तांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे?

मागच्या ५ ते ६ दिवसांपासून देशात ‘तांडव’ वेब सिरीजला जोरदार विरोध प्रदर्शन चालू आहे. निर्मात्यांना कायदेशीर नोटीस मिळाली. त्यांच्या विरुद्ध FIR पण दाखल झाला. यानंतर हे प्रकरण शांत करण्यासाठी ‘तांडव’कडून एक स्टेटमेंट दिलं. ज्यात त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागत असल्याचे सांगितलं. पण त्यानंतर देखील जास्त काही फायदा झाल्याचं दिसलं नाही.

कारण आता ज्या सीन्सवर प्रेक्षकांकडून आक्षेप घेण्यात आला ते सगळे सीन्स आता हटवले जाणार आहेत. तांडवचे दिग्दर्शक आणि निर्माता अली अब्बास जफर यांनी ट्विटवरून यासंबंधीची माहिती दिली.

पण यानंतर देखील वाद थांबायचं नाव घेत नाही. मंगळवारपासून सोशल मीडियावर भारतात ईशनिंदा किंवा देवनिंदा कायदा आणण्याची मागणी होत आहे.

जगात या आधी असा कायदा असलेले पाकिस्तान, इराण यांसारखे बरेच धार्मिक देश आहेत, त्यानंतर आता भारतात देखील असा कायदा आणण्याच्या मागणीनं जोर धरला आहे.

या मागणीत भाजपचे नेते देखील मागे नाहीत. राजस्थानच्या अलवारमधून खासदार असलेले योगी बालकनाथ देवनिंदा कायदा आणण्याची वेळ आली असल्याचं ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट दक्षिण दिल्लीचे एमसीडीचे मेयर आणि भाजप नेता नरेंद्र कुमार चावला यांनी रिट्विट करत ही मागणी केली. काही लोकांनी तर यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे.

आता प्रश्न असा की, ईशनिंदा म्हणजे नेमकं काय?

ईशनिंदा म्हणजे नावाप्रमाणेच ईश्वराची निंदा करणे किंवा प्रार्थना करण्याच स्थळ किंवा साधन (मूर्ती, झेंडा, पुस्तक, व्यक्ती) यांना जाणीवपूर्वक नुकसान पोहचवणे.

ईशनिंदा किंवा देवनिंदा कायदा असलेले देश कोणते?

वर उल्लेखल्या प्रमाणे, जगात असा कायदा असणारे बरेच देश आहेत यात प्रामुख्याने येणारे देश म्हणजे

पाकिस्तान :

आपला शेजारी असलेला हा देश धर्माच्या आधारावर बनला आहे. त्यामुळेच तिथे ईशनिंदा साठी अत्यन्त कडक कायदे बनवले गेले आहेत. हा कायदा अगदी ब्रिटिश शासनात बनला होता (म्हणजे भारतात देखील हा कायदा अस्तित्वात होता, पण तो केवळ धर्माशी संबंधित होता, पुढे त्यावर सविस्तर लिहिलं आहे).

पुढे स्वातंत्र्यानंतर देखील पाकिस्तानात हाच कायदा स्वीकारला गेला. या कायदयानुसार जर कोणी धार्मिक भावनांना दुखावले किंवा लिखित अथवा मौखिक स्वरूपात अपमान केला तर त्याला शिक्षेची तरदूद करण्यात आली होती. यात १ ते १० वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद होती.

पुढे १९८० नंतर पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने ईशनिंदेसंबंधित कायदा आणला. त्यातील कलमांची विभागणी दोन भागात केली होती. यात पहिला होता अहमदी विरोधी कायदा आणि दुसरा होता ईशनिंदा कायदा. पुढे १९८२ मध्ये यात आणखी एक कलम जोडलं गेलं. त्यानुसार जर कोणी व्यक्ती कुरानला अपवित्र करत असेल तर त्याला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली.

१९८६ साली आणखी वेगवेगळी कलम जोडून मोहम्मद पैगंबर यांची ईशनिंदा बंदीचे प्रावधान केलं गेलं. याच्यात जन्मठेपेची किंवा फाशीच्या शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली.

