मराठ्यांच्या पहिल्या जमिनी युद्धात हरलेले मुघल छ. शिवाजी महाराजांना अजिंक्य म्हणायला लागले

दिल्लीचे मुघल असोत कि विजापूरचा आदिलशहा या सगळ्यांच्या विरुद्ध मराठ्यांनी अनेक लढाया लढल्या होत्या. मुघल आणि आदिलशहाच्या तुलनेत मराठ्यांकडे सैनिकांची संख्या कमी होती आणि संसाधनं सुद्धा थोडी थोडकी होती. त्यामुळे मराठे हे कायम गनिमी काव्याने युद्ध करत होते.

त्या युद्धात शत्रूला आपल्या हल्ल्याची कल्पना न लागू देता त्याच्यावर हल्ला करणे आणि शत्रूला काही कळायच्या आत बाजी आपल्या हातात जिंकून घेणे हे मराठ्यांच्या युद्धाचं खास असं वैशिष्ट्य होतं.

परंतु सर्व युद्धांमध्ये गनिमी काव्याचा वापर करणाऱ्या मराठ्यांनी साल्हेरच्या युद्धात गनिमी काव्याचा वापर न करता थेट मैदानावर युद्ध केलं होतं.

साल्हेर किल्ला हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सगळ्यात उंचीवरचा किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी मान वर केली तर डोक्यावरची पगडी खाली पडेल असं या किल्ल्याचं वर्णन केलं जातं. हा किल्ला सरळ उभ्या पर्वतावर बांधला आहे. त्यामुळे किल्ल्यावर चढाई करायची म्हटल्यास ती केवळ दिवसाच्या उजेडात आणि थेट रस्त्यानेच शक्य होती. त्यामुळे हा किल्ला जिंकणं फार कठीण होतं. 

परंतु हार मानतील ते मराठे कसले!! 

१६६५ मध्ये शिवाजी महाराज आणि मुघलांमध्ये पुरंदरचा तह झाला. त्या तहानुसार महाराजांनी २३ किल्ले आणि ४ लाख होनांचा प्रदेश मुघलांना दिला. तसेच १६६६ मध्ये शिवाजी महाराज बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले. मात्र बादशहाने शिवाजी महाराजांना कैद केलं. तेव्हा बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज स्वराज्यात परतले.

स्वराज्यात परतल्यानंतर महाराजांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर मुघलांची आर्थिक राजधानी असलेल्या सुरत शहराची दुसऱ्यांदा लूट केली आणि सीमावर्ती भागातील मुघलांचे किल्ले सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. त्यातीलच एक साल्हेरचा किल्ला १६७२ मध्ये महाराजांनी मुघलांकडून जिंकून घेतला.

महाराजांनी किल्ला जिंकल्यामुळे चिडलेल्या मुघल बादशहाने किल्ल्याला परत ताब्यात घेण्यासाठी इख्लासखान या सरदाराच्या नेतृत्वात मोठी फौज महाराष्ट्रात पाठवली होती.  

मुघलांच्या फौजेत हत्ती, घोडे, उंट, तोफा आणि एक लाख पायदळ सैनिक होते. त्या अवाढव्य सेनेनं  किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा दिला. मुघलांनी किल्ल्याला दिलेला वेढा सुटण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपले पराक्रमी सरनोबत प्रतापराव गुजर आणि पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्यावर साल्हेरच्या युद्धाची जबादारी सोपवली. दोन सरदारांच्या नेतृत्वात जवळपास ५० हजार मराठा सैनिकांनी साल्हेरच्या किल्ल्याकडे कूच केली. 

किल्ल्याच्या पायथ्याला मुघलांच्या सेनेचा वेढा असल्यामुळे मराठ्यांना सुद्धा त्यांच्याशी मैदानातच युद्ध करणं भाग होतं. मग दोन्ही मराठा सरदारांनी मुघलांच्या सेनेत सैनिक घुसवले आणि युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही फौजांमध्ये प्रचंड मोठे युद्ध झाले. मुघलांना मोठ्या फौजेसह खुल्या मैदानात युद्ध करण्याचा सराव होता. तर मराठ्यांनी खुल्या जमिनीवर लढलेली ही पहिलीच लढाई होती. 

परंतु तरीही मुघलांच्या तुलनेत अगदी निम्म्या असलेल्या मराठा सैनिकांनी युद्धात मुघलांना सळो कि पळो करून सोडलं आणि साल्हेरचा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. 

युद्ध संपल्यावर इख्लासखानाच्या फौजेतले जिवंत असलेले ६ हजार घोडे, सव्वाशे हत्ती, ६ हजार उंट, खजिना, जडजवाहीर, मोठी बिछायत आणि १२ वजिरांना आपल्या ताब्यात घेतले. 

मात्र या युद्धात शिवाजी महाराजांचे विश्वासू असलेले, पुरंदरच्या पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे यांना तोफेचा गोळा लागला आणि ते रणांगणात कामी आले. त्यांच्या निधनामुळे शिवाजी महाराजांना प्रचंड दुःख झालं. 

शिवाजी महारा सूर्याजीरावांच्या वीरमरणाचं वर्णन करतांना म्हणाले की, 

“माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.”

अर्थात माझा सूर्याजी युद्ध करता करता महाभारतातल्या कर्णासारखा धारातीर्थी पडला.

मोकळ्या मैदानात युद्ध करतांना, सूर्याजींसारख्या हजारो मावळ्यांचं बलिदान देऊन मराठ्यांनी साल्हेर गड आपल्या हातात घेतला. मराठ्यांनी नेहमीच्या गनिमी काव्याच्या युद्धाऐवजी थेट जमिनीवर युद्ध करून मुघलांना हरवलं होतं. त्यामुळे जमिनीच्या युद्धात मुघलांना मराठे हरवूच शकत नाहीत असा  मुघलांना असलेला गर्व त्याच दिवशी गळून पडला.

पराभवानंतर मुघलांनी मराठ्यांना इतका धसका घेतला की त्यांनतर मुघल छत्रपती शिवाजी महाराजांना अजिंक्य म्हणायला लागले होते. तेव्हापासून सह्याद्रीतील सगळ्यात उंच किल्ला मराठ्यांच्या जमिनी युद्धाची साक्ष देत आहे.   

हे ही वाच भिडू  

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.