आजही त्याला लोक विचारतात, पाकिस्तान सोडून भारताचा नागरिक का झालास ?

ऐ जमी रुक जाये, आसमा झुक जाये तेरा चेहरा जब नझर आये.

अदनान सामीच्या आवाजात एक नशा आहे. तो आला तेव्हा डोंगरासारखं त्याच शरीर बघून सगळ्यांनी त्याला खुळ्यात काढलेलं. गोविंदासोबतच लिफ्ट करा दे छप्पर तोड सुपरहिट झालेलं पण कोणाला माहित होतं की तो इथे येऊन इथलाच होऊन जाईल.

त्याचा जन्म खर तर इंग्लंडमध्ये झाला. अदनानचे वडील पूर्वी पाकिस्तानी एअरफोर्समध्ये मोठे अधिकारी होते. तिथून त्यांना झुल्फिकार अली भुट्टोनी इंग्लंडमधल्या पाकिस्तानी वकिलातीमध्ये पाठवलेल. तिथच या अदनानचा जन्म झाला.

घरातल्या सगळ्यांना त्याच्या लहानपणापासून ठाऊक होतं की या पोरात उपजतच काही तरी आहे.

तो गाणी मस्त म्हणायचा, सगळी वाद्य वाजवायचा. पियानो तर एवढ्या फास्ट वाजवायचा की लोकांचे डोळे फिरायचे. खर तर आज्जा पंज्यापासून सगळे मिल्ट्रीवाले पठाण असलेल्या या घरात हे गोल मटोल संगीतवेड पोर कस काय जन्माला आल होतं माहित नाही.

त्याची आई भारतातल्या जम्मूची. लहानपणापासून ख्रिसमसच्या सुट्टीत तो भारतात यायचा. इथे आला की सुप्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्मा यांच्याकडे शिकायला जायचा. अदनान 9 वर्षाचा असताना त्याची आई त्याला लंडनमध्ये झालेलं आर.डी.बर्मन यांचं कॉन्सर्ट बघायला घेऊन गेलेई. त्यादिवशी आशा भोसले यांचं गाण ऐकून तो खुळाच झाला.

त्यादिवशी त्या ९ वर्षाच्या मुलान ठरवलं आपण सुद्धा आता संगीतातच करीयर करायचं.

शाळेत तो हुशार होताच. त्याने लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून कायद्याच शिक्षण पूर्ण केलं आणि बरीस्टर बनला.पण तो पर्यंत संगीतात त्याच नाव जगभरात गाजत होतं. त्याच्या फास्ट पियानी वाजवण्यावरून अमेरिकेतही त्याची चर्चा झालेली. अदनानला जगातला सगळ्यात फास्ट पियानो प्लेअर म्हणून ओळखल जात होतं. युनेस्कोने अदनानने संगीत दिलेल्या एका गाण्याला पुरस्कार दिलेला.

अगदी लहानवयापासून अदनान सामी सेलिब्रेटी बनला. वयाच्या १५ वर्षापासून त्याचे गाण्याचे अल्बम निघत होते आणि ते हिट देखील होत होते.

पाकिस्तानमध्ये तर तो सुपरहिट होता. तिथे त्याने पहिला सिनेमा केला सरगम. यात त्याने गाणी गायली होती, संगीत दिलेलं मात्र तो या सिनेमाचा हिरो देखील होता. यात गाण्यासाठी त्याने आपल्या आदर्श असलेल्या आशा भोसलेना बोलावल होतं. जेव्हाया गाण्याचं लंडन मध्ये रेकोर्डिंग होत होतं तेव्हा आशाताई अदनानला म्हणाल्या,

“तुझ्यात एवढ टॅलेंट आहे, तू भारतात का गात नाहीस. हिंदी म्युजिक इंडस्ट्रीची राजधानी मुंबई आहे.”

