गेहलोत नाहीत म्हटल्यावर थरूर यांच्या विरोधात गांधी घराण्याकडे हेच ऑप्शन राहतात

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुका नाट्यमय राहतील असं सांगितलं होतं. मात्र निवडणूक व्हायच्या आधीच काँग्रेसमध्ये राजकीय नाट्याला सुरवात झाली आहे. गांधी घरण्याकडून अशोक गेहलोत यांचं नाव जवळपास फायनल झालं होतं. मात्र सुरवातीपासूनच राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्यास तयार नसलेले अशोक गेहलोत यासाठी उत्साही दिसले नाहीत. त्यानंतरही काँग्रेस हायकमांडने नाव पुढे केल्याने शेवटी अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधील काँग्रेस आमदारांना बरोबर घेऊन बंडाचं निशाण उभारलं आहे. कुठल्याही परिस्थितीत ते रायव्हल कॅम्पच्या सचिन पायलट याना मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही आहेत.

त्यामुळे काँग्रेस हायकमांड थोडक्यता गांधी घराण्यानेही गेहलोत यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद केल्याचं सांगितलं जात आहे. 

असंही जो माणूस स्वतः गटातटाच्या राजकारणात अडकला आहे तो पक्ष अध्यक्षपदाला कसा न्याय देईल यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे गेहलोत जवळपास काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेरच असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यातच G -२३ चक भाग असणारे शशी थरूर यांनाही गांधी फॅमिली सपोर्ट करणार नाही हे उघड सत्य आहे. त्यामुळे आता शशी थरूर यांना नक्की कोण फाइट देणार यावर आता चर्चा झाल्या आहेत.

यामधलं पाहिलं नाव सांगितलं जात आहे ते म्हणजे

१. के. सी. वेणुगोपाल

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. सी. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे अहमद पटेल म्हणून ओळखले जातात. १९९१ मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांचे मार्गदर्शक करुणाकरन यांनी त्यांना कासारगोडमधून लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं होतं तेव्हा ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. त्यावेळी केवळ २८ वर्षांचे होते.

वेणुगोपाल पहिल्यांदा १९९६ मध्ये आमदार झाले. २००१ आणि २००६ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. 

२००४ साली ते ओमन चंडी सरकारमध्ये मंत्री झाले. २००९ सालापर्यंत ते लोकसभेचे खासदार होते आणि आणखी दोन वर्षांत केंद्रीय राज्यमंत्री होते. २०१४ मध्ये, जेव्हा देशभरात कॉंग्रेसची हानी झाली होती तेव्हा वेणुगोपाल हे केरळमधून जिंकलेल्या मूठभर खासदारांपैकी एक होते आणि त्यांना पक्षाचा व्हीप बनविण्यात आले होते.

आता ते राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार असून काँग्रेसचे सगळे नेते पक्षाची साथ सोडत असताना, पक्षाच्या राज्यांमध्ये पराभव होत असताना आणि बंडखोर जी-२३ मधून मधून सुधारणा घडवून आणण्याची मागणी करत असताना वेणुगोपाल हे असे नेते आहेत जे सगळ्यांच्या विरोधात जात गांधी कुटुंबियांसोबत उभे आहेत.

वेणुगोपाल पक्षात असलेल्या आणि नसलेल्या सर्व नेत्यांना चांगले जाणून आहेत, असं बोललं जातं. हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत केरळमध्ये दुसरी जागा लढवण्यासाठी त्यांनी राहुल यांना कन्व्हिन्स केलं होतं.

कारण त्यांनी उत्तर प्रदेशातील राजकीय वारे अचूकपणे ओळखले होते, असं त्यांचे विश्वासू सांगतात.

राहुल काँग्रेसचे अध्यक्ष असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी वेणुगोपाल यांची निवड केली होती. या पदावर त्याआधी अशोक गेहलोत होते. या निवडीने सगळ्यांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता.

गेल्या तीन वर्षांत वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. 

ते औपचारिक आणि अनौपचारिक अशा सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये गांधींसोबत दिसतात. उदाहरणार्थ, गेल्या आठवड्यात जी-२३ चे नेते भूपिंदर हुडा यांनी राहुल यांची भेट घेतली तेव्हा ते उपस्थित होते.यावरून गांधींचा वेणुगोपाल यांच्यावर असलेला विश्वास दिसून येतो. सोबतच फक्त ५९ व्या वर्षी काँग्रेसमध्ये त्यांनी स्वतःचं निर्माण केलेलं स्थान त्यांची राजकारणावरील पकड दाखवून देते, याचाच फायदा काँग्रेस घेऊ शकतो.

त्यातच हा गेहलोत जे गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यांनी बंड केल्यानंतर गांधी घराणं बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास टाकणं अवघड आहे त्यामुळे सध्या राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये अगदी सावलीसारखे असणारे के. सी. वेणुगोपाल गांधी घराण्याची परफेक्ट चॉईस असल्याचं सांगितलं जातं.

२. मल्लिकार्जुन खर्गे

 पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे १९७२पासून काँग्रेमध्येच आहेत. खर्गे कर्नाटकातून राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत आणि १६ फेब्रुवारी २०२१ पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माजी रेल्वेमंत्री आणि कामगार व रोजगार मंत्री अशी पदंही भूषवली आहेत.

१९७२ ते २०१४ दरम्यान सलग ११ वेळा निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे २०१४-२०१९ दरम्यान लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते होते. 

कर्नाटकच्या राजकारणात एक मोठा चेहरा म्हणून खर्गे यांना ओळखलं जातं. 

