अमेरिका – रशियाला मागे सारून या आफ्रिकन देशाने मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती…

आफ्रिकेच्या नावावर आपल्याकडं काहीही खपवायची सवय आहे. तिथल्या माणसांना रंगावरून नावं ठेवायची सवय, नायतर बॉलिवूड चित्रपटांत मसाला भरण्यासाठी तिथली अनागोंदी-गरिबी दाखवणारी दृश्ये, किंवा “शादी करूंगी तो शुभम से” मिमखाली तिथल्या लोकांचे फोटो!

जणू सगळी आफ्रिका नुसतं जंगल आणि वाळवंट असल्याची कल्पना आपल्याकडंच नाही तर सगळ्या जगात पसरून देण्यात आलीय. जगातल्या पहिल्या माणसाला जन्माला घालणारी भूमी म्हणून फक्त अमेरिकन काळ्या लोकांनीच नाय तर प्रत्येकाने आफ्रिकेला प्रेमानं आई म्हणजे “मम्मा आफ्रिका” म्हणायला पाहिजे. आणि आधुनिक आफ्रिकेचा चेहरामोहरा बदलायला सुरवातही झालीय.

पण ह्याच्यामागे कित्येक अज्ञात लोकांची मेहनत आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे.

झामबीया म्हणजे झिम्बाब्वेच्या जवळचा एक गरीब देश.

ब्रिटिश साम्राज्याने ह्या देशांचे मनाला वाट्टेल तसे तुकडे केले होते. ह्याचा काही भाग ऱ्होडेेशिया मध्ये कोंबून मालावीचा काही भाग ह्या देशात कोंबला होता. (सेसिल ऱ्होड्स नावाच्या एका पांढऱ्या माणसावरून अख्ख्या देशाला नाव देणं कसलं अन्यायकारक आहे, पण केलं!)

ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या एका माणसाचं नाव होतं एडवर्ड माकूका कोलोसो.

कोलोसो तेव्हा एक साधा शाळामास्तर होता. पण दुसऱ्या महायुद्धानंतर त्याचं जीवन बदलून गेलं. माहीत नसलेल्या देशांसाठी केलेल्या लढाया, सार्जंट पासून ते भाषांतर पर्यंत पडेल ती केलेली कामे ह्यातून त्याच्या मनात इंग्रजांविरुद्ध राग निर्माण झाला आणि त्यानं स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.

काही वर्षे जेलमध्ये राहिल्यानंतर जेव्हा ऱ्होडेशियापासून झिम्बाब्वे स्वतंत्र झाला तेव्हा त्यातून झामबीया वेगळा होऊन ते एक स्वतंत्र राष्ट्र बनले.

१९६० साली ह्या गड्याने एकट्याच्या जोरावर आफ्रिकेतील विज्ञान, अंतराळ आणि तत्त्वज्ञानाला वाहिलेली देशी नागरिकांची संस्था स्थापन केली. तिचं नाव होतं “झामबीया नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, स्पेस रिसर्च अँड फिलॉसॉफी”.

ह्या कामाला नंतर सरकारनेही मदत केली आणि देशाचं संविधान बनवण्यासाठी कोलोसोचीही मदत घेण्यात आली.

हा तोच काळ होता जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोघांमध्ये शीत युद्धाच्या ठिणग्या वारंवार उडत होत्या. एकमेकांना धमक्या दे, अण्वस्त्रे आणि अणूुबॉम जवळ आणून ठेव, गुप्तचर यंत्रणांकडून एकमेकांच्या देशांमध्ये अफरातफर कर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांची उणीदुणी काढ. जगातल्या सगळ्या नवीन राष्ट्रांना आपल्या गोटात ओढायची कामे कर असे उद्योग दोन्ही देशांमध्ये सुरू होते.

आणि ह्याचाच भाग होता या दोघांमधली अंतराळ स्पर्धा!

रशियाने लायका नावाची कुत्री अंतराळात पाठवून व त्याचबरोबर युरी गागारीन या पहिल्या अंतराळवीराला अंतरिक्षात पाठवून या स्पर्धेची सुरुवात केली होती.

