आरोग्यसेवा भरतीपासून ते म्हाडाच्या पेपर फुटीचं बिंग फोडलं ते पुण्याच्या सायबर पोलिसांनी..!

राज्यात साधारण १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. यासाठी अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. मात्र, यातील काही जण प्रलोभनाला बळी पडून कमी वेळेत यशस्वी होण्यासाठी इतर पर्याय शोधात असतात.

यावर अनेकांचे लक्ष असते आणि असे सावज ते हेरतात. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीत अशाच प्रकारचे मोडस ऑपरेण्डी वापरण्यात आली आहे. या प्रकरणात स्वतः अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पेपर फुटीचा काही प्रमाणात छडा पुणे सायबर पोलीस ठाण्याने लावला आहे आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसापूर्वी असाच आर्मी भरतीचा पेपर घोटाळा बाहेर काढला होता. आता आरोग्य विभाग आणि म्हाडा विभागाचा पेपर फुटीचे प्रकरण सुद्धा पुणे पोलिसांनी बाहेर काढले आहे. या दोन्ही विभागाचा पेपर फूट प्रकरणात एकच लिंकअसल्याचे समोर येत आहे. पुढील काही दिवसात हे प्रकरण पूर्ण समोर येईल अशी माहिती पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  

 आरोग्य विभागाच्या ‘ड’ गट पेपर फोडण्यामध्ये मोठे मासे

३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची ड गटाची परीक्षा असताना ‘ड’ गटाचा पेपर परीक्षा सुरू होण्याआधीच फुटला होता. दुपारी २ वाजता सुरु होणार पेपर १० वाजताच अनेकांना व्हाट्सपवर मिळाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारेच ही कारवाई केली आहे.

या पेपरफुटीत दलाल, क्लासचालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या समावेश.

मुख्य म्हणजे या प्रकरणात आरोग्य विभागाचे मुख्य संचालक महेश बोटले यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या समितीने आरोग्य भरतीचा पेपर सेट करते त्या समितीमध्ये महेश बोटले हे सदस्य होते. याचा अर्थ कुंपणच शेत खातंय असंच म्हणावे लागेल.

लातूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बडगिरे हे देखील या रॅकेटमध्ये होते. बडगिरे यांना अटक करून अधिक तपास केल्यानंतर पेपर फुटीत महेश बोटले यांचा समावेश असल्याचे समोर आले होते.आता पर्यंत या प्रकरणात एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

बोटले यांना केवळ २० जणांनाच पेपर द्यायचे होते
आरोग्य विभागाच्या पेपर ज्या समितीने तयार केला होता त्यात आरोग्य विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांचा समावेश होता. त्यांनी हा पेपर केवळ २० जणांना प्रत्येकी ५ लाख रुपये देऊन पाठविण्याचे ठरविले होते. त्यांनी ठरविल्या प्रमाणे २० जणांना पेपर व्हाट्सप द्वारे पाठवला होता. मात्र, ज्या २० जणांना बोटले यांनी पेपर पाठवला होता. त्यांनी तो पेपर दुसऱ्यांना पाठविला आणि बोटले हे या प्रकरणात अडकले. सध्या ते पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी आरोग्य विभागातील पेपर फुटी प्रकरणी एकूण १४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे.

आता आरोग्य विभागाच्या पेपर फुटी नंतर रविवारी होणारा म्हाडाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. ज्या कंपनीला पेपर सेट करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच कंपनीच्या संचालकाला पेपर दुसऱ्यांना देतांना पुणे पोलिसांनी रंगे हात पकडले आहे.

संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी परीक्षेच्या आधीच म्हाडाचा पेपर विद्यार्थांना देण्याची तयारी दाखवली होती. हि माहिती पुणे पोलिसांना कळाली होती. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ट्रॅप लावला होता. शनिवारी रात्री या दोघांना पकडण्यासाठी गेले असता त्यावेळी  म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख आढळून आला.

प्रितीश देशमुख हे G.A.software या कंपनीचे संचालक असून, त्यांच्या संस्थेतर्फे MHADA च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे पेपर सेट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनीच हा पेपर फोडला. 

प्रितीश देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या लॅपटॉपमध्ये MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह पोलिसांना सापडले असून, त्यामध्येही MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपरसेट सापडले असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस पथकाने टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले आहे.  त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे MHADA च्या परीक्षेसाठी बसणाऱ्या ३ परीक्षार्थ्यांची प्रवेश पत्रे, त्यांची मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश व आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गासाठी बसलेल्या १६ आणि ‘ड’ वर्गासाठी बसलेल्या ३५  परीक्षार्थ्यांच्या नावाच्या याद्या, प्रवेश पत्रांच्या प्रती आढळून आल्या आहेत.

आरोग्य विभाग आणि म्हाडा विभागाचा पेपर फूट प्रकरणात एकच लिंक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे दोन्ही घोटाळ्यात एकच रॅकेट असल्याची चर्चा आहे. 

हा पेपर फुटल्याने याचा  फटका २ लाख ५० हजार पेक्षा अधिक विद्यार्थांना बसला आहे. अनेकजण आपल्या गावाकडून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, पेपर सेट करण्याची जबाबदारी असणाऱ्या कंपनीच्या संचालकांना पेपर देतांना रंगेहात पडल्याने हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात आर्मी भरती, आरोग्य विभागाची आणि म्हाडा विभागाचा पेपर फुटीचे  प्रकरण बाहेर काढले आहे. याचा सर्व तपास करून त्यात दोषी असणाऱ्यांना अटक करण्यात पुणे सायबर पोलिसांची  महत्वाची भूमिका आहे.  

सायबर पोलीस ठाण्याचे महत्व

पुणे सायबर ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सायबर क्राईम बाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी हे टेक्नो सेव्ही आहेत. त्यामुळे तांत्रिक बाबतीत हे अधिकारी, कर्मचारी उजवे ठरतात.

नायजेरियन फ्रॉड, डिफमेशनच्या केसेस, सायबर गुन्हे संदर्भात एक-एक अधिकारी नेमून दिला असून त्यानुसार कामकाज या पोलीस स्टेशन मधून चालत.

२०१८ मध्ये पुण्यात पहिले सायबर पोलीस स्टेशनची सुरुवात झाली.

पुणे पोलिसांकडून २००८ पासून राज्य सरकारकडे सायबर पोलिस ठाण्याची मागणी करण्यात येते होती. तेव्हा फक्त मुंबई पोलिसांकडे सायबर पोलिस ठाणे होते. १० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर २०१८ मध्ये पुण्यात सायबर पोलीस ठाण्याला मान्यता देण्यात आली होती. मात्र इथे दाखल होणाऱ्या गुन्ह्यासाठी न्यायालय मंजूर नसल्याने कामाला सुरुवात झाली नव्हती. २०१९ मध्ये या सायबर पोलीस ठाण्याला न्यायालय मंजूर झाल्याने तेव्हा पासून पूर्ण कामकाज पुणे सायबर पोलीस ठाण्यातून चालत आहेत.

कमी अधिक नाही तर एक वर्षात ५ हजार पेक्षा अधिक फसवणुकीच्या तक्रारी या पोलीस ठाण्याकडे  आल्या आहेत. त्यामुळे सायबर क्राईमची किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे लक्षात येईल. सायबर पोलीस ठाण्याची  १० वर्षांनंतर मागणी पूर्ण झाल्यानंतर याचा फायदा सामान्य नागरिकांना होतांना दिसत आहे.  पेपर फुटीचे प्रकरण पुणे सायबर पोलिसांनी खणून काढले आहे. 

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.