दौरा रद्द झाला पण एक खरंय, युपीच्या पाठोपाठ प्रियांका गांधीचं रडार आता महाराष्ट्राकडे वळलंय..
देशभरात कोणती गोष्ट सर्वधिक चर्चिली जाते ?
उत्तर सोप्पंय….. काँग्रेस. या काँग्रेसच्या विषयावर भाजपपासून खुद्द काँग्रेसी नेते बऱ्याच चर्चा करत असतात. या चर्चा असतात काँग्रेसच्या पडझडीच्या. पण बोल भिडू तुम्हाला नव्या चर्चा सांगेल, ज्या खऱ्या तर घडल्या पाहिजेत.
हि चर्चा आहे काँग्रेस महाराष्ट्रात प्रियांका गांधींच्या रुपात सक्रिय होतंय का ?
तर उत्तरप्रदेश मध्ये प्रियांका गांधी सक्रिय झाल्याच आहेत हे सगळ्या देशवासियांना दिसतंच आहे. तस बघायला गेलं तर उत्तर प्रदेश सर्वाधिक खासदार निवडून देणारा प्रदेश. इथं पक्षाची कोणतीही संघटनात्मक बांधणी नसताना प्रियांका तिथल्या भूमीवरून ‘महिला हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशी प्रकारची मोर्चे बांधणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत आहेत. महिलाशक्तीला महत्त्व देत ती केंद्रस्थानी आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
मग चर्चा महाराष्ट्राची कशी ?
तर आधी महाराष्ट्र सगळ्या राजकीय पक्षांना हवाहवासा का वाटतो ते पाहू आणि मग प्रियांका गांधी सक्रिय कशा होत आहेत ते पाहू.
तर उत्तर प्रदेशाखालोखाल ४८ खासदार निवडून देणार राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा संबंध भारताला समजलेली गोष्ट म्हणजे राजकारणात नवी समीकरण उदयाला येऊ शकतात. आणि महाराष्ट्र अशा राजकीय समीकरणच विद्यापीठ म्हंटल तर वावगं ठरु नये.
२०१९ ला भाजपचा अवखळ वारु रोखण्यासाठीच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू होत्या तेेव्हा काँग्रेस फारशी उत्सुक नव्हती. पण सत्तेचे लाभ पदरी पाडून घेण्यासाठी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून सरसावले, तेव्हा राहुल गांधींनी नाइलाजाने या सरकारला होकार दर्शविला.
आघाडी सरकार तयार होत असताना काँग्रेसच्या पदरी पडलेले सर्वोच्च पद कोणते होते, तर विधानसभेचे अध्यक्षपद. ते काही महिने सांभाळून राजीनामा देत नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर वेगवेगळी कारण पुढ करत आघाडी सरकारने ही निवडणूक टाळली आहे. विधानसभेतली मतांची टक्केवारी बघितली तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने १६ टक्क्यांच्या आसपास मते मिळवली, तर काँग्रेसने १५ टक्के. नेत्यांनी गंभीरपणे न घेतलेल्या या निवडणुकीतही काँग्रेसने ही कामगिरी केली होती.
या कामगिरीची जाणीव देत पक्षात प्राण फुंकण्यासाठीच नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असावा. काँग्रेसला खिजगणतीत न धरण्याचा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी, शिवसेनेचा डाव जिव्हारी लागल्यानेच पक्षात जरा हालचाली सुरू झालेल्या दिसतात. प्रशांत किशोर हे मोदींना पर्याय देण्यासाठी सरसावलेले व्यूहरचनाकार काँग्रेस चालवण्याचे कंत्राटही मिळवू बघत होते. अहमद पटेलांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर डोळा ठेवत त्यांनी तशा हालचाली सुरू केल्या असे म्हणतात. असली उठाठेव अमान्य झाल्यानच ते राहुल गांधींना पुढे आणायचं सोडून राष्ट्रीय पर्याय उभा करायला सरसावले आहेत.
मुळात गांधी बहीण-भाऊ दोघे करू शकतील, असा कुणाला विश्वास नाही.
त्यात आणि ज्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नव्हत त्यांनाच म्हणजे काँग्रेसलाच जर महाराष्ट्रात लक्ष्य करण्याची चळवळ सुरू होत असेल, तर त्यावर आक्षेप घेतले जाणे उचित होते.
त्यामुळेच मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा ओसरल्याची भाकिते करत किंवा तो ओसरेल अशी खात्रीवजा अपेक्षा बाळगत सर्वच राजकीय पक्षांनी आखणी सुरू केली आहे.
महाराष्ट्राने दाखवलेल्या महाविकासाच्या आघाडीगंगेत हात धुऊन घेण्यासाठी केवळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या. मग यात काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व मागे कस राहील.
त्यामुळेच प्रियांका गांधी यांचा गडचिरोलीसारख्या अविकसित नक्षलग्रस्त भागात आगामी आठवड्यात होणार दौरा राजकीय दृष्ट्या खूप काही सांगून जातो.
तो दौरा आता रद्द झाला असला तरी उत्तरप्रदेश नंतर प्रियांका गांधींसाठी महाराष्ट्र महत्वाचा असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. गडचिरोलीत १४ हजार मुलींना सायकली वाटल्या जाणार होत्या. सायकल हे केवळ वाहन नाही तर निवडून येण्याचे साधन आहे हे नितीशकुमार म्हणतात. त्या उक्तीप्रमाणे प्रियांकां गांधी पुढच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करीत असाव्यात असं न वाटण म्हणजे राजकारण न समजण्यासारखीच गोष्ट आहे.