महाराष्ट्रातल्या या राजाने मलेरियाविरोधात सुरु केलेल्या मोहीमेचं जगात कौतुक झाल.

मलेरियाचे जंतू शोधण्यासाठी ॲनेफेलीस डास पकडण्यात आले. मलेरिया विरोधात लढाई लढण्यासाठी जून्या विश्रामगृहात प्रयोगशाळा बनवण्यात आली. पकडलेल्या डासांचे विच्छेदन करुन त्यांच्या तोंडातील ग्रॅंथीमध्ये असणाऱ्या  मलेरियाचे जंतू शोधण्यात आले.

यामुळे झालं काय तर मलेरियाच्या तापाचं निदान होवून त्याविरोधात व्यापक लढा उभारण्यात आला. यासाठी मलेरिया विरोधात एक खात निर्माण करण्यात आलं. ॲक्शन प्लॅन ठरवण्यात आला. या मोहिमेच जागतिक स्तरावर कौतुक झालं व ही लढाई पहाण्यासाठी अमेरिकेहून फोर्ड फाऊंडेशनचे लोक इथे आले.

हे सर्व झालं आपल्या महाराष्ट्रातल्या सावंतवाडीत, आणि त्या राजाचं नाव होतं,

पुण्यश्लोक बापूमहाराज. 

श्रीमंत बापूसाहेब महाराजांना संस्थानचे सर्वाधिकार होते तरिही त्यांनी नगरपरिषद स्थापन करुन सर्व अधिक लोकल बोर्डाकडे दिले. शहराचा विकास करण्याचा अधिकार लोकांना दिला. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बीजे रोवणारे महाराज म्हणून सावंतवाडीच्या बापूसाहेब महाराजांचा उल्लेख करण्यात येतो.

बापूसाहेब महाराजांच्या काळात म्हणजे १९३० साली महात्मा गांधी प्रकृतीस्वास्थासाठी आंबोलीला येवून राहिले होते. महात्मा गांधीनी संस्थानचा उल्लेख रामराज्य म्हणून केला होता. 

१९१९ साली बापूसाहेब महायुद्धातून सावंतवाडीत परतले. यानंतरच्या काळात मलेरियाचा या भागात कहर चालू होता. तापा विरोधात व्यापक लढाई उभा करणं गरजेचं आहे हे त्यांना समजून आलं होतं. त्यासाठी रोगनिदान करणं आणि त्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय राबवणं या दोन गोष्टींवर बापूसाहेबांनी भर दिला. त्यासाठी परदेशातून किटकतज्ञ डॉ. स्ट्रीकलंड यांना सावंतवाडीत बोलवण्यात आले.

बुर्डी पुलाजवळ असणाऱ्या विश्रामगृहावर प्रयोगशाळा तयार करुन संशोधन सुरू करण्यात आले. यासाठी डास पकडण्यात आले. त्यांचे विच्छेदन करुन त्यांच्या तोंडातील ग्रॅंथीमध्ये असणारे मलेरियाचे जंतू शोधण्यात आले.

संशोधनानंतर ॲनाफिलीस क्युलिसेफीसीस डासांमध्ये मलेरियाचे जंतू सापडले. त्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्याची साखळी मिळाली.

रोगाची कारणे समजल्यानंतर आत्ता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी मलेरिया निर्मुलनासारखे खाते निर्माण करण्यात आले. डॉ. हळदणकर यांच्याकडे याचे प्रमुखपद सोपवण्यात आले होते. संस्थानामध्ये ज्या ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशा सर्व पाणी साठणाऱ्या जागा नष्ट करण्यात आल्या. पाण्यावर असणारी डासांची अंडी मारण्यासाठी तेलाचा वापर करण्यात आला. प्लासमोचीन गोळ्या देण्याची मोहीम आखण्यात आली.

बापूसाहेबांच्या या मोहिमेच कौतुक जगभरातून करण्यात आलं, त्यासाठी फोर्ड फाऊंडेशनचे डॉ. स्वीट आणि डॉ. कॉव्हेल हे मलेरियाविरोधातली सावंतवाडी संस्थानची मोहीम पाहण्यासाठी जातीने हजर राहिले. त्यांनी या मोहीमेला शक्य तितकी मदत उभारली. 

यामुळेच ओस पडलेली गावे पुन्हा उभा राहू लागली. पुढे DDT चा वापर समजल्यानंतर तत्कालीन राणीसाहेबांनी याचा वापर करुन सावंतवाडीतून मलेरिया जवळजवळ संपुष्टात आणला.

संदर्भ : शिवप्रसाद देसाई (सिंधदुर्ग सकाळ) 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.