२००५ साली त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या आणि कर्नाटकच्या ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. २०१४ च्या निवडणुकांमध्ये खर्गे यांनी गुलबर्गा संसदीय मतदारसंघातून निवडणूक लढवत ती जिंकली होती.

त्यांनी भाजपच्या प्रतिस्पर्ध्याला ७३००० हून अधिक मतांनी पराभूत केलं होतं. २०२३ मध्ये कर्नाटकाच्या निवडणूक लागल्या आहेत. तेव्हा खर्गे यांचा त्यांना फायदा होऊ शकतो. तर खर्गे गांधी यांचे विश्वासू देखील आहेत.

म्हणून तर नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

त्यांच्या गांधी घराण्याप्रती असलेल्या निष्ठेचं उदाहरण द्यायचं झाल्यास.. मार्च महिन्यात खर्गे यांना विचारण्यात आलं होतं की, ५ राज्यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा देतील का? त्यावर खर्गे यांनी उत्तर दिलं होतं की, “त्या एकट्या पराभवासाठी जबाबदार नाहीत, प्रत्येक राज्यातील नेता आणि खासदार जबाबदार आहेत, गांधी कुटुंब नाही.”

“आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे तेव्हा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं देखील खर्गे म्हणाले होते.

शिवाय अजून एक मुद्दा म्हणजे खर्गे हे दलित आहेत. 

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांना बघितलं जात होतं. तेव्हा खर्गे म्हणाले होते त्यांच्या कामामुळे हे शक्य झालंय इथे त्यांची जात हा फॅक्टर नव्हता. मात्र आता त्यांना काँग्रेस अध्यक्ष बनवताना ‘दलित’ फॅक्टर काँग्रेस नक्कीच लक्षात घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

३. मुकुल वासनिक

पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक हे गांधींच्या जवळचे मानले जातात. वासनिक २५ वर्षांचे असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ मध्ये वासनिक सर्वात तरुण खासदार बनले होते. वासनिक यांची १९८८-१९९० दरम्यान भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

तर २०२२ मध्ये राज्यसभेसाठी त्यांची नियुक्ती झाली.जुलै महिन्यात जेव्हा गोवा काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ५ आमदार नॉट रिचेबल झाले होते तेव्हा सोनिया गांधींनी परिस्थिती सांभाळायला मुकुल वासनिक यांना तिथे पाठवलं होतं. तेव्हाच त्यांचं काँग्रेसमधील वजन दिसून आलं होतं.

काँग्रेसच्या तरुण नेतृत्वाच्या अजेंड्यामध्ये वासनिक पूर्णतः बसतात. 

जर त्यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं तर तरुण मतदार काँग्रेसला त्यांच्याकडे वळता करता येईल. काँग्रेसने गेल्या ५ राज्यांच्या राज्यसभा निवडणुकांमध्ये तरुण उमेदवाराचं कार्ड वापरलं तेव्हा त्यांचा हा अजेंडा स्पष्ट झाला होता. त्यालाच पुढे नेत मुकुल वासनिक यांचं नाव घेतलं जात असल्याचं निरीक्षक सांगतात.

४. कुमारी शैलजा

कुमारी शैलजा या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री आणि पर्यटन मंत्री होत्या. १९९० मध्ये त्यांची राजकीय सुरुवात झाली ती काँग्रेस पक्षातूनच.

शैलजा १९९० मध्ये महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या होत्या. १९९१ मध्ये त्या हरियाणातील सिरसा इथून १० व्या लोकसभेवर निवडून गेल्या. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्या केंद्रीय शिक्षण आणि सांस्कृतिक राज्यमंत्री होत्या. ११ व्या लोकसभेवर त्या पुन्हा निवडून गेल्या.

शैलजा यांनी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री असताना त्यांनी महिलांचं सबलीकरण आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर काम केलं. ज्याने काँग्रेसमधील एक भक्कम महिला चेहरा म्ह्णून त्या उदयास आल्या.

एप्रिल २०२२ पर्यंत त्या हरियाणाच्या काँग्रेस अध्यक्ष होत्या. 

मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दलित नेता उदयभान यांना नवीन अध्यक्ष बनवलं आहे. मात्र शैलजा अजूनही काँग्रेसच्या निष्ठावंत आहेत. त्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या रेसमधील इतर चेहरे पुरुष आहेत. यात महिला चेहरा हवा आहे. याला कारण आहे काँग्रेसचा इतिहास.

काँग्रेस हा भारतातील असा राजकीय पक्ष आहे ज्यात महिलांना महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. महिलांना सोबत घेऊन चालणारा अशी काँगेसची ओळख आहे. ही ओळख टिकवून ठेवणं त्यांना गरजेचं आहे. त्यात काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष भाजपकडे बघितलं तर समजतं भाजपमध्ये पुरुष आघाडीवर आहे.अशात महिलेला अध्यक्ष बनवलं, तर काँग्रेसची प्रतीकात्मक खेळी म्हणून याकडे बघितलं जाऊ शकतं.

याचबरोबर दिग्विजय सिंग देखील सरप्राइज इंट्री घेऊ शकतात असं सांगितलं जात आहे. 

स्वतः दिग्विजय सिंग यांनी देखील तशी शक्यता बोलून दाखवली आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तर मी त्या आदेशाचं पालन करून अध्यक्षपद स्वीकारेन असं दिग्विजय सिंग म्हणाले आहेत.त्यामुळे आता गेहलोत यांच्यावरून हसू झाल्यानंतर काँग्रेस हायकमांड कोणत्या नावाला पुढे करते हे पाहण्यासारखं असणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.