बारमाही अफवांचं पिक.

एक दिवस एक शेतकरी शेतात गेला. त्याच्या शेतात मेथीच पीक होतं. तो मेथीच्याजवळ गेला तर तिथं सापाच जुळ खेळत बसलेलं. त्याला राग आला. “ही ब्याद कुठंन आली” म्हणत तो काठी शोधायला पळाला. काठी घेऊन आला. दोन्ही साप मारले.

दुसऱ्या दिवशी एक आक्रीत घडलं. तो नेहमीप्रमाणे रानात गेला. मेथी उपटू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं. प्रत्येक पानावर पांढरी नक्षी तयार झालीय. त्यानं लक्ष देऊन बघितलं आणि तो हादरला. पानावरची नक्षी सापासारखी होती. सगळ्या रानातील मेथीच्या पानावर साप अवतरले होते. त्यानं घाबरून घराच्या दिशेनं धाव घेतली. बायकोला सांगून सरपंचाच्या घरी गेला. तिथली गोष्ट स्वयंपाक करणाऱ्या सरपंच बाईंनीही ऐकली, सहज भाजीसाठी आणलेल्या मेथीकड बघितलं.
“अहो, खरं हाय. हे बघा याबी मेथीवर साप उठल्याती..”

बघता बघता ही बातमी सगळीकडं गेली. सगळ्याच मेथीवर साप उठलेले. विशेष म्हणजे त्यावर्षी मेथीच पीक उदंड होतं. पण साप उठल्यामुळं “भाजीत भाजी मेथीची बायको माझ्या प्रीतीची” अस उखण्यात स्थान मिळालेल्या मेथीचा बाजार उठला. कुत्रंही विचारत नव्हतं मेथीला. कोणी हातही लावत नव्हतं. मग काही जणांनी गुरांना मेथी खाऊ घातली (त्याना तेवढंच जीवनसत्व मिळालं.) पण गुरांचाही खायचा शेर संपला. कोणीतरी बातमी आणली “अमक्या गावात मेथी खाऊन जरशी गाय मेली” मग मात्र मेथी रस्त्यावर दिसायला लागली. पुन्हा एक बातमी आली, मेथी काढायला नवरा बायको रानात गेली तर त्या दोघांनाही साप चावला आणि मेली. मग मेथीच्या रानाकडही कोणी फिरकना. मेथी उन्हात वाळय लागली.

आजही तुम्ही मेथी आणायला गेलात तर तिच्या पानावर सापासरखी नक्षी दिसते पण आज कोणी लक्ष देत नाही. कारण ही नक्षी मेथीच्या जन्मापासून असते म्हणे! ती सनातन आहे. पण त्या चार दिवसात मात्र याच नक्षीने अनेक दंतकथा जन्माला घातल्या आणि मेथी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले.

आता तो शेतकरी कोण? ते गाव कोणतं?तो सरपंच कोणता? मेथी खाऊन कोणत्या शेतकऱ्यांची गाय मेली, त्याच नाव? सर्पदंश होऊन मेलेलं जोडपं कोण्या गावच? हे विचारायचं नसत. तो काळ माणसाच्या मनावर अफवा स्वार झाल्याचा असतो. त्यामुळं बातमीदारीत शिकवलेले सहा क कार तिथं विचारायचं नसतात, अफवेवर स्वार व्हायचं असत. असे एप्रिल फ़ुल बारा महिने अठरा काळ होत असतात..

– संपत मोरे 9422742925

Leave A Reply

Your email address will not be published.