अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता ईडीच्या रडारवर कोण असणार ?

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पेटलाय. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोघे गेले अजून दहा जण रांगेत आहेत, असं म्हटलंय.

यावेळी त्यांनी डर्टी डझन रांगेत आहेत, असं म्हंटलय!

त्यामुळे सगळीकडेच हा प्रश्न विचारला जातोय की बाबा अनिल देशमुख झाले, नवाब मलिक झाले आता पुढचा नंबर कोणाचा लागणार ?

तर मागे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रिफांवर आरोप करताना सोमय्यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनचा उल्लेख केला होता.

१. यात एक नंबरला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर, NSEL मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याबाबत ईडी कडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती.

२. त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आणि किरीट सोमय्यांनी परबांवरच्या आरोपांची यादी वाचून दाखवली. सचिन वाझे प्रकरण असो, आरटीओमधला गैरव्यहार आणि दापोलीमध्ये बांधलेलं रिसॉर्ट असा अनेक गोष्टींवरुन किरीट सोमय्या यांनी परबांवर निशाणा साधला.

३. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ शैक्षणिक संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या शैक्षणिक संस्थांवर धाडी टाकल्या. तदनंतर भावना गवळी यांचं घर आणि कार्यालयावर जप्तीची नोटीस काढण्यात आली.

४. या यादीत मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव सुद्धा होतं. पेडणेकर यांनी स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी नसतानाही एसआरए प्रकल्पाच्या इमारतीतील अनेक सदनिका बेकायदेशीररीत्या बाळगल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

५. रवींद्र वायकर यांचंही नाव डर्टी इलेव्हनच्या यादीत होत. रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून अवैध्यरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा आरोप आहे. अलिबागमध्ये ३० जमीनीचे करार करण्यात आले. आणि ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

६. या नेत्यांच्या यादीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच नाव होत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एसआरएचा भूखंड प्रकरणी आरोप करण्यात आला होता. शिवाय, त्यांची लवकरच चौकशी होईल असाही दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

७. मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. मात्र, त्याला उत्तर देत संपत्तीशी आपला काहीही संबंध नसल्याचा छगन भुजबळ यांनी सांगितलं.

८. किरीट सोमय्यांच्या यादीत मंत्र्यांबरोबरच मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांचही नाव होत. यशवंत जाधव कुटुंबाने हवालाच्या माध्यमातून युएई येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे असा आरोप होता.

९. भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या पत्नीवरही किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. शिवाय, निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटीवरुन आयकर विभागानं यामिनी जाधव यांच्यावर कारवाईची तयारी केली होती.

१०. शिवसेने सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडण्यात आला. त्यावेळी करीत सोमय्या म्हंटले होते, नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता म्हणून नार्वेकर यांनी स्वत: प्रशासनास बंगला पाडण्यास सांगितलं.

११. सोमय्यांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. आरोपात म्हंटल्याप्रमाणे, निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले. यात मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २.८९ कोटी रुपये या रकमा या कारखान्याच्या नावावर जमा झाल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच या मनी लाँडरिंगचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत असं सोमय्या म्हंटले होते.

१२. त्यानंतर संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवरही आरोप झाले. राऊत यांचे थेट नाव असलेलं एकही प्रकरण सध्या नाही. पण, ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली. प्रवीण राऊत यांची अटक १०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यातही त्यांचे नाव पुढे आलं होतं. याच काळात प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी यांना १ कोटी ६० लाख रुपये ट्रान्सफर केले होते. त्यातील 55 लाख रुपये माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना बिनव्याजी कर्ज म्हणून दिल्याचं स्पष्ट झालं होतं. याच रकमेतून दादर पूर्वेत एक फ्लॅट खरेदी करण्यात आल्याचंही चौकशीतून पुढे आले होतं.

विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले ५५ लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं.

१३. सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीकडून समन्स आले होते. याविषयीची तक्रार आमदार रवि राणा यांनी दिली होती. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये  १३-१४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहेत. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे. असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

हे होते सोमय्यांनी आरोप केलेले टॉप प्लेयर्स. या नेत्यांची नाव जशी का माध्यमात आली तशी या नेत्यांची मीडिया ट्रायल सुरु झाली. बदनामी झाली, काहींना ईडीची नोटीस आली, तर काहींची प्रकरण ज्या वेगात तापली तेवढ्याच वेगात थंड झाली.

आज सोमय्या म्हणत होते, एकूण बारा जण लाईनमध्ये आहेत. मला सकाळी एका पत्रकारानं विचारलं, आता कुणाची बारी आहे? त्याला मी म्हणालो, आता चिट्ठी काढावी लागेल. आतापर्यंत दोन गेले. दहांवरची चौकशी आणि तपास सुरु आहे.

त्यामुळे आता वेळच सांगेल यातले नक्की पुढचे नक्की कोण ?

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.