आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं…सोने घेण्यापेक्षा पैसा गुंतवा आणि व्याज कमवा.

गोपाळ गणेश आगरकर हे म्हणजे भारतातील महान समाजसुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ञ आणि विचारवंत होते. ब्रिटीश राजवट असतांना भारतीय समाजात पसरलेली जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले होते. त्या काळात विधवा पुनर्विवाहाचा विचार मांडणाऱ्या समाजसुधारकांच्या पैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे गोपाळ गणेश आगरकर….समाजाच्या सुधारणेसाठी जे निर्णय योग्य असत त्यासाठी ते कट्टरपणे लढत असत.

आगरकर यांनी लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी, व्ही.एस. आपटे, व्ही.बी. केळकर, एम.एस.गोळे आणि एन.के.धारप यांच्यासमवेत न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली.

यात सर्वात त्यांची लेखणी गाजली म्हणायला हरकत नाही….ते केसरी या साप्ताहिकाचे संपादक आणि ‘सुधाकर’ मासिकाचे देखील संस्थापक होते. त्यांच्या परखड लेखणीतून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला होता.

त्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे मराठी साप्ताहिक केसरीचे पहिले संपादक होते, जे त्यांनी 1880-1881 या काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. मात्र त्यानंतर आगरकर आणि टिळक यांच्यात काही सामाजिक मुद्द्यावरून मतभेद झाले होते आणि यातूनच त्यांनी केसरी सोडली.आणि मग त्यांनी ‘सुधाकर’ नावाचे नवीन साप्ताहिक सुरू केले, ज्यामध्ये त्यांनी बालविवाह, जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात मोहीम चालवली आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि दिखाऊपणा विरोधात आवाज उठवला, आगरकरांनी विधवा पुनर्विवाहाला उघडपणे पाठिंबा दिला.

आगरकर यांच्या मते, मुलांचे लग्न वयाच्या 20 ते 22 व्या वर्षी तर मुलींचे लग्न 15-16 वर्षांच्या वयात झाले पाहिजे.  याशिवाय 14 वर्षांपर्यंतच्या सक्तीच्या शिक्षणाचेही त्यांनी जोरदार समर्थन केले. हो हे परखड विचार त्यांनी त्या काळात मांडले…त्यांनी  ‘विकार विलासित’, ‘डोंगरी जेलचे १०१ दिवस’ ही पुस्तकेही लिहिली.

असो याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या एकूण लिखाणातील  त्यांचा ‘अलंकार मीमांसा’ हा लेख अतिशय वेगळ्या धाटणीचा आणि दूरदृष्टीचा ठरतो..

‘अलंकार मीमांसा’ आणि ‘दागिन्यांचा सोस’ हे दोन लेख लिहिले. अलंकार हा श्रीमंती दाखवण्याचा मार्ग नाही. त्यापेक्षा चांगले घर बांधा, चांगली वस्त्रे वापरा असे त्यांनी या लेखात म्हणले आहे. अलंकारातील अनेक दोष दाखवत असतांनाच त्यांनी असंही त्यात लिहिलंय कि, खोटे अलंकार वापरा आणि सोने विकत घेण्यासाठी तोच पैसा बँकेत ठेवा म्हणजे त्यावर व्याज मिळेल, असा उपदेश त्यांनी दिला.

बघा…कित्येक दशकांपूर्वीच त्यांनी गुंतवणुकीचं गणित सांगितलं..पैसा कसा वापरावा आणि कसा वाढवावा याचा सखोल आणि नेमकं सूत्रच त्यांनी या ‘अलंकार मीमांसा’ आणि ‘दागिन्यांचा सोस’ या लेखांत सांगितलं आहे. 

याशिवाय त्यांनी स्त्रियांच्या पोशाखावर देखील लेखन केलंय.  ‘आमच्या स्त्रियांचा पेहराव’ नावाचे त्यांनी दोन लेख लिहिलेत. स्त्रियांच्या पोषाखाच्या बाबतीत उपयुक्तता आणि दर्शनियता हे दोन गुण त्यांनी सांगितले. त्याकाळी साडी-चोळी हा स्त्रियांचा पोशाख होता. पदर सावरण्यात त्यांना त्रास होत असे, त्यातच त्यांचा अर्धा वेळ जातो म्हणून ‘स्त्रियांनी जाकीट घातले पाहिजे’ असा लेख त्यांनी लिहिला.

स्त्रियांनी पायात बूट वापरावेत, थंडीत हातमोजे- पायमोजे, उन्हाळा व पावसाच्या छत्री वापरावी असे त्यांनी या लेखामध्ये लिहिलेय..

असा होता हा नेता काळाच्या कित्येक दशके पुढे चालणारा आणि विचार करणारा.

Leave A Reply

Your email address will not be published.