न भेटलेल्या “प्रेमाची गोष्ट”-

 

“ती बघताच बाला कलिजा खल्लास झाला” असं होतं ना आपल्यालाही कधीतरी..? कधीतरी नाही आपल्याला हे असं बऱ्याच वेळा होतं. आपण आयुष्यात बऱ्याच वेळा प्रेमात पडलेलो असतो आणि प्रत्येकवेळी आपलं प्रेम खरं असतं. अगदी ‘सिद्द्तवाला प्यार’ म्हणतात ना त्या टाइप. तर ते असूद्यात पण आज हे प्रेमाबिमाविषयी आम्ही तुम्हाला इथे सांगतोय कारण सध्या सोशल मिडीयावर एक  गोष्ट भन्नाट व्हायरल झालीये. हीच भन्नाट स्टोरी आमच्या हाती लागलीये. (आता या स्टोरीला ‘प्रेमाची गोष्ट’ म्हणायचं की नाही हे आम्ही वाचकांवरच सोडून देतो) ही स्टोरी आपल्या नेहमीच्या स्टोरीज पेक्षा खूप वेगळी आहे. या स्टोरीत सगळ्यात इंटरेस्टिंग काय असेल तर यातले भिडू गेल्या २ वर्षांपासून एकमेकांशी ‘ऑनलाईन कनेक्टेड’ आहेत, ईमेलच्या माध्यमातून दररोज ते एकमेकांशी बोलतात, ते दोघंही एकमेकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊ पाहताहेत पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ते अजूनही ते एकमेकांना भेटलेले नाहीत. भेटायचं सोडून द्या हो, ते दिसतात कसे आणि एकमेकांची खरी-खुरी नांव काय हे देखील त्यांना माहित नाही. तरीही ते एकमेकांसाठी खूप स्पेशल आहेत. ही म्हणजे अगदी ‘सिर्फ-तुम’ टाईप स्टोरी आहे. आहे ना इंटरेस्टिंग..? मग ही संपूर्ण स्टोरी वाचाच.

तर या स्टोरीतली मुख्य पात्रं म्हणजे ‘अदा’ (Ada) आणि ‘सू’ (Soo). ही दोघांची टोपणनांव. तर ‘अदा’ आणि ‘सू’ यांची स्टोरी जगासमोर आली ती ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवरील पोस्टमुळे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर सर्वप्रथम एक पोस्ट अपडेट करण्यात आली. हे अदाचं व्हर्जन होतं, ज्यात अदानं आपल्या पहिल्या ब्रेकअपबद्दल, ब्रेअकपनंतरच्या एकाकीपणाबद्दल लिहिलं होतं. तिनं पुढे असंही लिहिलं की एकाकीपणाला कंटाळून ती  इंटरनेटवर पुस्तकवेड्या लोकांच्या फोरमशी जोडली  गेली . तिथे होणाऱ्या साहित्याबद्दलच्या चर्चांमध्ये ती सहभागी होऊ लागली. जगभरातील साहित्यवेड्या लोकांशी कवितेबद्दल बोलू लागली. या चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी तीने धारण केलेलं टोपणनांव म्हणजे ‘अदा’ तिथेच ती  एका अनोळखी व्यक्तीशी वारंवार बोलायला लागली, आपल्या कविता त्याच्याशी शेअर करू लागली. तर त्याचं या फोरमवरचं टोपणनांव म्हणजे ‘सू’.

