नवाब मलिकांचा किल्ला लढवणाऱ्या अमित देसाईंनी टाटांपासून विजय मल्ल्याचीही बाजू मांडलीये

टीव्ही असेल किंवा मोबाईल सकाळपासून फक्त एकच बातमी फ्लॅश होतीये, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची चौकशी, मंत्री नवाब मलिक यांना अटक, मलिक राजीनामा देण्याची शक्यता. सोशल मीडियावरही ईडीनं मलिक यांच्यावर केलेली कारवाई, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि भविष्यात काय होईल याची चर्चा जोरदार सुरू आहे.

नवाब मलिक यांना प्रदीर्घ चौकशीनंतर अटक झाली आणि आणखी एक नाव जोरदार चर्चेत आलं, ॲडव्होकेट अमित देसाई. नवाब मलिक यांच्या बाजूनं कोर्टात युक्तिवाद मांडणारे देसाई हे वकिली क्षेत्रातलं मोठं आणि जबरदस्त चर्चेतलं नाव. मलिक यांच्या प्रकरणात काय निष्पन्न होणार? देसाई मलिक यांना जामीन मिळवून देण्यात किंवा निर्दोष सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार का, हे येत्या काळात समजेलच. पण हे अमित देसाई आहेत तरी कोण? आणि त्यांनी या आधी कुणाच्या केसेस लढवल्या आहेत, याची माहिती करुन घेऊ.

ॲडव्होकेट अमित देसाई हे मुंबई हायकोर्टातले ज्येष्ठ वकील. जवळपास ४० वर्ष ते वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ८० च्या दशकात देसाई यांनी वकिली करायला सुरुवात केली. आपल्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी नानी पालखीवाला, अशोक सेन या भारतीय वकीली क्षेत्रातल्या भीष्माचार्यांसोबत काम केलं. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांच्या आणि मोठ्या माणसांच्या केसचं काम पाहिलं. १९८२ मध्ये ते बार कौन्सिलमध्ये सहभागी झाले. २००७ पासून त्यांना सिनिअर ॲडव्होकेट म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

अमित देसाई हे व्हाईट कॉलर क्राईम, बँकिंग आणि व्यावसायिक घोटाळे, आर्थिक फसवणूक, भ्रष्टाचार, लाचलुपत प्रकरण, कंपनी लॉ या विषयांशी निगडित प्रकरणांमध्ये निपुण आहेत. कोर्टात ट्रायल घेण्याच्या बाबतीत त्यांना एक्स्पर्ट मानलं जातं.

आता त्यांनी लढवलेल्या महत्त्वाच्या केस कुठल्या ते पाहू.

भोपाळ गॅस दुर्घटना, बोफोर्स प्रकरण या केसेसमध्ये देसाई यांचा समावेश होता. सोबतच हर्षद मेहता घोटाळ्यावेळीही ते मेहता यांचे सल्लागार होते.

जरा थांबा आणखी मोठी नावंही आहेत.

देसाई यांनी टूजी स्कॅम, रतन टाटा यांची याचिका, टाटा सन्स विरुद्ध नसली वाडिया केस, सायरस मिस्त्री प्रकरण, किंगफिशर एअरलाईन्सचे विजय मल्ल्या, येडीयुरप्पा भ्रष्टाचार प्रकरणात जिंदाल समुहाचे साजन जिंदाल यांची, अशा केसेसमध्ये आपल्या अशीलांची बाजू मांडली.

२००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिथा यांच्यावरच्या खटल्यात त्यांनी काही आरोपींचं प्रतिनिधित्व केलं. सोहराबुद्दीन प्रकरण, नेस्ले मॅगी बॅन प्रकरण, कलानिधी मारन आणि कार्ती चिदंबरम आयकर घोटाळा प्रकरण अशा अनेक हाय व्होल्टेज प्रकरणात देसाई यांनी कायद्याची कमान सांभाळली.

अमित देसाई यांनी लढवलेल्या आणि सगळ्या देशात गाजलेल्या दोन केसेस म्हणजे, सलमान खान हिट अँड रन प्रकरण आणि आर्यन खान ड्रग्स प्रकरण. सलमानच्या या बहुचर्चित प्रकरणात देसाई हेच वकील होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ पार्टीत पकडल्यानंतर त्याच्यावर ड्रग्स घेतल्याचा आरोप झाला व त्याला अटकही झाली. सुरुवातीला ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनची बाजू सांभाळली, त्यानंतर देसाई यांनी आर्यनची बाजू मांडली आणि पुढं त्याची मुक्तताही झाली.

थोडक्यात देसाई हाय प्रोफाईल केस नुसत्या लढवत नाहीत, तर आपल्या अशीलांची बाजू निर्धारानं मांडतातही. आता नवाब मलिक प्रकरणात देसाई काय युक्तिवाद करतात आणि या प्रकरणातून काय निष्पन्न होणार, याकडे फक्त राज्याचंच नाही, तर साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.