विलासराव म्हणाले, “एकदाच काय मी या महाराष्ट्राचा दोन वेळा मुख्यमंत्री होऊन दाखवेन”

साल १९९५. आश्चर्यकारकरित्या कॉंग्रेसचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडाला होता. एन्रॉन प्रकरणात भ्रष्टाचाराचा प्रचंड मोठा आरोप झाल्यामुळे शरद पवारांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले होते. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवर फडकला.

या निवडणुकीत कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले होते यात प्रमुख नाव होते विलासराव देशमुख.

विलासराव देशमुख लातूरमध्ये पराभूत होतील हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र विरोधकांनी एकजूटीने प्रयत्न करून हा चमत्कार घडवून दाखवला. या पराभवाच वर्णन अपघाती असच करण्यात आलं होतं. शरद पवारांना कॉंग्रेसमध्ये पर्यायी तरुण नेतृत्व म्हणून विलासरावांची अवघ्या महाराष्ट्राला ओळख होतं होती अशात त्यांना बसलेला धक्का हा राजकीयदृष्ट्या बॅकफुटला नेणारा होता.

दुसऱ्या दिवशी विजयी उमेदवाराच अभिनंदन करण्याचा दिलदारपणा विलासरावांनी दाखवला मात्र त्यांनी पुढच्या लढाईची तयारी पहिल्या दिवसापासून सुरु केली. लातूरच्या जनतेप्रमाणे त्यांनाही हा पराभव जिव्हारी लागला होता.

स्वपक्षीयांनी दगाबाजी केली होती आणि विलासराव सर्व हिशोब चुकते करण्यासाठी उतावळे झाले होते.

अशातच विधानपरिषदेच्या निवडणुका लागल्या. विलासरावांना कॉंग्रेसने तिकीट नाकारलं. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा डाव आहे अशी त्यांची समजूत झाली व त्यातूनच अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय विलासरावांनी घेतला. सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजपने आपला उमेदवार न उभा करता विलासरावांना पाठींबा देऊ केला.

विलासरावांचे खास मित्र गोपीनाथ मुंडे नव्यानेच उपमुख्यमंत्री बनले होते. कॉंग्रेस जर तुमचा सन्मान करत नसेल तर भाजपचे दार तुमच्यासाठी उघडे आहेत असे त्यांनी विलासरावांना संकेत दिले होते.

विधानपरिषदेची निवडणूक म्हणजे विधानसभेचे आमदार यास मतदान करतात. विलासरावांना युतीच्या आमदारांचा पाठींबा होता मात्र तरीही विजयासाठी एक मत कमी पडत होते. निवडणूक कॉंग्रेसने देखील प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी आपला एकही आमदार फुटू दिला नाही.

विलासरावांची सगळी आशा तेव्हा सुनील तटकरे यांच्यावर लागली होती. त्यांचे एकमेकांशी घनिष्ट संबंध होते. तटकरेंना राजकारणात पहिला ब्रेक विलासरावांनीच दिला होता त्यामुळे ते विलासरावांना खूप मानायचे. पुण्याचे डॉ.सारडा आणि नागपूरचे गिरीश गांधी हे विलासरावांचा निरोप घेऊन तटकरेनां भेटायला आले.

पण विलासराव विजयी झाले तर भाजपच्या वाटेला जातील म्हणून तटकरेनी मनावर दगड ठेवून त्यांना मत देण्यास नकार कळवला.

विलासरावांना अर्ध्या मताने पराभूत व्हावे लागले.

जवळच्या व्यक्तींनी दगा दिल्याची भावना विलासरावांच्या मनात बसली होती. हा त्यांच्यासाठी मोठ्या संघर्षाचा काळ होता. पीव्ही नरसिंहराव यांनी त्यांना कॉंग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित केले. अनेकांना वाटल की विलासराव देशमुखांच राजकारण संपलं. मोठ्या नेत्यांनी त्यांना वाळीत टाकल्या प्रमाणे केल होतं.

एकदा पीव्ही नरसिंहराव यांना भेटायला गेले असता त्यांनी त्यांना दोन तास वाट पाहायला लावली. त्यावेळी सोबत असलेल्या मित्राला विलासराव सहजपणे म्हणाले,

“भावे, ज्या कॉंग्रेसने आपल्याला खूप काही दिल त्या पक्षा खेरीज आपण निवडणूक लढविण्याची चूक केली. त्याची शिक्षा शिक्षा दोन तास बसायला लागणे ही फार काही नाही… “

याच पराभूत काळात विलासराव एका ग्रंथप्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांची ओळख करून देताना महाराष्ट्राचे माजी भावी मुख्यमंत्री असा टोला कारण नसताना हाणला. सभागृहात हशा पसरला पण विलासरावांचा चेहरा पहिल्यांदाच रागाने लालबुंद झाला होता. आपल्या भाषणावेळी भावनिक होऊन त्यांनी ठणकावून सांगितल,

“आता इथे माझा उल्लेख महाराष्ट्राचा माजी भावी मुख्यमंत्री असा केला गेला. परंतु मी इथे आज हे खात्रीने नमूद करतो की, भविष्यात मी या महाराष्ट्राचा एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री होऊन दाखवीन !”

विलासराव फक्त बोललेच नाहीत तर त्यांनी हे खरे करून दाखवले. अर्ध्या मताने झालेल्या पराभवाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं होतं. नव्याने सुरवात केली. १९९९ च्या निवडणूकीत मात्र लातूरच्या जनतेने मागच्या वेळी त्यांचा केलेला पराभवाचा पश्चाताप व्यक्त करत एवढ बहुमत दिल की तो एक विक्रमच बनला.

४ वर्षापूर्वी राजकारण संपले अस म्हटल जात होते ते विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी सुनील तटकरेंची भेट घेतली आणि त्यांना मिठी मारून म्हणाले,

“सुनील, आज जो काही मी झालो, तो तू मला तुझे मत न दिल्यामुळे झालो आहे…”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.