आगरी आणि कोळी समाजाकडे इतकं सोनं असण्यामागे हे कारण आहे…

कोकण किनारपट्टीवर राज्य करणारा आगरी आणि कोळी समाज. या दोन्ही समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी करणे आहे. प्रचंड कष्ट करून जगणारी स्वभावाने भोळी असणारी हि माणसं मात्र त्यांच्या स्त्रिया अंगभर सोने परिधान केलेल्या दिसतात. अगदी मासे विकायला आलेल्या कोळिणी अंगभर सोन्याने मढलेल्या आढळतात. गळ्यात साखळी कोणाची ही पोरगी कोणाची या प्रश्नाचं हमखास उत्तर कोळी आणि आगरी असं येत असत.

अनेकदा या सोन्यावरून या दोन्ही समाजावर टीका देखील केली जाते , काही वेळा त्यांच्यावर विनोद देखील होतो. कित्येकदा  अप्रूप आणि असूया देखील या मागे असते. या मागे समज गैरसमजच कारणीभूत असतात.

पण मुख्य प्रश्न उरतो की आगरी कोळी समाजाकडे इतकं सोनं कुठून येतं ?

मुंबई ठाणे रायगड हे तीन जिल्हे आगरी आणि कोळी समाजाचे आश्रयदाते. खरं पाहायला गेलं तर हे दोन्ही समाज वेगवेगळे असले तरी मत्स्यपालन आणि भातशेती हे दोघांचेही समान व्यवसाय. बऱ्याच चालीरीती आणि परंपरा देखील समसमान असलेल्या आढळतात.

मात्र सोन्यापेक्षाही या समाजांमध्ये आढळणारी महत्वाची गोष्ट म्हणजे मातृसत्ताक संस्कृती.

इथल्या लोकांचं जीवन समुद्रावर चालते. समुद्रातून पकडलेले मासे म्हणजे त्यांचे आयुष्य समुद्र म्हणजे त्यांची शेती. पकडलेले मासे भाऊच्या धक्क्यावर किंवा खुलदाबाद येथे विकायचे आणि त्यातून आपला रोजगार निर्माण करायचा. हा त्यांचा दिनक्रम.

कोळी आगरी समाजातील पुरुष मासे पकडण्यासाठी खोल दर्यात जातात. ते कित्येकदा पंधरा-पंधरा दिवस समुद्रात असतात. त्यामुळे पूर्वापार घराची मुख्य जबाबदारी ही महिलाच सांभाळत आल्या. पुरुषाने पकडलेले मासे साफ करणे आणि बाजारात विकणे हा मुख्यतः कोळी महिलांचा व्यवसाय.

मासे विकण्यापासून ते घर चालवण्यापर्यंत मुख्य कारभार हातात असल्यामुळे घरच्या प्रत्येक बाबतीत त्यांच्या शब्दाला वजन असते. पूर्वीच्या काळी देखील प्रचंड श्रीमंती नसली तरी सोन्यासारख्या माशांमुळे घरात दोन वेळचे जेवण हमखास मिळेल याची खात्री असायची. सगळ्यात महत्वाचं ,म्हणजे घराचा मुख्य आर्थिक व्यवहार कर्त्या स्त्रीच्या हातात असायचा.

आजही या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात मुख्य मान महिलांना असतोच. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नाचा सर्व कारभार महिलेच्या हाती दिला जातो. लग्न मुलाचं असो अथवा मुलीचं त्यांना तयार करण्याची जबाबदारी पुरोहितांऐवजी महिलावरच असते. लग्नात हुंडा वगैरे प्रकार नसतो. मात्र हे लोक पूर्वीपासून उत्सव प्रिय. आपले सगळे सण समारंभ उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात.

नारळी पौर्णिमेच्या संध्याकाळी समुद्राला कृतज्ञता म्हणून सोन्याचा नारळ अर्पण करण्याची परंपरा होतीच मात्र कोळ्यांची दिवाळी प्रमाणे महत्व असणाऱ्या या सणादिवशी आपल्या पारंपरिक पोषाखाबरोबर पारंपरिक सोन्याचे दागिने देखील मिरवले जाते.

