पुण्यात आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली होती, ही गोष्ट खोटी आहे..?
शालेय पाठ्यपुस्तकांपासून गो.ग.आगरकरांच्याबद्दल आपण वाचत आलो. आगरकर आणि टिळकांचा वाद. आधी समाजसुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य.
पुण्यातील सनातनी लोकांनी त्यांना केलेला विरोध व त्यातूनच आगरकरांना त्यांच्या हयातीत पहावी लागलेली स्वत:ची प्रेतयात्रा अशी गोष्ट आपण अनेकदा वाचत आलो.
लेखक य.दि. फडके यांनी आगरकरांच्या चरित्रासाठी आगरकरांबद्दल बरीच माहिती जमवली. १९६६ ते ७८ सालात विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी आगरकर-टिळक-गोखले-रानडे यांच्याबद्दल लेखन केले. त्यातील निवडक लेखांचे पुस्तक पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशन संस्थेने १९७९ साली काढले.
याच पुस्तकांत आगरकारांच्या जिवंतपणी काढलेल्या तथाकथीत प्रेतयात्रेबद्दल सविस्तरणे लिहण्यात आलेलं आहे.
ते लिहतात,
प्रत्येक मोठ्या माणसाबाबत आख्यायिका तयार होत असतात व कालांतराने आख्यायिक हीच वस्तुस्थिती समजून त्या त्या मोठ्या माणसाबद्दल लिहले व बोलले जाते. समाजसुधारक गोपालराव आगरकरांना जिवंतपणी स्वत:ची प्रेतयात्रा पहावी लागली ही गोष्ट माझ्याप्रमाणेच असंख्य लोकांनीही ऐकली असणार आणि त्यात वस्तुस्थितीपेक्षा कल्पनेचाविलास असण्याची शक्यता आहे असा विचारही अनेकांच्या मनात आला नसेल.
माझ्या मनातही अशी शंका आली नव्हती. मात्र आगरकरांच्या चरित्रलेखनासाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी मी जेव्हा गेल्या शतकातील वर्तमानपत्रांचे अंक वाचू लागलो तेव्हा ही आख्यायिका कशी झाली असावी व याबाबतची वस्तुस्थिती काय होती हे माझ्या लक्षात आले.
१८९१ साली संमतिवयाच्या बिलावरून परंपरावादी व सुधारक यांच्यामधील वाग्युद्ध निकराला आले होते. सरकारने असल्या गोष्टीत हस्तक्षेप करु नये व कायदा केला जावू नये असे टिळकांचे म्हणणे होते तर समाजसुधारणेसाठी अशा प्रकारचे कायदे करण्यास हरकरत नाही असे आगरकर म्हणत होते.
टिळक तेव्हा नुकतेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा देवून बाहेर पडले होते.
त्यामुळे टिळक व एकेकाळचे त्यांचे सहकारी वामनराव आपटे, आगरकर, गोपालराव गोखले वगैरे यांच्यामधील तेढ विकोपाला गेले होते. अशा तापलेल्या वातावरणात शिमगी पोर्णिमा आली तेव्हा सुधारकांवर चिडलेल्या सनातन्यांनी काय धुडगूस घातला असेल याची पुरेशी कल्पना आज येणे कठिण आहे.
त्या काळी पुणे वैभव नावाचे एक वर्तमान पत्र निघत असे. ते सुधारकांवर कडक टीका करत असे.
१८९१ सालच्या झुळवडीच्या दिवशी काय प्रकार झाला त्यांचे वर्णन पुणे वैभवातच्या अंकात प्रसि्ध झाले होते ते केसरीच्या ३१ मार्च १८९१ च्या अंकात उद्धृत करण्यात आले आहे.
