कोहली-रोहित बाजूला राहूद्या, आता अश्विन आणि शास्त्रीबुवांमधला राडा समोर आलाय

टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावर गेलीये. आफ्रिकेतली पिचेस तशी लय डेंजर. कधी बॉल बाऊन्स होईल, कधी स्विंग, तर कधी खाली राहील. तसंच काहीसं सध्या टीम इंडियामध्येही सुरू आहे. म्हणजे बघा, टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि व्हाईट बॉल कॅप्टन रोहित शर्मामधून विस्तव जात नसल्याच्या बातम्या वाचून तुम्ही आणि आम्हीही वैतागलो आहोत. पण कधी काय होईल सांगता येत नाही.

आमच्यात काहीच वाद नसल्याचं कोहली सातत्यानं सांगत असला, तरी बातम्यांना उधाण येत असतंच. कोहली जितका वांड क्रिकेटर आहे, तितकाच वांड त्याचा स्वभावही. आता मैदानाबाहेर तो एकदम निवांत असला, तरी त्याच्या बॅड बॉय इमेजमुळं तो वादात घावतोच. मध्यंतरी बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि कोहलीमध्येही वाद होईल अशी परिस्थिती होती.

त्यात दादा म्हणला , ‘मला विराट कोहलीचा स्वभाव आवडतो, पण तो फार भांडकुदळ आहे.’ कट्ट्यांवर चर्चा करायला नवीन विषय मिळाला होताच, तेच आता भारताचा स्पिनर रवीचंद्रन अश्विननं रवी शास्त्रींमुळं आपलं खच्चीकरण कसं झालं होतं, याबाबत एक किस्सा सांगितला आहे.

आपल्या शाळेत स्कॉलर पोरं असतात, अश्विन एकदम तसाच आहे. तर रवी शास्त्री म्हणजे शाळा सुटल्यावर पोरांबरोबर गप्पा मारणारा मास्तर. अश्विननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोच शास्त्रीमुळे आपलं खच्चीकरण झाल्याचं सांगितलं होतं.

झालं असं, की २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चौथी टेस्ट. भारताला ऑस्ट्रेलियन भूमीमध्ये सिरीज जिंकण्याची नामी संधी होती. त्यासाठी ही टेस्ट ड्रॉ केली, तरी पुरेसं होतं. भारताच्या बॅटर्सनं जबरदस्त कामगिरी केली, आता मोहीम फत्ते करायचं काम होतं बॉलर्सच्या खांद्यावर. पाच विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवची जादू चालली आणि भारतानं ऑस्ट्रेलियाला फॉलो-ऑन दिला.

भारतानं मॅच ड्रॉ केल्यानंतर, कोच रवी शास्त्रींनी कुलदीपचं कौतुक करताना ‘हा भारताचा परदेशातला नंबर वन स्पिनर आहे,’ असा दावा केला. अश्विन सांगतो, ‘‘फक्त मीच नाही तर आम्ही सगळेच रवीभाईंना खूप मानतो. पण ते वाक्य ऐकल्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलो. मला आजवर ऑस्ट्रेलियामध्ये पाच विकेट्स घेणं जमलेलं नाही, त्यामुळं कुलदीपला मिळालेलं यश पाहून मला खरंच मनापासून आनंद झाला. पण मलाही टीमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं होतं. मला स्वतःला बसखाली फेकल्यासारखं वाटत होतं, यातून उभा राहून मी पार्टी एन्जॉय कशी करणार?”

या दौऱ्यातली पहिली टेस्ट भारतानं जिंकली, या विजयात अश्विनचा मोठा वाटा होता. त्यानं दोन्ही इनिंग्समध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र अश्विन मुलाखतीत म्हणतो, ”मला दुखापत झालेली असतानाही मी खेळलो आणि चांगली कामगिरी केली. तरीही मॅच संपल्यावर मला एकच गोष्ट ऐकायला मिळत होती. ती म्हणजे नॅथन लायननं सहा विकेट्स घेतल्या आणि अश्विननं फक्त तीन.”

खेळाडूंना दुखापत झाल्यावरही संघातले सहकारी आणि व्यवस्थापन पाठीशी उभं राहतं. अश्विनच्या बाबतीत मात्र असं झालं नाही, त्याला दुखापत झालेली असूनही संघ व्यवस्थापनाकडून ”अश्विन फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला आहे,’ असं सांगण्यात आलं. ”हा सगळा काळ माझ्यासाठी फार कठीण होता. मी गंभीर दुखापतींशी झुंजत खेळत होतो आणि दुसऱ्या बाजूला माझं करिअर संपण्याची भिती मला ग्रासत होती. सुदैवानं मी ती सिरीज खेळून काढली आणि माझं क्रिकेट थांबलं नाही,” असं अश्विननं मुलाखतीमध्ये सांगितलं.

आता अश्विननं दिलेल्या मुलाखतीवर रवी शास्त्री किंवा विराट कोहलीकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का? आणि आधीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या भारतीय क्रिकेट टीममध्ये नव्या वादाला तोंड फुटणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Web title : After disputes between viral and ganguly Indian team is now facing disputes between R Ashwin and Ravi Shastri

Leave A Reply

Your email address will not be published.