आजवर मानवाला अप्राप्य वाटणाऱ्या गोष्टी अचानकच टप्प्यात आल्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष या स्पर्धेकडे लागलं होतं. त्यामुळे दोन्ही देश त्यावर तुफान खर्च करत होते.

अशातच अमेरिकेने आपल्या अपोलो कार्यक्रमाची घोषणा केली होती व केवळ राष्ट्राध्यक्षांच्या इच्छेखातर आपण 1970च्या आत अंतराळात नव्हे तर थेट चंद्रावर जाऊन येऊ असं घोषितही करून टाकलं होतं.

त्याला टक्कर द्यायला रशियाचे लोकही सावध होते, मात्र या दोन्ही देशांच्या आधी आपण मोठी कामगिरी करू आणि थेट मंगळावर ती मोहीम काढून आफ्रिकन माणसाला मंगळावर पाय ठेवायला लावू अशी योजना झांबिया मध्ये साकार होत होती आणि या योजनेचा सर्वेसर्वा होता कोलोसो.

कोलोसोने आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर काही आफ्रिकन तरुण-तरुणींना एकत्र करून स्वतःच्या अंतराळ मोहीमा काढायचा विचार केला. यासाठी त्याने आपल्या परीने त्यांना ट्रेनिंग द्यायलाही सुरुवात केली.

अंतराळात वजनरहित अवस्थेत काम करता यावे यासाठी त्याने एक मोठा हौद बनवला व त्या हौदात भावी अंतराळवीराला घालून टेकडीवरून खाली सोडण्याची सोडण्यात येई.

त्यासोबतच तरुणांना टायरवरती झुलवण्यात येईल. त्यांच्या आकलनाच्या दृष्टीने च्या प्रयोगांतून वजनरहित अवस्थेत काम करणे शक्य होईल, असे त्यांना वाटत असे.

मात्र वास्तविक पाहता असे काही नव्हते.

या कार्यक्रमासाठी त्याने देशविदेशातून अनेक संस्थांकडे व स्वतःच्या सरकारकडे ही निधी मागण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच त्याला दाद दिली नाही.

आफ्रिकेतील अंतराळवीरांना बाकीच्या नावांनी न संबोधता त्यांना आफ्रोनॉट्स म्हणजेच आफ्रिकेच्या अंतराळवीर म्हणण्यात यावे,

ही घोषणाही त्यांनी केली. नुकत्याच इंग्रजांच्या तावडीतून बाहेर पडलेल्या आफ्रिका सारख्या गरीब खंडातील एका देशातील माणूस किमान असे स्वप्न पाहतो हीच गोष्ट आफ्रिकेतील लोकांसाठी लय लाख मोलाची होती.

शेवटी निधीच्या अभावी हा प्रोग्रॅम कायमचा बारगळला.

हळूहळू सर्व तरुण-तरुणी त्याच्या अकॅडमीतून बाहेर पडले. हाताशी कोणतेही तंत्रज्ञान नसल्याने संस्थापकांनी ही शेवटी माघार घेतली व फक्त वैचारिक जोरावर ही मोहीम कधीनाकधी साकार होईल अशी अपेक्षा ठेवून जगाचा निरोप घेतला.

नुकताच इथिओपिया ह्या उत्तर आफ्रिकेतल्या देशाने चीनच्या मदतीने आपला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हा सगळी आफ्रिका आनंदात न्हाऊन निघाली.

त्या वेळी उपस्थित लोकांमध्ये आणि माध्यमांमधून कोलोसो आणि त्याच्या स्वप्नांची आठवण करून देण्यात आली.

इथिओपिया देशावर कधीच इंग्रज-फ्रेंच लोकांची गुलामी करायची वेळ आली नव्हती, म्हणून कदाचित ते हे करू शकले.

आफ्रिकेतील आजचा तरुण जगातल्या अग्रगण्य संस्थांमध्ये मोठ्या पदांवर काम करतो, केनिया सारख्या गांजलेल्या देशातला एक तरुण अमेरिकेत जाऊन तेथील राजकारणात आपलं नाव कमवतो आणि एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो – ह्या सर्व गोष्टी कोलोसोसारख्या माणसांनी आपल्या दूरदृष्टीने पाहिलेल्या आणि मेहनत घेतलेल्या कामाचे फळ म्हणावे लागेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.