१२व्या वर्षी शाळा बंद झाल्यानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींना आजतागायत एकटं सोडलं नाहीये

“मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तोही माझ्यासाठी जीव देऊ शकतो” प्रियांका गांधींचं काही दिवसांपूर्वीची या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. राहुल गांधींना विरोधकांनी घेरलं असताना प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींच्या बाजूने खंबीरपणे उभा राहत हे वक्तव्य केलं होतं. आता देखील  संसदेतील राहुल गांधींच्या अपात्रतेच्या कारवाईनंतर आता राहुल गांधी बॅकफूटला जातील असं वाटत असतानाच प्रियांका गांधी पुन्हा राहुल गांधींच्या सपोर्टला आल्या आहेत.

राहुल गांधींचा संसदेत अनेक वेळा झालेला अपमान, राजीव गांधींच्या हत्येनंतर राहुल गांधी खंबीरपणे उभे राहिले असे अनेक दाखले देत प्रियांका गांधींनी राहुल गांधींची बाजू पुन्हा लावून धरली आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाडच्या जागेवरून प्रियांका गांधीच लढतील असंच सांगितलं आहे.

पण प्रियांका गांधींची ही पहिलीच वेळ नाहीये ज्या त्या राहुल गांधींच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. राजकीय विश्लेषक सांगतात गांधी घराण्याने जे दुःखद प्रसंग पहिले आहेत त्या प्रसंगात एकमेकांसोबत राहिलेल्या या बहीणभावांचा नातं आज वेगळ्या उंचीवर गेलं आहे.

काका संजय गांधींचा दुर्दैवी अपघात, आज्जी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या हे बहीण भावंडानी अगदी लहान वयातच सहन केलं आहे. 

या सर्व घटनांमुळेच त्यांचं बालपण बाकीच्या लहान मुलांपेक्षा खूप वेगळं गेलं.

यावरच बोलताना एका ठिकाणी प्रियांका गांधी सांगतात.आज्जी इंदिरा गांधी यांच्या झालेल्या हत्येमुळे त्यांना मोठा आघात सहन करावा लागला होता. इंदिरा गांधी त्यावेळेस त्यांच्याबरोबरच राहत होत्या. प्रियांका गांधी सांगतात त्यावेळी त्या अवघ्या बारा वर्षांच्या होत्या.

या घटनेनंतर सुरक्षतेच्या कारणास्तव अवघ्या १२व्या वर्षी त्यांची आणि राहुल गांधी यांची शाळा बंद करून घरातचं त्यांची शिकवणी सुरु झाली. 

त्यामुळं इतर मुलांबरोबर जाणं, त्यांच्याबरोबर खेळणं, बागडणं या गोष्टी या दोन भावंडांना करताच नाही आल्या. मग शिकणं असू दे, परीक्षा देणं असू दे की खेळणं. ही दोन भावंडं नेहमी एकत्र असायची.

प्रियांका गांधी सांगतात या काळात ही दोन भावंडंच एकमेकांचे मित्र होते. या दोघांत अनेकदा त्यांच्यामध्ये वादही होत आणि पण तरीही ही भावंडं पुन्हा एकत्र. प्रियांका गांधी सांगतात त्या १८ वर्ष्यांच्या होईपर्यंत त्यांचं शिक्षण घरातूनच झालं. या काळात या दोघांमध्ये जे नातेसंबंध घट्ट झाले ते अजूनही टिकून आहेत. वडील राजीव गांधींच्या हत्येचा धक्काही या बहीण भावंडांनी एकमेकांची साथ देत असाच पचवला.

अनेकदा राहुल गांधी हे वयाने मोठे असताना देखील प्रियांका गांधी त्यांच्या मदतीला धावून येतात असं चित्र असतं.

त्यामुळं आता काँग्रेस ज्या परिस्तिथीत आहे त्या परिस्तिथीतून बाहेर काढण्याचं शिवधनुष्य ही जोडगोळी सांभाळणार का हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. मात्र सध्यातरी प्रियांका गांधी यांनी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये घेतलेल्या एंट्रीला जोरदार पाठिंबा मिळत आहे असंच दिसतंय. बाकी हे बहीण भाऊ जेव्हाही मीडियाच्या पुढे येतात तेव्हा हवा झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र तितकंच खरं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.