अदनानला वाटल मुंबईट कोण आपल्या ओळखीच नाही. तिथ आपलं काय होणार. त्यापेक्षा आपला आपला पाकिस्तान बरा. पिक्चर हिट झाला. पण अदनानला पुढे काही सिनेमे मिळाले नाहीत. त्याच वाढत वजन आता नियंत्रणापलीकडे गेलेलं. आता पाकिस्तानात राहून आपल काही होणार नाही, आशाजींवर विश्वास ठेवून तो मुंबई ला आला.

दोघांनी कभी तो नजर मिलाओ हा अल्बम केला. तो गाजला. मग तर लिफ्ट करा दे मुळे अदनान सामी आणि त्याची डोंगरासारखी इमेज भारतातल्या प्रत्येक घराघरात पोहचवली.

पुढेचे दोन तीन वर्ष त्याने बॉलीवूड वर राज्य केलं. पाकिस्तानी गायकांना त्याच्या मुळे बॉलीवूडची दारे उघडली. 

दरम्यान अदनानचे तेरा चेहरा, कभी तो नजर मिलाओ, तेरी कसम वगैरे अल्बम सुपरहिट झाले. यात राणी मुखर्जीपासून ते अमिताभ बच्चन पर्यंत प्रत्येकाबरोबर तो चमकला. अजनबीसारख्या सिनेमातली गाणी गाजली मात्र त्याच्या करीयर मधलं सर्वात भारी गाण होतं, ए आर रेहमानच्या साथिया मधलं

“ऐ उडी उडी”

अदनानच्या आवाजाची जादू रहमानच्या गाण्यात मिसळून एक भारी कॉकटेल तयार झालेलं. या गाण्याला रसिकांनी तर डोक्यावर घेतलंच पण प्रचंड पुरस्कार देखील मिळाले. तो पर्यंत अदनान भारतात येऊन जाऊन होता. आता मात्र त्याला लक्षात आल की भारतातच आपल्या गाण्याची खरी कदर आहे.

त्याचे वडील अजूनही पाकिस्तानी सरकारमध्ये मोठ वजन राखून होते. एकदा त्यांची भेट पाकिस्तानचे लष्करशहा जनरल मुशर्रफ यांच्याशी झाली.

मुशर्रफ साहेबांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा खूप छान गातो. मी त्याचा फॅन आहे. अदनानच्या वडिलाना आनंद वाटला. त्यांनी त्याची गाण्याची सीडी राष्ट्राध्यक्षांना दिली. मुशर्रफ साहेब अदनानचं कौतुक न थकता करत होते. पण मध्येच ते थांबले. आणि म्हणाले,

“मुझे उसकी एक ही चीज पसंत नही. वो पाकिस्तान छोडके भारत का सिटीझन होणे वाला है.”

अदनानच्या वडिलाना धक्का बसला. त्यांनी तिथेच ठणकावून सांगितलं की अस कधीही होणार नाही. परत आल्यावर त्यांनी अदनानला विचारलं. त्याने वडिलाना सांगितलं सध्यातरी असा काही विचार नाही. पण त्याच्या डोक्यात खळबळ सुरु होती.

त्याच मुंबईत मन रमलेल. इथली खुली हवा त्याला पसंत होती. पाकिस्तानमधली रोजची दंगल, गोळीबार, खून याला तो वैतागला होता. आपली मुलं या वातावरणात वाढू नयेत हीच त्याची इच्छा होती.

हा काळ म्हणजे त्याने वजन कमी करायचे मनावर घेतलेले तो काळ. प्रचंड व्यायाम, डायट, मेडिकल ट्रिटमेंट वगैरे करून करून त्याने आपल तब्बल १५० किलो वजन कमी केले. भारतातला व्हिसा एक्स्टेंड करायचं चाललेलं. पण धीर होत नव्हता.

दुसऱ्या बायकोशी देखील घटस्फोटाची बोलणी सुरु होती. करीयरसुद्धा गटांगळया खात होतं. पण खरं तर पाकिस्तानी नागरिकत्वाखाली त्याची घुसमट सुरु होती. 

