जेफ थॉमसनच्या टेरर बॉलिंगने खेळाडू जखमी केले आणि त्याला घाबरून चॅपलने बॅटिंग सोडली होती..
क्रिकेट हा कितीही नाकारला तरी बॅट्समनचा म्हणून ओळखला जातो पण काही काही बॉलर असे होते त्यांनी आपल्या बॉलिंगने बॅट्समनची झोप उडवली होती. ज्या संघात वेगवान गोलंदाजांचा भरणा असे तो संघ सगळ्यात जास्त मजबूत मानला जात असे. ७०-८०च्या दशकात फास्टर बॉलर लोकांचा सुवर्णकाळ होता. आजचा किस्सा सुद्धा अशाच एका फास्ट बॉलरचा ज्याने जगातल्या चांगल्या चांगल्या बॅट्समनला पळता भुई थोडी केली होती.
जेफ थॉमसन हा ऑस्ट्रेलिया संघातला महत्वाचा बॉलर होता. थॉमसन जगातला सगळ्यात वेगवान बॉलर होता.
डेनिस लिली, शोएब अख्तर, शॉन टेट, ब्रेट ली, मलिंगा या मंडळींपेक्षाही जेफ थॉमसनचा वेग अफाट होता. सर व्हीव्हीएन रिचर्ड जेफ थॉमसनबद्दल सांगतात कि मी आजवर अनेक गोलंदाजांचा सामना केला पण सगळ्यात जबरदस्त बॉलर होता जेफ थॉमसन.
त्या काळी डेनिस लिली आणि जेफ थॉमसन या जोडीने क्रिकेटमध्ये राडा करायला सुरवात केली होती. क्रिकेटमध्ये येण्याअगोदर थॉमसन फ़ुटबॉल खेळायचा. तो आधीपासूनच जरा रंगीत होता. एका मॅचमध्ये रेफ्रीचा निर्णय पटला नाही म्हणून रेफ्रीलाच एक ठोसा लगावला होता. क्रिकेट संघात निवड झाली तरी त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. दुखापतीमुळे तो सतत संघाच्या आतबाहेर असायचा.
मग आली ऍशेज सिरीज, या सिरीजमध्ये जगाने थॉमसनच्या भेदक बॉलिंगच स्वरूप बघितलं. या पूर्ण सिरीजमध्ये थॉमसन इंग्लडच्या बॅट्समनवर तुटून पडला होता. या सिरीजमध्ये थॉमसनने ३५ विकेट मिळवून चार वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला ऍशेज सिरीज जिंकवून दिली. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज या सामन्यांमध्ये प्रेक्षक खास व्हीव्हीएन रिचर्ड आणि थॉमसनची जुगलबंदी पाहायला येत असे.
त्या वेळच्या क्रिकेट समीक्षकांच्या मते थॉमसनच्या बाउंसला इतकी उंची असायची कि बॅट्समन, किपरच्या डोक्यावरून बॉल चौकार जात असे. थॉमसनची बॉलिंग हि खेळायला सगळ्यात अवघड होती. त्याच्या बॉलिंगमुळे अनेक खेळाडू जखमी व्हायचे. थॉमसनची ट्रिक होती कि जर विकेट मिळत नसेल तर थेट बॅट्समनवर बाउन्सरचा अटॅक करायचा.
सुनील गावस्करसुद्धा जेफी थॉम्सनला सगळ्यात वेगवान बॉलर मानायचे. १९७५ च्या वर्ल्डकप दरम्यान श्रीलंकेच्या विरुद्ध बॉलिंग करताना थॉमसनने दुलीप मेंडिसला शरीरावर बॉल फेकून हैराण केलं होतं. त्यातला एक बॉल मेंडिसला इतका जोरात लागला कि तो मैदानावरच कोसळला. त्याला विश्रांती देण्यात आली पुढच्याच बॉलवर त्याने सुनील वट्टीमुनीला सुद्धा जखमी केलं आणि तो सुद्धा रिटायर्ड हर्ट झाला.
मॅच संपल्यावर पोलिसांनी मेंडिसला थॉमसनने इतके बॉल मारून तुला जखमी केलंय तर जेफ विरुद्ध तक्रार करणार का असं विचारलं होतं तेव्हा मेंडिसने तिथे जेफ थॉम्सनच्या बॉलिंग कौशल्याचं कौतुक केलं होतं. जेफ थॉम्सनची बॉलिंग टेरर बॉलिंग मानली जायची. त्याकाळात मायकेल होल्डिंग आणि जेफ थॉमसन या दोन बॉलर लोकांनी क्रिकेटमध्ये बॉलिंग डिपार्टमेंटचा दबदबा निर्माण केला होता.
एका सराव मॅचमध्ये तर जेफ थॉम्सनच्या बॉलिंगला घाबरून ग्रेग चॅपलने बॅटिंग करण्यास नकार दिला होता. सर्व करतानासुद्धा थॉम्सनच्या बॉलिंगचा वेग कमी होत नसे. जवळपास १६० पेक्षाही जास्त स्पीडने तो बॉलिंग करत असे.
पाकिस्तानविरुद्धच्या एका मॅचमध्ये कॅच घेताना ऍलन कर्नलसोबत त्याची जबरदस्त धडक झाली यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. याचा परिणाम त्याच्या बॉलिंगवर झाला. १९८५ साली क्रिकेटच्या थॉम्पोने निवृत्ती स्वीकारली. टेस्टमध्ये २०० विकेट आणि वनडेमध्ये ५५ विकेट जेफने मिळवल्या होत्या.
थॉम्सनची बॉलिंग स्टाईल एक आयकॉनिक स्टाईल बनली होती आणि जगातला तेव्हाचा तो एकमेव फास्ट बॉलर होता.
हे हि वाच भिडू :
- दाढदुखीच निमित्त झालं अन् सुनिल गावस्कर असा विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
- सासुरवाडीवरून ओरडा पडल्यावर सुनील गावस्करांनी मॅल्कम मार्शलची धुलाई केली होती…
- इरफान पठाणच्या करियरची वाट लागण्यामागे ग्रेग चॅपलचा हात नव्हता तर…
- भारतीय टीमवर दादागिरी करणाऱ्या ग्रेग चॅपलला सेहवागने आपल्या भाषेत उत्तर दिलं होतं.