेळी परिस्थिती आणखी बिकट होताना दिसत आहे. शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदेंनी आणि बंडखोर आमदारांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान दिलं. हे बंड  शिवसेनेत झालं असलं तरीही याचे परिणाम कौटुंबिक पातळीवर झालेत. ठाकरे घराण्याशी असलेले आमदारांचे कौटुंबिक संबंध खराब झाले.

राहिलेली शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरे कुटूंबाला मैदानात उतरावं लागलं. बंडखोर आमदारांना माघारी आणण्यात जिथे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न संपले होते तिथे रश्मी ठाकरे ह्या वेगळ्या पध्दतीने भूमिका निभावली, त्यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना संपर्क साधला होता. 

उद्धव ठाकरे मधल्या काही काळात आजारी होते त्या काळात त्यांचं पक्षाकडे दुर्लक्ष झालं. याच  आजारपणाच्या काळात हे बंड शिजल्याचा आरोप आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर करतायेत. बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंवर ते पक्षातील नेत्यांना भेटता नव्हते अशी टीका केली. 

तर दुसरीकडे गांधी कुटुंबात सोनिया गांधी आजारी आहेत. 

तशा त्या गेल्या कित्येक वर्षांपासून कँसरशी लढा देत आहेत. त्यांच्या याच आजारपण आणि तब्येतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक व्यासपीठांपासून दूरच आहेत. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ५ विधानसभा निवडणुकांमधील प्रचार मोहिमांमध्ये देखील सहभाग घेतला नव्हता. पक्षाचा अध्यक्ष प्रत्यक्ष प्रचारात नसणं ही कदाचित क्वचितच घडणारी गोष्ट असावी. त्यामुळेच पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्यावा यासाठी पक्षातून अनेकदा मागणी करण्यात आली आहे.

याचाच परिणाम म्हणून २०१४ पासून गांधी परिवाराला अनेक राजकीय धक्के बसले आहेत. कितीतरी दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. 

गांधी कुटुंबाला पक्षातील अंतर्गत कलहासोबतच, नेत्यांचं नुकसान देखील सहन करावं लागत आहे. यात मागच्या काही काळात शत्रुघ्न सिन्हा, कृपाशंकर सिंग, जितन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया अशा अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. ही यादी बरीच मोठी आहे. हे सगळे नेते आपल्या आपल्या राज्यांमधील दिग्गज नेते होते याशिवाय गांधी घराण्याच्या जवळचे होते. त्याचा फटका काँग्रेसला बसतोय. 

 ४. स्वतःला पॉलिटिकली एस्टॅब्लिश करायचं आहे.

काँग्रेसचे ऑफिशियल अध्यक्ष नसताना देखील काँग्रेस आजही राहुल गांधींनाच आपला चेहरा म्हणून पुढं करत असते.

तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंना राजकारणात आणण्यासाठी युवा सेना स्थापन केली गेली. सद्या शिवसेना वाईट काळातून जात आहे, त्यात अशी चर्चा आहे कि, आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष पद देण्यात येईल. 

मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे कि, स्वतःला इस्टॅब्लिश करतांना या दोन्ही नेत्यांसमोरचा सर्वात महत्वाचा टास्क म्हणजे जनतेत जाण्याआधी यांना पक्षांतर्गत नेत्यांची मान्यता मिळणं महत्वाचं आहे.

राहुल गांधींना स्वतःचा पक्ष तर वाचवायचा आहेच शिवाय स्वतःला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून सिद्ध करायचं आहे. जरी ते ,मान्य करत नसतील तरी त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून त्या पातळीवर देखील स्वतःला सिद्ध करायचं आहे.

नेहरू-गांधी राजकीय घराण्याचे वारसदार राहुल गांधी यांच्यात सध्या आपण जे पाहतो ते या दोघांचे एक आकर्षक संमिश्रण आहे. गेल्या काही महिन्यांत राहुल गांधींना केंद्रस्थानी ठेवताना दिसत आहे.

आदित्य ठाकरेंचं पाहायचं तर, बाळासाहेबांचे नातू म्हणून आदित्य ठाकरे राज्यात दौरे काढत आहेत. चांगलेच आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला, सभांना, मेळाव्यांना झालेली गर्दी पाहता त्यांना मिळणारा प्रतिसाद असल्याचं चित्र आहे मात्र बंडखोर आमदारांनी आदित्य ठाकरेंची इमेज ही ‘डुप्लिकेट नेतृत्व’ वक्तव्य केलेत.

म्हणूनच आदित्य ठाकरेंना स्वतःची ‘पेज थ्री’ इमेज पुसून जनतेत मिसळणारं, लोकनेता म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहेत. त्याच नंतर ते पॉलिटिकली सेट होतील.

घराणेशाही कॉंग्रेसमध्ये आहे तशी सेनेत पण आहे. जेवढं गांधी हे आडनाव राहुल गांधींना उपयोगाचं आहे त्यापेक्षा जास्त ठाकरे हे आडनाव आदित्य ठाकरे यांना राज्यात तरी उपयोगाचं आहे, बाकी त्याचा उपयोग ते किती करून घेतील ये पुढील काळात कळेल.. यात प्रश्न फक्त त्यांच्या सातत्य आणि आक्रमतेचा आहे. 

असो तर दोन्ही नेते आणि या नेत्यांचा राजकीय संघर्ष पाहिल्यास त्यांच्यातला समांतर मुद्दा म्हणजे या दोन्ही कुटुंबाचा उदय झाला, कुटुंबाची सत्ता आली आणि गेली सुद्धा…हे दोन्ही पक्ष पुन्हा आपली सत्ता मिळणार का ? अस्तित्व सिद्ध करणार का हे येत्या काही काळात कळेलच. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.