३ दिवस झाले पण पोलिसांनी अजून लखीमपूर घटनेतील आरोपींची नाव पण सांगितलेली नाहीत…

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेबद्दल विरोधक अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात आज योगी सरकारकडून राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. शिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लखीमपूर खेरी इथं रविवारी संध्याकाळी शेतकऱ्यांची निदर्शन सुरु होती. त्यावेळी या निदर्शनात अचानक एक गाडी घुसली आणि गदारोळ होतं हिंसाचार झाला. याच हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला. या गदारोळासाठी शेतकऱ्यांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.

कारण उपस्थित शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार या गाडीत आशिष मिश्रा बसले होते.

त्यानुसार पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्यासह इतरांवर कलम – ३०२ अंतर्गत तिकोनिया पोलीस स्थानकामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र या सगळ्या घटनेला ३ दिवस उलटल्यानंतर देखील यातील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे ती म्हणजे या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या आशिष मिश्रा यांना माहित देखील नाही कि त्यांच्या विरोधात FIR नोंद करण्यात आला आहे.

या घटनेत जे ४ शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांच्या पोस्टमार्टमवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील नकार दिला होता. मात्र सध्या प्रशासनाकडून शेतकरी संघटना आणि नातेवाईकांना समजावून मृतांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

आशिष मिश्रा यांच्या विरुद्ध सध्या FIR दाखल करण्यात आला आहे. 

लखनऊ रेंजच्या विशेष पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह म्हणाल्या कि, सध्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या विरोधात FIR दाखल झाला आहे. सोबतच त्या म्हणाल्या कि पुराव्यांच्या आधारे दोषींच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.

मात्र अजून एकाही आरोपीची साधी चौकशी देखील न झाल्याने पीडित कुटुंबीय आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांना धमकी दिली होती?

कृषी कायद्यांना करत असलेल्या शेतकऱ्यांनी अजय मिश्रा यांना याआधी देखील काळे झेंडे देखील दाखवले होते. यामुळे नाराज असलेल्या मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी भाषण देताना शेतकऱ्यांना एक प्रकारे धमकी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येत आहे.

यात कथित रित्या अजय मिश्रा म्हणत आहेत कि,

गाड़ी से उतर जाते तो उन्हें (काले झंडे दिखाने वालों को) भागने का रास्ता नहीं मिलता। कृषि कानून को लेकर केवल 10-15 लोग शोर मचा रहे हैं। सुधर जाओ, नहीं तो सामना करो, वरना हम सुधार देंगे दो मिनट लगेंगे। विधायक-सांसद से बनने से पहले से लोग मेरे विषय में जानते होंगे कि मैं चुनौती से भागता नहीं हूं

मिश्रा यांच्या या व्हिडीओनंतर शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. ठिकठिकाणी छोटी मोठी आंदोलन सुरु होती.

रविवारी मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. त्यांचं हेलिकॉप्टर जिथं उतरणार होतं, तिथचं सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरलं होतं.

अनेकदा समजूत काढूनही ते तिथून जाण्यास तयार नव्हते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमावात दोन गाड्या घुसल्याच सांगण्यात येत असून त्यानंतरच हिंसाचार घडला असा दावा करण्यात येत आहे.

सध्याची परिस्थिती काय आहे?

सध्या अजय मिश्रा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली आहे. सोबतच अजय मिश्रा आणि आशिष मिश्रा या दोघांनी देखील त्या गाडीत उपस्थित असल्याची गोष्ट नाकारून लावली आहे. अजय मिश्रा तर म्हणाले आहेत कि त्यांचा मुलगा घटनास्थळावर उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा मिळाला तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन.

योगी सरकारने सध्या हिंसाचारादरम्यान मृत झालेल्या सर्वांना ४५ लाख आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. सोबतच प्रत्येक मृत परिवारातील एकाला नोकरी दिली जाणार आहे. आणि या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे. या चौकशी समितीमध्ये ६ सदस्य आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.