गेल्या बुधवारी धुळवड होती व त्या दिवशी खेळ्या मुलांनी एका प्रेताची मिरवणूक काढली होती. हे प्रेत अर्थाल भूशाचे होते म्हणतात. त्या प्रेताच्या उरावर एक दारूची बाटली बांधली होती. तोंडात चिरूट दिला होता. हातात बिस्कीटे होती. छत्रसचामराच्या ऐवजी फाटकी खेटरे व केरसुण्या होत्या. गुलालाच्या ऐवजी त्याच्या अंगावर काजळ पसरले होते. व शिकेकटारीत मडक्याऐवजी एक बुट बांधला होता. त्याप्रमाणे हे प्रेत प्रत्येक सुधारकाच्या दारापुढे विसावा खात खात फरासखान्याजवळ आले.
तेथे एका सुधारकाने आपली पुण्याई खर्च करुन प्रेतवाहक मुलांस अडविण्याचा प्रयत्न केला पण पोलिस अधिकाऱ्यांनी हा मुलांचा खेळ आहे अशी खात्री करुन घेवून त्यांस जाऊन दिले. नंतर ते प्रेत विसावा घेत घेत औंकारेश्वराच्या वाळवंटावर पोचले. वाटेने मुलांना ‘अरे हे काय? म्हणून विचारल्यास कोणी म्हणत हे अनाथ प्रेत आहे, कोणी म्हणत हे सगळ्यांचे प्रेत आहे, कोणी म्हणे हे सुधारकांचे प्रेत आहे, कोणी म्हणत हे कौन्सिलरचे प्रेत आहे, कोणी म्हणे कायदेबाजचे तर कोणी तर नाव देखील घेत असत.
मुलेच ती. त्यांच्या तोंडी कोण लागतो. वाळवंटात गेल्यावरदेखील हे प्रेत ब्राम्हणांच्या स्मशानभूमीत जाळून देणार नाही अशी तेथील ब्राह्मणांनी तक्रार दाखल केली. अखेर अर्धुमुर्धे जाळलेले प्रेत खेळ्या पोरांस नदीत मिळालेल्या गावच्या नाल्यात महारांकडून ओढून टाकावे लागले.
पुणे वैभवकारांनी केलेल्या या वर्णनात किती तथ्य आहे याबद्दल केसरीने म्हटले आहे,
या उताऱ्यात दिल्याप्रमाणे हकीकत बहुतेक अशी घडली खरी पण त्यात प्रथमत:च खेळ्या मुलांनी हे जे शब्द घातले आहेत ते खोटे आहेत. ही प्रेताची कल्पना प्रथमत: कित्येक मुले झालेल्या पोक्त वयाच्या खेळ्या मुलांच्या डोक्यात उत्पन्न झाल्याचे आम्हास माहिती आहे, व पुणे वैभवकारांसही ते माहित असेलच असे आम्हास खात्रीने वाटते. तसेच प्रेतयात्रेबरोबर काही संभावित म्हणवून घेणारी मंडळी काही कालपर्यन्त होती हेही आम्हांस माहित आहे व त्यापैकी कित्येक नदी तटाकी जावून प्रेताची वाट पहात बसली अशी खरी स्थिती असता शुद्धांत:करणाच्या पुणे वैभवकरांनी त्या कल्पनेची सारी जबाबदारी पोरांच्याच माथी का मारली असावी हे नुकत्याच घडून आलेल्या इतिहास जाणणारास कळण्यास फारशी पंचाईत पडणार नाही.
या प्रेताच्या मिरवणुकीत काही मुले होती हे खरे. न्यू इंग्लिश स्कुलातील शिक्षकांपैकी काहीच्या घरापुढे प्रेतास विसावा देण्यात आला त्या वेळी त्यांनी कित्येक शिक्षकांच्या नावाने तोंडातून भलभलते अभद्र शब्द काढले. तेव्हा अर्थात त्या मुलांना न्यू इंग्लिश स्कुलापैकी जे कोणी असतील त्यांच्यासंबधीने शिक्षा न देण्या न देण्याचा विचार सुपरिटेंडेंट यांस करावा लागला. त्यांची नावे कळाली आणि त्यापैकी कित्येकांनी कबूलही केले. तेव्हा पुढारी होते त्यांनी अशा असभ्य व गैरवर्तनाबद्दल शिक्षा घ्याव्या लागल्या. शिक्षा कदाचित फाजील कडक झाली असे कोणास वाटेल त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही.