साखरपुडा, हळदी, लग्न यात सगळी हौसमौज केली जाते. कोळीगीते आणि त्यांचा उत्साही नाच हे तर अख्ख्या देशभरात प्रसिद्ध आहे. यात नटणे मुरडणे हा कौतुकाचा भाग. सोने हा तर जगभरातल्या  महिलांचा वीक पॉईंट्च. यात आगरी कोळी महिला पण आल्या.

पूर्वीच्या काळी मच्छिमार कुटुंबातील  पुरुष मंडळी समुद्रावर आणि महिला मासे विकायला जायच्या त्यामुळे घरात कोणी असायचं नाही. तेव्हा बँकाच प्रस्थ ग्रामीण भागात नसल्यामुळे मच्छिमार महिला आपलं सोनं अंगावरच परिधान करून मासे विकायला जायच्या. यातूनच सोन्याचं महत्व या समाजामध्ये वाढत गेलं.

अशातच साधारण साठच्या दशकापासून या भागातील जमिनींना सोन्याचे भाव येत गेले. गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या मुंबईच्या बाहेर लोकांना राहण्याची जागा शोधत बिल्डर लोक आगरी कोळी लोकांच्या वस्त्यांवर येऊन पोहचले. भोळ्या मच्छिमार समाजाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कित्येकांच्या जागा फुटकळ किंमतीमध्ये घशात घातल्या गेल्या.

मच्छिमार समाजातील राजकीय नेतृत्वाचा अभाव,  सामाजिक मागासलेपण याच वापर करून घेऊन बिल्डर व व्यावसायिकांनी अक्षरशः लूटमार केली. अचानक आलेला पैसा गुंतवायचा कुठे या प्रश्नातून देखील सोने घेणे वाढत गेले. सावकारी व बिल्डर लोकांची लॉबी, घरात पैसे राहिले तर तरुण मुलांची  व्यसनाधीनतेकडे पावले वळतील म्हणून कारभार हातात असलेल्या महिलांनी आलेले पैसे सोन्यात गुंतवण्याचा निर्णय घेतला.

पुढे सिडकोने नवी मुंबई वसवली तस या भागातील चित्रच बदलत गेलं. जमिनीचे दर गगनाला जाऊन भिडेल. दारिद्र्य जाऊन सुबत्ता आली.

पुढे पुढे आर्थिक भान आले तसे आगरी कोळी समाज आपल्या घामाचे पैसे वाजवून घेण्यास समर्थ झाला. गरज म्हणून सोन्यात गुंतवलेले पैसे आता आवडीत बदलले गेले. फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांमध्ये देखील सोन्याची आवड उतरली. पारंपरिक डोक्यावरची टोपी कंबरेचा रुमाल गेला , शर्ट पँट आले तसे हातात अंगठ्या, गळ्यात जाडजूड चेन हे आगरी कोळी समाजाच्या पुरुषांमध्ये दिसू लागले.

आजही हा समाज आपल्या मेहनती साठी आणि उद्यमशीलतेसाठी ओळखला जातो. त्यांनी आपल्या शेतीपासून ते  मच्छिमारीच्या व्यवसायात आधुनिकता आणलेली आहे.

कित्येकांनी कष्टाच्या जोरावर आपलं नाव कमावलं आणि पैसे कमावले. मात्र हे मिळालेले पैसे चेंगटपणा न करता ते व्यवस्थित उपभोगण्याचा शौकीनपणा आगरी कोळी समाजाकडे निश्चितच आहे. म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे असणारी कॅडलीक कार अलिबाग तालुक्यात फिरताना दिसते, एखादा उद्योजक थेट हेलिकॉप्टर विकत घेताना दिसतो.

त्यामुळे गळ्यात साखळी कोणाची ही पोरगी कोणाची हे गाणं उपहासाने नाही तर अभिमानाने सांगायची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रातील हे कष्टकरी मच्छिमार बांधव आजही स्त्रीशक्तीचा सन्मान करतात आणि याच समाजातील स्त्रिया आपल्या कष्टाने कमावलेल्या सोन्याची हौस करतात यात वावगे ते काय हा सार्थ प्रश्न विचारला जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.