सत्ता आणि मुख्यमंत्री असताना देखील शिवसैनिक पक्ष का सोडत आहेत?

सत्ता नसतांना नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जातात यात नवीन काही नाही. मात्र गेल्या दिड वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे, मुख्यमंत्रीपद आहे. पण त्याचं शिवसेनेमधील जेष्ठ शिवसैनिक, उपनेते, कार्यकर्ते एक तर पक्ष सोडून जात आहेत किंवा आपली नाराजी विविध मार्गांनी व्यक्त तरी करत आहेत.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला आल आहे. त्यानंतर सुद्धा शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून गेले आहे. त्यामुळेचं याबद्दल चर्चा होतं आहे.

त्यामुळे कोणत्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे आहे? आणि पक्ष सोडतांना काय कारणे दिले? हे पाहणे महत्वाचे आहे.

१. नरेंद्र पाटील

माथाडी कामगार नेते मत नरेंद्र पाटील यांनी मार्च महिन्यात शिवाबंधन सोडत अखेर जय महाराष्ट्र करत शिवसेना सोडली. महाविकास आघाडी सरकार येऊन दीड वर्ष होत आले. तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ मागूनही ते भेटत नाही. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले होते. डावलण्यात येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते.

सत्ता असतांना अशा प्रकारे नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडल्या नंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पक्षासाठी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभव बघायला लागला होता.

२. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे

शिवसेना उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे कॉंग्रेसमध्ये गेले आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित शिंदे यांचा नुकताच मुंबईतील टिळक भवन येथील कार्यक्रमात कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.

अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर ३ वेळा निवडून आले आहेत. तसेच ते सध्या उपनेते आहेत. पक्षाकडून स्थानिक पातळीवर डावलण्यात येत असल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते.

शिवसेना वर्धा जिल्हाप्रमुख अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात मतभेद आहेत. शिंदे यांनी मुंबईला जाऊन पक्ष नेतृत्वापुढे आपले मत सांगितले होते. परंतु सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही असं सांगत अशोक शिंदे शिवबंधन सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

३. सुरेश म्हात्रे

सुरेश म्हात्रे हे बाळ्या मामा म्हणून ठाणे ग्रामीण मध्ये प्रसिद्ध आहेत. सुरेश म्हात्रे हे अनेक वर्ष शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख होते. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती म्हणून काम पहिले आहे.

२०१४ मध्ये तिकीट न मिळाल्याने म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पराभवानंतर त्यांनी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र स्थानिक राजकारणात डावलण्यात येत असल्याचे कारण देत त्यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला आहे. पुढील काही दिवसात सुरेश म्हात्रे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,

एखाद नेता पक्ष सोडत असेल त्याच महत्वाच कारण हे स्थानिक राजकारण असतं. स्थानिक दुसऱ्या नेत्याला पक्षात महत्व वाढत आहे असे वाटू लागले तर, त्या दोन नेत्यात दरी निर्माण होते. भविष्यात या पक्षात आपल्या संधी मिळणार नाही असे त्यांना वाटू लागते. तर दुसऱ्या पक्षात गेल्यावर आपल्याला चांगली संधी मिळेल असे या नेत्यांना वाटते.

आपल्याला कुठे संधी मिळेल याची चाचपणी हे नेते करत असतात. सत्तेत आपल्याला काही लाभ मिळत नाही किंवा भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता नाही असे लक्षात आल्या नंतर नेते, कार्यकर्ते नवीन पर्याय शोधत असतात. सत्तेतील वाटा मिळत नसेल, त्याचा लाभाच मिळणार नसेल असे जेव्हा लक्षात येते त्यावेळी दुसरा मार्ग निवडतात असे अभय देशपांडे यांनी सांगितले.

शिवसेनेत सध्या नाराज नेत्यांची फौज..

सत्तेत आल्यानंतर तीन पक्षांचा सरकार असल्यामुळे शिवसेनेवर सध्या मंत्रीपदांच्या संख्येची बंधन आहेत. फडणवीस सरकारमध्ये असताना ही संख्या जास्त होती. परिणाम शिवसेनेत सध्या नाराज नेत्यांची एक फळीच तयार झाली आहे.

यात अगदी प्रताप सरनाईक यांच्यापासून मंत्रिपद न मिळाल्याने दीपक केसरकर, दीपक सावंत, रामदास कदम, रवींद्र वायकर असे सगळे नेते नाराज आहेत. यातुनच प्रताप सरनाईक यांनी मागच्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याबाबत पत्र लिहिलं होतं.

सत्ता नसतांना शिवसेना सोडणाऱ्या नेत्यांची कमी नाही

सत्ता नसतांना शिवसेना सोडणारांची संख्या मोठी आहे. त्यात  डॉ. रमेश प्रभू, सतीश प्रधान, गणेश नाईक, संजय निरूपम, बाळासाहेब विखे पाटील, सुरेशदादा जैन, गुलाबराव गावंडे, सुरेश नवले, सुबोध मोहिते, तुकाराम रेंगे पाटील, विलास गुंडेवार अशा अनेकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यापैकी जैन, गावंडे पुन्हा शिवसेनेत दाखल झालेत होते. मात्र त्यावेळी शिवसेना सत्तेत्त नव्हती. आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबद्दल जास्त चर्चा होतं आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.