अखेर २००९ साली त्याचे वडील वारले. त्यांच्या अखेरच्या वेळी अदनानने भारताचा नागरिक होऊ का ही परवानगी मागितली आणि त्यांनी जाता जाता त्याला होकार दिला. वडिलांनी हो म्हटल मग तो कोणाच्या बापालाही ऐकणारा नव्हता.

पण प्रोसेस एवढी सोपी नव्हती. शिवाय पाकिस्तानमधून नाराजी होणार, आपल्या कुटुंबावर हल्ले होणार याची त्याला कल्पना होती. भारताट देखील लोक काय प्रतिक्रिया देतील सांगता येत नव्हत. रोज फतवे निघायचे की पाकिस्तानी गायकांना परत पाठवा. भारत पाकिस्तान सीमारेषेवर टेन्शन झाली की इकडे अदनानच्या छातीत धाकधूक व्हायचं.

२०१० ला त्याने तिसर्यांदा लग्न करून आयुष्याची नवी इनिंग सुरु केली.  

मोठे सिनेमे मिळत नव्हते पण छोट्या छोट्या सिनेमातून गाण तरी सुरु होतं. लोक म्हणत होते वजन उतरलं आणि अदनानचा आवाज बदलला. पण तस काही नव्हत. त्याची जीवनाची वेगळीच लढाई सुरु होती. काही जण त्याला विचारायचे की तू भारताचाच नागरिक का होणार आहेस? बाकीच्या पाकिस्तान्याप्रमाणे इंग्लंड अमेरिका कॅनडाला का जात नाहीस?तो म्हणायचा,

“ये लोग मेरे अपने है. यहा मेरे संगीत को कदर करते है. वो छोडके मै अंग्रेज मुलख क्यो जाऊ? और अल्ला ने बनाई हुई सरजमी पर तुम चाहे वहा बस सकते हो.”

२०१४ साली भारतात सरकार बदलले. अदनानच्या आशा पल्लवित झाल्या. मोदी सरकारला आपल्याला भारताविषयी किती प्रेम आहे हे त्याने पटवून दिल. २०१५ साली त्याला भारताच नागरिकत्व बहाल झालं.

त्याच्यावर ट्विटर वरून हल्ले करणारे कमी नाहीत. तिथे हा डोंगर आपल्या देशाच म्हणजेच भारताचा झेंडा झळकवत असतो. हल्ले दोन्ही बाजूनी होतात. काही जण त्याला भारताचा चमचा म्हणतात तर काही जण त्याला पाकिस्तानचा गुप्तहेर समजतात.

तो मुसलमान आहे म्हणजे तो पाकिस्तानच्या बाजूचा असेल अशा त्याच्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येकाला ठणकावून उत्तर देतो.

“ये मुल्क मेरा देस है !”

adnan2

भारतात नुकताच पास झालेल्या नागरिकता विधेयकावरून जगभरातून चर्चा सुरु आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून भारतात येणाऱ्या हिंदू,शीख, पारसी,जैन आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींना भारताच नागरिकत्व देण्याचा मोदी सरकारचा निर्णय थोडासा वाद ग्रस्त ठरतोय. काही जण म्हणत आहेत की मुसलमानांना यातून भारताच नागरिकत्व मिळणार नाही.

तेव्हा अदनानची प्रतिक्रिया महत्वाची ठरली,

“हा कायदा ज्यांच्यावर धार्मिक हल्ले होत आहेत त्यांच्या संरक्षणासाठी झाला आहे. बाकी जगातल्या कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही व्यक्तीला, माझ्यासारख्या पाकिस्तानी मुसलमान व्यक्तीला देखील रेग्युलर अर्ज करून भारताचा नागरिक होण्याची संधी आहेच. ती कोणी काढून घेतलेली नाही.”.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.