राणी एलिझाबेथच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये झेंडा ते नोटा अशा बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत…

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानही दुःख व्यक्त केलं आहे. भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला. सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्या उंचीवर आणण्यात आला.

राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांच्या कारकीर्दीनंतर प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे राजे होणार आहेत. पण ब्रिटनमध्ये फक्त सिंहासनावर बसणारी व्यक्तीच नाही, तर इतर अनेक गोष्टीही बदलणार आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे ७० वर्षानंतर एखाद पुरुष ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होणार आहे. यामुळे ध्वजापासून ते नोटेपर्यंत अनेक गोष्टीत बदल करावे लागणार आहेत.

नोटा

ब्रिटनमध्ये राणीचा फोटो असलेल्या ४.५ बिलियन पौंड नोटा चलनात आहेत. या नोटांवरील फोटो बदलण्यासाठी पुढील दोन वर्ष लागणार असून यासाठी बकिंगहॅम पॅलेसची परवानगीही लागणार आहे. १ हजार १०० वर्षांपासून ब्रिटनच्या नोटांवर राणीचा फोटो छापला जात आहे. १९५२ मध्ये राणी एलिझाबेथ पदावर आल्यानंतर पौंड आणि नाण्यावर त्यांचे फोटो होते.

राणींच्या समर्थनात दहा वर्षांपूर्वी नवीन नाणीही काढण्यात आली होती, त्यावर राणीचे चिन्ह होते. ब्रिटनची रॉयल मिंट कंपनी हे नाणे काढत असते. कंपनीच्या म्हणण्यानुसार राणीचे चित्र असणारे नाणे आठवण म्हणून चलनात राहील, तर किंग चार्ल्स यांचे फोटो असणारे नाणे सुद्धा लवकरच बाजारात आणले जाईल.

राणी एलिझाबेथ यांचा डावीकडे पाहतानाचा फोटो नाण्यावर होता. आता किंग चार्ल्स यांचा उजवीकडे पाहतानाचा फोटो छापण्यात येणार आहे. जेव्हा कधी सिंहासनावरची व्यक्ती बदलते, तेव्हा असा बदल करण्यात येतो.

राणीचे फोटो असलेल्या नोटा चलनात राहणार असल्याची माहिती बँक ऑफ इंग्लंडच्या वतीने देण्यात आली आहे. नवीन नोटांचा निर्णय राष्ट्रीय दुखवटा संपल्यानंतर घेण्यात येणार आहे.

ध्वज 

ब्रिटनमध्ये राजघराण्याच्या ध्वजाला ‘द रॉयल स्टँडर्ड’ म्हणतात. पोलीस स्टेशन पासून राणी राहत असलेल्या राजवाड्यावर हा ध्वज फडकवला जात असे. त्यांच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये, त्यांच्या विमानात आणि कारवरही हा ध्वज लावला जातो. 

१६०३ पासून ध्वजात अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या ध्वजात इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या प्रतीकांची चिन्ह आहेत. वेल्सचे प्रतीक यात नव्हते, पण नवीन ध्वजात त्याचा सहभाग केला जाऊ शकतो. किंग चार्ल्स खाजगी ध्वज सुद्धा घेऊ शकतात. १९६० मध्ये राणी एलिझाबेथ यांनी असं केलं होत. आता राणीच्या मृत्यूनंतर हा ध्वज बदलण्याची दाट शक्यता आहे.

ब्रिटनचे राष्ट्रगीत

राणीच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या राष्ट्रीय गीतात बदल करण्यात येणार आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रगीताच्या पहिल्या ओळीत God save our gracious Queen! असा उल्लेख आहे.

गेली ७० वर्ष हे राष्ट्रगीत म्हटले जात आहे. आता ब्रिटनच्या राजगादीवर राणी ऐवजी राजा असणार आहे. त्यामुळे राष्ट्रगीतात Queen ऐवजी King म्हणावं लागेल. याशिवाय राष्ट्रगीतात दुसरा कुठलाच बदल करण्यात येणार नाही.  

पासपोर्ट

ब्रिटनच्या सगळ्या नागरिकांच्या पासपोर्टवरील माहितीमध्ये सध्या ‘Her Majesty’ असा उल्लेख आहे. आता नवीन पासपोर्टमध्ये ‘His Majesty’ लिहले जाणार आहे. तसेच राजघराण्यातील संबंधित नावे, आणि अनेक गोष्टींवर असा उल्लेख करण्यात येणार आहे.

याच बरोबर अनेक लहान मोठे बदल ब्रिटन मध्ये करण्यात येणार आहे. तिथल्या पोलीस आणि आर्मीच्या जवानांच्या ड्रेसवर राणीचे प्रतीक आहे. नवीन राजा आल्यानंतर ही सगळी प्रतीके बदलण्यात येणार आहेत.  ब्रिटनच्या संसदेचे अधिवेशन राजाच्या भाषणाने सुरू होईल. तसेच बकिंगहॅम पॅलेस समोर सुरक्षा रक्षकांच्या ड्रेस कोडमध्येही बदल करण्यात येणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.