आज डीपी बदलला मात्र, तब्बल ५२ वर्ष संघाच्या मुख्यालयात तिरंगा फडकत नव्हता..
यंदा भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. यानिमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर-घर तिरंगा’ या मोहिमेची घोषणा केली आणि सोबतच नागरिकांनी आपापल्या सोशल मीडियावर तिरंग्याचा डीपी ठेवावा असंही आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर आपापल्या डीपीला तिरंगा ठेवला.
याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र तिरंग्याचा डीपी न ठेवता, भगव्या ध्वजाचा डीपी कायम ठेवला होता आणि त्यावरुन त्यांच्यावर आणि भाजपवर विरोधकांनी टीका केली. शनिवारी १३ तारखेला मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या सोशल मीडियावर तिरंग्याचा डीपी ठेवला आणि सोबतच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपला डीपी बदलत तिरंगा बदलला.
पण अजूनही विरोधी पक्षांकडून एक टीका केली जाते, ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळपास ५२ वर्ष संघाच्या मुख्यालयात झेंडावंदन होत नव्हते.
याबद्दल अधिक माहिती घेतली असता, स्वातंत्र्याच्या तीन वर्षानंतर म्हणजे १९५० पासून ते २००२ सालापर्यंत संघाच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन या भारताच्या राष्ट्रीय सणादिवशी झेंडावंदन केले जात नव्हते.
मात्र २००१ साली एक घटना घडली आणि त्यानंतर लगेचच २००२ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकू लागला.
२२ जुलै १९४७. भारताच्या संविधान सभेने सर्वसंमतीने राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा स्वीकारला. भारतासाठी हा काहीसा भावनिक क्षण होता, स्वातंत्र्य मिळण्याच्या उंबरठयावर असताना भारताची जगात ओळख करून देणारा झेंडा मिळाला होता.
मात्र संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांनी तिरंग्याचा जाहीरपणे विरोध केला. आपल्या ‘विचार नवनीत’ किंवा इंग्रजीमध्ये ‘बंच ऑफ थॉट्स’ या नावाने लिहिलेल्या पुस्तकामध्ये ते म्हणतात,
आपल्या नेत्यांनी आपल्यासाठी एक नवीन ध्वज निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी असं का केलं असावं? हे आपल्या समृद्ध वारशाला नाकारून कोणताही पुढचा मागचा विचार न करता दुसऱ्यांची नक्कल केल्याचं स्पष्ट उदाहरण आहे.
ते पुढे म्हणतात, ‘या निर्णयाला बरोबर आणि राष्ट्रवादी दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे असे कोण म्हणु शकते? हा केवळ गडबडीमध्ये केलेलं राजकीय समाधान आहे. आपला देश प्राचीन आणि समृद्ध वारसाने महान आहे, पण त्यानंतर देखील आपल्याजवळ एक झेंडा नाही? नक्कीच आहे. मग हा असा निर्णय का?’
गोळवकरांच्या या विचारांची प्रेरणा त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले विचार असल्याचं सांगण्यात येतं.
सावरकर यांच्या मते हिंदुस्थानमध्ये अधिकृत झेंडा फक्त आणि फक्त कुण्डलिनी आणि कृपाणच्या सह असलेला भगवा ध्वजच असू शकतो. सोबतच त्यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की, हिंदू कोणत्याही परिस्थितीमध्ये अखिल हिंदू ध्वज म्हणजेच भगवा ध्वजाशिवाय अन्य कोणत्याही ध्वजाला सलाम करणार नाही.
पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्य मिळाल्याच्या साडेचार महिन्यांमध्येच महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर दोन दिवसांमध्येच गांधींच्या हत्येत सहभागी असल्याच्या आणि समर्थन केल्याच्या आरोपावरून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी आणली.
यानंतर १४ नोव्हेंबर १९४८ रोजी गृह मंत्रालयाने एक प्रसिद्धपत्रक काढून माधवराव गोळवकर यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री या दोघांना लिहिलेले पत्र सर्वांसमोर आणले. आपल्या त्या पत्रामध्ये तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर म्हणतात,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या धर्मनिरपेक्ष राज्य संकल्पनेला पूर्णतः मानत आहे, तसेच आम्ही राष्ट्रीय ध्वजाला देखील स्वीकारत आहे. आणि सोबतच अशी देखील विनंती करतो की, फेब्रुवारीपासून आमच्या संघटनेवर लावलेली बंदी हटवली जावी.
पुढे १९५० मध्ये जेव्हा सरदार पटेल यांनी संघावरील बंदी हटवण्याची तयारी दाखवली, त्यावेळी त्यांनी संघासमोर दोन अटी ठेवल्या. त्यापैकी एक होती, तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मानण्यात यावं. या अटींचा स्वीकार केल्यामुळे त्यावेळी संघावरील बंदी उठवण्यात आली.
मात्र त्यानंतर देखील पुढची जवळपास ५२ वर्ष संघाच्या मुख्यलयामध्ये प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी झेंडा वंदन केलं जात नव्हतं. विरोधक सातत्याने यासंबंधीचा प्रश्न विचारत होते.
यानंतर २००१ मध्ये प्रजासत्ताक दिन दिवशी अचानकच नागपूर मधील रेशीम बाग इथं संघाच्या मुख्यालयामध्ये तीन तरुणांनी जबरदस्ती घुसत तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. संघाने याचा आरोप राष्ट्रप्रेमी युवा दलाचे सदस्य असलेले बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप चटवानी यांच्यावर केला.
तिघांवर देखील आरोपपत्र दाखल झालं, केस नागपूरच्या न्यायालयात गेली, संघाने आरोप मागे घेतले नाहीत, जवळपास १२ वर्ष या घटनेची सुनावणी चालली, आणि २०१३ मध्ये न्यायालयाने या तिघांना निर्दोष सोडून दिलं.
मात्र २००१ साली घडलेल्या याच घटनेनंतर त्याच्या पुढच्या वर्षीपासूनच म्हणजे २००२ या वर्षापासून दरवर्षी संघाच्या मुख्यालयात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी दिवशी झेंडा वंदन करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार होते आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.
जरी आता दरवर्षी झेंडा वंदन करण्यास सुरुवात झाली असली तरी देखील आज ही विरोधी पक्ष त्या ५२ वर्षांबद्दल विचारतात.
याबाबद्दल २०१६ मध्ये भाजपचे राज्यसभा सदस्य आणि संघाशी संलग्न असलेल्या पंचजन्य मासिकाचे माजी संपादक तरुण विजय टेलिग्राफ या वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले होते,
संघावर तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज न मानण्याचे आरोप होतात यात शंका नाही, पण संघ राष्ट्राच्या झेंड्यासाठी जगतो आणि झेंड्यासाठीच मरतो.
“राहिला प्रश्न झेंडा वंदन न करण्याचा, संघाकडे सांस्कृतिक झेंडा आहे जो महाभारतापासून असलेल्या भारताच्या संस्कृतीशी नातं सांगतो. तिरंगा हा राष्ट्रीयत्वाचं प्रतीक आहे, राष्ट्राभिमान आहे. पण तो न फडकवण्यामध्ये तिरंग्याचा अपमान करण्याचा कुठंही उद्देश नव्हता.”
हे हि वाच भिडू.
- वसंतदादा पाटलांनी आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरु केली होती.
- ९८ व्या वर्षी पर्यंत सक्रिय राहून सच्चा स्वयंसेवक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं..
- संघाचा कट्टर स्वयंसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो हे एकदाच घडलं होतं