‘अदा’ आणि ‘सू’ बोलायला लागले आणि इतकं बोलायला लागले की पुढच्या २ वर्षांच्या कालावधीत त्यांचे ५०० पेक्षाही अधिक मेसेसेज एकमेकांच्या मेलबॉक्समध्ये पडून होते. पण दोन वर्षे एकमेकांच्या संपर्कात असूनदेखील ते कधीही एकमेकांना भेटले नव्हते. तशी गरजच कधी त्यांना वाटली नव्हती. एकमेकांना इमेलच्या माध्यमातून लिहलेली पत्रेच त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेशी वाटत होती. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने टाकलेल्या अदाच्या व्हर्जनमध्ये ती म्हणते की, “मला माहित नाही की त्याचा आवाज कसाय ते, पण एक गोष्ट मला माहितेय की त्याला ‘मोमोज’ खूप आवडतात. मला माहितेय की तो महिलांचा आदर करतो आणि एक वेस्पा चालवणारी मुलगी त्याचा क्रश होती. मला हे देखील माहित नाही की त्याची जात आणि धर्म कुठला ते, पण तसं ते माहित असण्याची खरंच गरज आहे का..? अदाने पुढे लिहिलंय, “मला नाही वाटत की आम्ही भविष्यातही कधी भेटूत, कारण आमच्यात सध्या जे काही आहे, ते खूप परफेक्ट आहे. वर्षानुवर्षे एकमेकांच्या प्रेमात असणारी जोडपी आपल्या नात्यामध्ये जे  मैत्रीचे ऋणानुबंध शोधत असतात, तेच ‘मैत्र’ आज आमच्यात आहे. मग कशाला आम्ही प्रेमा-बिमाच्या भानगडीत पडावं…?

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’वर अदाचं हे व्हर्जन फेसबुक पोस्टच्या रुपात प्रकाशित झालं आणि अल्पावधीत ते व्हायरल झालं. ही आगळीवेगळी स्टोरी वाचण्यासाठी नेटीझन्सच्या या पेजवर अक्षरशः उड्या पडल्या. आता व्हायरलच्या या जमान्यात ती स्टोरी आपल्या ‘सू’ पर्यंत पोहोचली नसती तर नवलंच. अपेक्षेप्रमाणे ती ‘सू’ पर्यंत पोहोचली आणि मग ‘सू’नं ही आपली बाजू ह्युमन्स ऑफ बॉम्बेला पाठवली. ती त्यांनी प्रकाशित केली. आपल्या व्हर्जनमध्ये ‘सू’ ने म्हंटलय की, अदाची स्टोरी वाचल्यानंतर तो  त्याचं स्वतःचं व्हर्जन शेअर करतोय. अदाचे ब्लॉग्ज फॉलो करता-करता एक दिवस त्याने  तीला मेल केला. तीचाही लगेच रिप्लाय आला आणि दोघे  बोलायला लागले. गेल्या २ वर्षात ते कायम एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि तरी देखील त्यांना एकमेकांची नावं माहित नाहीत. अदाने भेट दिलेल्या अनेक ठिकाणांहून तीने त्याला पाठवलेल्या नॅपकिन्स त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत. मागच्या वर्षी अदा चेन्नईत आलेली असतानाही ते भेटले नाहीत, तशी आवश्यकताच त्यांना वाटली नाही.

पुढे ‘सू’ने जे लिहिलंय ते खूप महत्वाचं आहे. तो लिहितो, “ मी ज्यावेळी तीला इकडच्या सुर्योदयाविषयी सांगतो, त्यावेळी ती मला तीच्या सूर्यास्ताची गोष्ट सांगते. आमच्यात नेमकं काय आहे, हे शब्दात सांगणं कठीण. हे जे काही आहे, ते अगदीच ‘जादुई’ आहे. मला माहितेय की ही काही ‘लव्ह-स्टोरी’ नाही, पण ‘अदा’ ही आता फक्त मैत्रीण राहिलेली नाही.कधीकाळी तीने माझ्या मेलला रिप्लाय दयायचा नाही असं ठरवलंच, तर तसं करण्यासाठी मी तीला भाग पाडणार नाही. मी तीचा पाठलाग करणार नाही. काही स्टोरीज लोकं एकमेकांचे न होता ही पूर्णत्वास जातातच की. अदा, तू जर हे वाचत असशील तर फक्त एवढचं सांगायचंय की, ‘हाय, मी सू ! आपण न भेटणं ही माझ्यासाठी  आनंददाची गोष्ट आहे’

Leave A Reply

Your email address will not be published.