अडसूळ आणि रवी राणा यांच्या भांडणात ईडीची कारवाई. नेमकं प्रकरण काय ?

शिवसेनेच्या नेत्यांच्या माग लागलेला ईडीचा ससेमिरा काही संपता संपत नाहीये. खासदार भावना गवळी आणि मंत्री अनिल परब यांची मागची ईडी पीडा टळते ना टळते तोवर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजाविण्यात आलयं. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप आहे.

प्रकरण नेमकं काय आहे ?

तर लोकसभा निवडणुकीपासूनच माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर या संघर्षाचं पर्यावसन चौकश्या मागे लावण्यात झालं.

सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीकडून समन्स आले. याविषयीची तक्रार आमदार रवि राणा यांनी दिली होती. तर दुसरीकडे रवि राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्रा प्रकरणी हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. इडीच्या जाळ्यात अडकलेल्या एजाज लकडावाला कडून नवनीत राणा यांनी निवडणुकीवेळी जो अर्ज भरला होता त्यामध्ये ८६ लाख घेतल्याची नोंद केली आहे असे अभिजीत अडसूळ यांनी केले.

सिटी बँक घोटाळा काय आहे ?

सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये  १३-१४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहेत. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे. असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

आरोपपत्राप्रमाणे, आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार गोरगरीब नागरिक ज्येष्ठ पेन्शन धारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटण्याचे आरोप त्यात केला आहे. त्यानंतर ईडीने माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ जावाई यांची घरे आणि ऑफिसची झाडाझडती घेतली.

अडसूळ हे सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अध्यक्ष होते व त्यांचे नातेवाईक संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हि बँक तोट्यात गेली आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली व अखेर बुडीत निघाली.

आणि आज सकाळी सकाळीच सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांना अटक झाल्याची बातमी आली. पण लगेचच दुसऱ्या मिनिटाला ही बातमी खोटी असल्याचं खुद्द अभिजीत अडसूळ यांनी एबीपी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.  

त्यावेळी ते म्हंटले,

ही रवि राणा यांनी पेरलली माहिती आहे. कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. रवि राणा यांनी इडीच्या अधिकाऱ्यांना पैशाच्या किंवा राजकीय दबावाखाली ठेवलेलं आहे. पहिल्या वेळी चौकशीसाठी बोलवल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी जवाब नोंदवला होता कारण तक्रारदार ते स्वतः होते.

या गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली होती. रवि राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्रा प्रकरणी हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख जवळ आली कि, की दरवेळी त्यांचे असे काही ना काही उपद्व्याप सुरू असतात.

तर रवी राणा म्हंटले,

आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या जावयाने सिटी कोऑपरेटिव बॅंकेला स्वतःच्या मालमत्ता भाड्याने दिल्या. त्या बॅंकेचे चेअरमन हे आनंदराव अडसूळ आहेत. बॅंकेतील खातेदारांचे पैसे अवैध पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यामुळे ही बॅंक बुडाली. यामध्ये ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

अटकेच्या वृत्तावर राणा म्हणतात,

आनंदराव अडसूळ यांच्या घरी इडीचे अधिकारी आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु असेल. ईडीचे अधिकारी इतक्या सकाळी आल्यानंतर मला वाटले की त्यांना अटक झाली असेल. कारण गंभीर गुन्हा त्यांनी केला आहे. ईडीने कारवाई केली असेल तर खातेदारांना नक्की न्याय मिळेल.

त्यामुळे आता राणा आणि अडसूळ यांच्या भांडणाच्या नादात ईडीच्या या कारवाईमध्ये अडसूळ कुटुंब अडकते कि काय हे पाहणं महत्वाचं झालं आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.