भारतातली पहिली फेअरनेस क्रीम ज्याची जाहिरात खुद्द महात्मा गांधींनी केली होती.

सध्या फेअरनेस क्रीम वरून बरीच चर्चा चालली आहे. वर्णभेदाविरुद्ध सुरू झालेल्या लढाईत गोरेपणाच्या जाहिरातींवर टीकास्त्र सोडण्यात आलं. याच वादातून अखेर फेअर अँड लव्हली या सुप्रसिद्ध फेअरनेस क्रीमने आपल्या नावातून फेअर हा शब्द गाळला.

भारतभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पण एक काळ असा होता की देशातल्या पहिल्या ब्युटी क्रीमची जाहिरात खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केली होती.

गोष्ट आहे १९१९ सालची.

अफगाणिस्तानचे राजे किंग झहीर भारत दौऱ्यावर आले होते. मुंबईमध्ये काही तरुण उद्योजक आजच्या भाषेत स्टार्टअप बिझनेसमन त्यांना भेटले. यात एक जण होता इब्राहिम सुल्तानली पाटणवाला.

हा पाटणवाला मूळचा राजस्थानचा होता. याचा परफ्युम आणि ब्युटी प्रॉडक्ट्स याचा बिझनेस होता. त्याने अफगाणिस्तानच्या राजाला एका तबकात आपले प्रॉडक्ट्स पेश केले.

राजाच लक्ष एका बर्फासारख्या पांढऱ्या क्रीमने वेधून घेतलं. त्याला हातात घेऊन राजेसाहेब वदले,

“ही तर अफगाण स्नो है.”

तेव्हा पासून त्या क्रीमला नाव मिळालं अफगाण स्नो.

पाटणवाला एकेकाळी परफ्युम बनवणाऱ्याच्या हाताखाली काम करायचे. फक्त बघून बघून त्यांनी ही विद्या हस्तगत केली. स्वतःच परफ्युम बनवलं. काही दिवसातच सुगंधी ऑइल तयार केलं.

हे ऑट्टो दुनिया नावाचं तेल प्रचंड फेमस झालं. विशेषतः भारतातील संस्थानिक राजे महाराजे शौक म्हणून हे तेल वापरू लागले. या सुगंधी तेलाच्या बिझनेस मध्ये पाटणवाला यांनी बराच पैसा कमावला.

धंदा वाढवण्याच्या दृष्टीने ते युरोप दौऱ्यावर गेले.

त्यांना इंग्लिशच काही ज्ञान नव्हतं, तरी स्विझरलँडच्या केमिकल बनवणाऱ्या एका उद्योगपतीशी त्यांची ओळख झाली. त्याच्याच मार्गदर्शनाखाली पाटणवाला यांनी ही ब्युटी क्रीम बनवली.

5

ही फक्त ब्युटी क्रीम नव्हती तर फेअरनेस क्रीम, मेकअप बेस, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सुद्धा होती.

बर्फासारखे नितळ सौन्दर्य हवे असेल तर अफगाण स्नो वापरा असं म्हटलं जायचं. अफगाण स्नो सुद्धा काहीच दिवसात पॉप्युलर झालं.

पण याच सुरवातीच्या काळात अफगाण स्नोवर एक आभाळ कोसळलं.

गांधीजींची स्वदेशी चळवळ.

इंग्रजांच्या विरुद्धचा स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. गांधीजींच्या अहिंसक आंदोलनांनी अख्खा देश पेटून उठला होता. अगदी आबाल वृद्ध महिला सुद्धा रस्त्यावर उतरले होते.

परदेशी कपड्यांची होळी करण्यात येत होती, विदेशी वस्तू विकणाऱ्या दुकानांपुढे निदर्शने केली जात होती. लोक मुद्दामहून फक्त स्वदेशीचा वापर करत होते.

पण अशातच कोणी तरी अफवा उठवली की,

अफगाण स्नो अफगाणिस्तानचा म्हणजे परदेशी आहे.

झालं. अफगाण स्नोची विक्री प्रचंड वेगाने कमी झाली. या क्रीमची बाटली जर्मनीमधून आयात केल्या जात होत्या, स्टिकर जपानमध्ये बनत होते.

अफगाणिस्तानच्या राजाचा बाटलीवर उल्लेख होता तरी क्रीम मात्र अस्सल भारतीय होती.

विक्रीवर झालेल्या परिणामामुळे पाटणवाला यांनी अखेर थेट महात्मा गांधीजींची भेट घेतली. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. अफगाण स्नोची बाटली सुद्धा दाखवली. आपल्या मुंबईतल्या भायखळा येथील कारखान्यात ही क्रीम तयार होते हे सांगितलं.

गांधीजींना हे पटलं. आपल्या स्वदेशीच्या आंदोलनाचा एका देशी प्रॉडक्टवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात एक लेख लिहून अफगाण स्नो वर बंदी न घालण्याच जनतेलाआवाहन केलं.

खुद्द महात्मा गांधी सांगत आहेत म्हटल्यावर लोक परत अफगाण स्नो वापरू लागले.

फक्त भारतीय पोरी बाळीच नाही तर गोऱ्या इंग्लिश बायकासुद्धा आपलं सौन्दर्य खुलवण्यासाठी अफगाण स्नो वापरू लागल्या. त्याची पॉप्युलॅरिटी इतकी होती की गोरेपणाच दुसरं नाव स्नो पडल.

आजही जुने लोक तोंडाला लावायच्या पावडरला स्नो पावडर म्हणतात.

स्वातंत्र्यानंतरही अफगाण स्नोची लोकप्रियता वाढत राहिली. दरवर्षी पाटणवाला आपल्या क्रीमच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या मोठ्या हॉटेलमध्ये जंगी पार्टी द्यायचे. राज कपूर नर्गिस सारखे मोठे सिनेकलाकार या पार्टीत सहभागी व्हायचे, नाचायचे. याचाही त्यांना भरपूर फायदा झाला.

पाटणवाला यांनी १९५२ सालची पहिली मिस इंडिया स्पर्धा सुद्धा स्पॉन्सर केली होती.

MR F E patanwala with miss india

पुढे कित्येक वर्षे अफगाण स्नोला भारतात कोणती ब्युटी क्रीम फाईट देऊ शकली नव्हती. पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापूरे सारख्या अभिनेत्री याची जाहिरात करत होत्या.

पण जागतिकीकरणाच्या लाटेत मोठमोठ्या एमएनसी कंपन्यांनी अफगाण स्नोला मागे टाकले. आज अफगाण स्नो काही म्हाताऱ्यांची गुलाबी आठवण म्हणून उरलं आहे इतकंच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.