किमी काटकरसोबत रोमान्स करणाऱ्या बॉलिवूडच्या टारझनला घरमालकानं बाहेर काढलं होतं…

टारझन. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला या टारझननं येड लावलं होतं. लहान पोरं कार्टूनमधला टारझन बघत मोठी झाली. मोठ्या लोकांसाठी मात्र टारझनचे लय वेगवेगळे प्रकार आले. १९८५ मध्ये आलेल्या ॲडव्हेंचर्स ऑफ टारझननं तर दंगाच केला. मग २००२ मध्ये त्याचा सिक्वेलही आला आणि मित्रांच्या घरी चोरुन व्हीसीआर न्यायच्या वयात एक ओन्ली 18+ असणारा टारझनही आला. पुढं टारझन द वंडर कार, टारझनचं पुस्तक अशा काही गोष्टींमुळंही टारझन आपल्या लक्षात राहिला.

तुम्हाला वाटलं असेल, टारझनचा नवा पिक्चर येतोय म्हणून हे सगळं पुराण सांगतोय. पण तसं नाहीये. टारझनची आठवण यायचं कारण म्हणजे, १९८५ मध्ये आलेल्या ‘ॲडव्हेंचर्स ऑफ टारझन’ या पिक्चरमधल्या टारझनच्या खऱ्या आयुष्यात घडलेली घटना. या पिक्चरमध्ये टारझनची भूमिका साकारणाऱ्या हेमंत बिर्जे यांच्या गाडीला नुकताच अपघात झाला आणि साहजिकच बिर्जे आणि १९८५ मधला टारझन पुन्हा एकदा चर्चेत आले.

८० च्या दशकात बॉलिवूड फॉर्ममध्ये होतं खरं, पण त्यात मोठी खळबळ झाली नव्हती. मग आला बी. सुभाष यांनी दिग्दर्शित केलेला ‘ॲडव्हेंचर्स ऑफ टारझन.’ आता टारझनची बेसिक स्टोरी तर सगळ्यांना माहितीच होती, पण या पिक्चरनं गर्दी खेचली. त्याची मुख्य कारणं होती, बप्पी लहिरीचं म्युझिक, हेमंत बिर्जेची धिप्पाड शरीरयष्टी आणि सगळ्यात हिट ठरलेला विषय म्हणजे हिरॉईन किमी काटकर.

या पिक्चरमध्ये बिर्जे आणि किमी काटकर यांच्यात रोमान्स दाखवला होता, एवढे खुंखार बोल्ड सीन्स पाहायची बॉलिवूडला सवय नव्हती. या पिक्चरमुळं किमी काटकरची ओळखच सेक्स बॉम्ब, सेक्स सायरन अशी बनली. या पिक्चरची त्या काळात तुफानी चर्चा झाली. 

पिळदार बायसेप्स आणि रुंद छाती असणाऱ्या हेमंत बिर्जेची या पिक्चरसाठी निवड होण्यामागंही इंटरेस्टिंग किस्सा आहे. हेमंत आधी वॉचमनची नोकरी करायचा, अशावेळी त्याच्यावर डायरेक्टर सुभाष यांची नजर पडली. धिप्पाड शरीरयष्टीचा हिरो त्यांना टारझनसाठी हवाच होता. त्यांनी हेमंतला काही महिने ट्रेनिंग दिलं आणि पहिल्यावाहिल्या पिक्चरमध्ये किमी काटकरसोबत त्यानं सगळ्या बॉलिवूडमध्ये दणका उडवला.

टारझननंतर बिर्जेनं सलमान खान, मिथुन दा या मोठ्या स्टार्ससोबतही काम केलं. मात्र दुर्दैवानं तो वन फिल्म वंडरच ठरला. त्याचे पिक्चर पडत राहिले आणि बॉलिवूडच्या रेसमधून तो गायबच झाला. उत्पन्नाचा स्रोत नव्हता म्हणून त्यानं बी-ग्रेड सिनेमांमध्येही काम केलं. पुढं पुढं तर त्याचं नाव बॉलिवूडमधून गायबच झालं.

माध्यमांनी मध्यंतरी असंही वृत्त दिलं होतं, की भाडं भरायला पैसे नसल्यानं घरमालकानं बिर्जेला घर सोडायला लावलं होतं.

नुकताच आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्याच्या गाडीला अपघात झाला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बिर्जेची तब्येत खराब होती, त्याला प्रचंड सर्दी झाली होती. त्यामुळं त्यांनी गोळी घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला झोप येऊ लागली. गाडी चालवताना ताबा सुटला आणि गाडी दुभाजकाला धडकली. सुदैवानं या अपघातात किरकोळ जखमा वगळता कुणालाच फारशी इजा झाली नाही.

या घटनेनंतर एक गोष्ट मात्र लक्षात आली की, आजही बिर्जेनं साकारलेल्या टारझनचे अनेक चाहते आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.