इराण :

इस्लामिक क्रांती होण्यापूर्वी इराण एक विकसित देश म्हणून वाटचाल करत होते. पण १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांती नंतर इथं देखील धर्मावर आधारित कायदे बानू लागले. त्यानंतर २०१२ मध्ये नव्याने लिहिण्यात आलेल्या दंड संहितेमध्ये ईशनिंदासाठी नवीन कलम जोडण्यात आली,

यानुसार धर्माला न मानणारे आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षेची तरतूद केली. सोबतच कलम २६० अंतर्गत कोणतीही व्यक्ती जर पैगंबर-ए-इस्लाम किंवा कोणत्याही पैगंबरची निंदा करत असेल तर त्यांना देखील मृत्युदंडाचीच शिक्षा दिली जाते.

इजिप्त 

इजिप्तमध्ये २०१४ साली मोठे आंदोलन उभे राहिले होते. यालाच अरब स्प्रिंग असं देखील म्हंटल जात. याच आंदोलनानंतर तिथं घटनादुरुस्ती होऊन इस्लामला इजिप्तचा राष्ट्रीय धर्माचा दर्जा देवून इतर धर्माना अवैध मानलं गेलं. इजिप्तच्या दंड संहितेतील कलम ९८-एफ नुसार ईशनिंदावर बंदी आहे.

त्याच्या उल्लंघनावर कमीत कमी ६ महिने आणि जास्तीत ५ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

सौदी अरेबिया :

सौदी अरेबियामध्ये इस्लामी शरिया कायदा लागू आहे. या शरिया कायद्यांतर्गत ईशनिंदा करणाऱ्या लोकांना धर्माला न मानणारे घोषित केलं जात आणि त्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेची दिली जाते. नास्तिकतेचा प्रचार करणं, इस्लामच्या मूलभूत सिद्धांतावर प्रश्न करणं हा देखील गुन्हा मानला जात आहे.

यासारखेच कडक कायदे, कतार, सुदान, तुर्की, इंडोनेशिया, मलेशिया या देशांमध्ये देखील अस्तित्वात आहेत.

भारतात ईशनिंदेवर कायदा आहे का?

वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्रिटिश राजवटीपासून भारतात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कायदा तयार करण्यात आला होता. तोच पुढे पाकिस्तानने स्वीकारला आणि १९८० च्या दशकात त्याला ईशनिंदा विरोधी कायद्याची जोड देऊन तो आणखी कडक केला.

भारतात देखील आजही ईशनिंदेचा नाही तर धार्मिक भावना दुखावल्याचा कायदा अस्तित्वात आहे. यानुसार ‘भारतीय दंड विधाना’च्या कलम 295 (A) नुसार, ‘मुद्दामहून धार्मिक भावना दुखविण्यासाठी कोणत्याही गटाच्या धर्मश्रद्धेचा अपमान करणे’ हा गुन्हा आहे. तसेच, कलम 298 नुसार, ‘मुद्दामहून कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अभिव्यक्त होणे’ हा गुन्हा आहे.

पण प्रामुख्याने ईश्वराची निंदा करणे, प्रार्थना करण्याच स्थळ किंवा साधन (मूर्ती, झेंडा, पुस्तक, व्यक्ती) यांना जाणीवपूर्वक नुकसान पोहचवणे. त्यांचा अपमान करणे यासाठी कायदा नाही.

भारतातील अस्तित्वात असलेला कायदा आणि कट्टर ईशनिंदा कायदा यात बेसिक फरक असा आहे की, भारतातील कायदा हा कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्याच्या हेतूचा देखील तपास करते. जर न्यायालयात जाणीवपूर्वक किंवा ‘वाईट हेतूने नुकसान पोहोचवण्याचा उद्देश’ हि गोष्ट सिद्ध झाली नाही तर या 295 (A) कायद्यानुसार गुन्हा सिद्ध होत नाही.

त्यामुळेच आता प्रामुख्याने ईशनिंदा थांबवण्यासाठी कायदा आणण्याची मागणी होत आहे. जगात अमेरिका, चीन, कॅनडा काही युरोपीय देश आणि आफ्रिकी देश सोडून बाकीच्या देशांमध्ये धार्मिक भावना दुखावणे आणि ईशनिंदा बंदी यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. तर त्यांच्या कडक अंमलबजावणीच्या बाबतीत पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे टॉपला आहेत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.