भारताच्या त्या हल्ल्यानंतर कराची बंदर तब्बल सात दिवस जळत होतं.

भारत- पाकिस्तानाचा वाद आणि या दोन देशातील युद्धं आपल्यासाठी नवीन नाही. मात्र भारताने केलेल्या एका हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील कराची बंदर तब्बल सात दिवस जळत होतं. त्या आँपेरशन ट्राईडेंट बद्दल तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत.

१९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ या सगळ्या युद्धात भारतानं पाकिस्तानचं अक्षरशा कबरडं मोडलं आहे. त्यामुळे समोरासमोरा लढाई करण्याची पाकिस्तानची हिम्मत नाही. मात्र आत्तापर्यंतचे जेवढेही युद्ध झालेत ते जंगलात, पहाडावर, बर्फाळ भागात झाले. मात्र या सगळ्यात महत्वाचं युद्ध झालं आणि ते सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलं ते १९७१ सालचं पाण्यातलं युद्ध.

साल होतं १९७१. बांग्लादेश फाळणीचा प्रश्न धगधगत होता. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्याला पुर्णपुणे पाठिंबा दिला. जी मदत लागेल ती पुरवली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा भारतावर रोष वाढला.

या रोषातून पाकिस्तानाच्या हवाई दलानं ३ डिसेंबरला भारताच्या हवाई अड्ड्यांवर हल्ला चढवला आणि युद्धाची सुरूवात केली. भारताच्या लष्कराकडून आणि हवाई दलाकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युतर देण्यात येत होतं. मात्र भारतीय नौसेनेनं केलेल्या हल्ल्यानं पाकिस्ताननं शरणागती पत्करली.

कशी ठरली नौसेनेच्या हल्ल्य़ांची योजना ?

त्यावेळी भारतीय नौसेनेचे अँडमिरल एस. एम. नंदा होते. आँक्टोबरमध्ये त्यांनी प्रधानमंत्री इंदिरा गांधीची भेट घेतली होती. जर पाकिस्ताननं युद्ध पुकारलं तर आपलं नौदल सज्ज असावं यासाठीच ही भेट होती. त्यावेळी नंदानं इंदिरा गांधींना विचारलं.

“जर भारतीय नौसेनेनं पाकिस्तानवर हल्ला केला तर राजकारणात काही तणाव निर्माण होतील का?”

त्यावर इंदिरा गांधीं म्हणाल्या तुम्ही हा प्रश्न का विचारताय???  त्यावर नंदानं सांगितलं की , १९६५ च्या युद्धात नौसेनेला आदेश देण्यात आलेला आहे की, ते समुद्री सीमा सोडून कुठेच कारवाई करणार नाहीत. आणि तो आदेश आजही लागू आहे.

इंदिरा गांधींनी विचार केला आणि म्हणाल्या,

“अॅडमिरल युद्ध युद्ध असतं ,प्रत्येक जण आपल्या हद्दीतच राहिला तर युद्धच होणार नाही.”

त्यावेळेसच्या इशाऱ्यातून नंदा यांना उत्तर मिळालं होतं. ते इंदिराजींना धन्यवाद बोलून निघून गेले.

 त्यानंतर काही दिवसांनी इंदिरा गांधींनी  नंदा यांना एक गुप्त पत्र पाठवलं त्यामध्ये कराची बंदरावर हमला करण्याची योजना होती.

भारतीय सेना एक दिवस ठरवून कराची बंदरावर हमला करेल. यावेळी भारतीय जहाज जवळपास १५० किलोमीटर दुर राहतील. जेणेकरून पाकिस्तान भारतीय जहाजावर हमला करणार नाहीत.

अखेर तो दिवस उजाडला…

भारताकडून युद्धासाठी तीन बोटी सज्ज करण्यात आल्या होत्या. प्रत्येक बोटीवर चार मिसाईल ठेवलेल्या होत्या आणि लढाऊ आयएनएस किल्टन नावाचं जहाजही तैनात करण्यात आलं होतं. या आँपरेशनची संपुर्ण जबाबदारी स्क्वाड्रन कमांडर बबरू यादव यांना देण्यात आली होती.

४ डिसेंबरला रात्री १० वाजून ४० मिनीटांनी यादवनां कराचीपासून काही अंतरावर काही हालचाली सुरू असलेल्या रडारवर दिसल्या. त्यांनी वेळ न घालवता पाकिस्तानच्या खैंबर नावाच्या जहाजावर दोन मिसाईल डागल्या. त्या हल्ल्यानं पाकिस्तानच्या खैबर जहाजानं पेट घेतला. त्यापाठोपाठ विनस, शहाजहां आणि पाकिस्तानी माइन स्वीपर पीएन एस मुहाफ़िज़वरही हल्ला चढवून भारतीय जहाजानं त्यांची धुळधाण केली.

त्यानंतर कराची बंदरावर असणाऱ्या तेल जहाजांवर मिसाईल डागण्यात आली. त्यानंतर या तेल जहाजांनी पेट घेतला त्यानं अख्खं कराची बंदर उद्धवस्त झालं. कराची बंदरावर लागलेली आग ६० किलोमीटरवरून दिसत होती. जवळपास सात रात्र आणि सात दिवस कराची बंदर जळत होतं.

असं म्हणतात की या हल्ल्यानंतर निम्मं पाकिस्तानी आरमार उध्वस्त झालं होत आणि महत्वाचं म्हणजे भारतीय नौदलाची कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात यशस्वी कारवाई म्हणून या युद्धाकड पाहिलं जात.

या पराक्रमाबद्दल स्क्वाड्रन कमांडर बबरू यादव यांना महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

अशाप्रकारे आँपरेशन ट्राइडेंट यशस्वी झालं होतं. या दिवसानंतर ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येवू लागला. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिला गेला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.