वरील उताऱ्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात.
एक म्हणजे केवळ गोपाळराव आगरकारंची प्रेतयात्रा काढली गेली नव्हती तर संमतिवयाच्या बिलास पाठिंबा देणाऱ्या सर्व सुधारकांचे प्रतीक म्हणून प्रेत सजविले गेले होते.
त्यामुळेच ही प्रेतयात्रा सर्व सुधारकांच्या घरासमोर थांबवीत नेण्यात आली. संमतिवयाच्या बिलास पाठिंबा देण्याऱ्या मंडळीत रावबहादुर नुलकर, भिडे, डॉक्टर भांडारकर या ख्यातनाम व्यक्तिंबरोबर वामन शिवराम आपटे, गोपाळराव आगरकर, गोपालराव गोखले हे न्यू इंग्लिश स्कूलातील तरुण शिक्षकही होते.
आगरकर त्या वेळी ओंकारेश्वराच्या जवळच्याच वाड्यात रहात होते हे लक्षात घेतले पाहीजे. त्यामुळे त्यांच्या घरासमोरही प्रेत यात्रा थांबविली गेली असणारचं. खेरजी आगरकर त्या वेळी कायदा हवा म्हणणाऱ्यांच्या बाजू हिरारीने मांडत होते. त्यामुळे आगरकरांच्या घरासमोर प्रेतयात्रा थांबल्याखेरीज विरोधक पुढे गेले नसणेही समजण्यासारखे आहे.
६ एप्रिल १८९१ च्या इंदुप्रकाश च्या अंकात पुण्याचे बातमीपत्र प्रसिद्ध झाले आहे. इंदुप्रकाश हे सुधारणेस अनुकूल असलेले वर्तमानपत्र होते. त्या पत्रानेही पुणे वैभव व केसरी पत्रांनी केलेल्या वर्णनाशी मिळतीजुळती अशीच बातमी दिली आहे.
धुळवडीच्या दिवशी गावातील हिंदूधर्माभिमानी व देशाभिमानी म्हणविणाऱ्या लोकांच्या मुलांनी काही मोठ्या टवाळ लोकांनी आपल्या मनातील सुधारकांच्या विषयीच्या क्रोधाची शांती करण्याकरत सुधारकांचे प्रेत काढळे व ते सर्व ठळक सुधारणावागी गृहस्थांचे घरावरुन स्मशानभूमीत नेले व तिथेही ह्या अपवित्र सुधारकास दहन करणे अपवित्र असे म्हणून ते नाल्यात टाकले व आता सर्व दुनियेतील सुधारक मेले, आपला त्यांचा काही संबध राहिला नाही असे म्हणून आनंदाने शंखध्वनी करीत पोरे घरी गेली.
गोपालराव आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांनी उतारवयात आपल्या आयुष्यातील घटना आठवणीने सांगितल्या होत्या.
त्या १९३८ साली स्त्री मासिकाने प्रसिद्ध केल्या होत्या. यशोदाबाईंच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार घडला तेव्हा आगरकर व त्यांचे कुटूंबिय पुण्यात नव्हते. ते सर्व कराडला कोणाच्यातरी लग्नाला गेले होते. शिमग्याच्या दिवशी प्रेतयात्रा काढण्यात आली होती व हा सर्व प्रकार व उपद्व्याप एका विलायतेला जावून डॉक्टरीन होऊन आलेल्या विदुषींच्या पतिराजांनी केल्याची दाट वंदता होती असेही त्यांना म्हटले आहे.
यशोदाबाईंनी केलेल्या या उल्लेखावरून प्रेतयात्रा काढण्याच्या उद्योगाचे सुत्रधार डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पतिराज गोपाळराव जोशी होते हे उघड आहे. गोपाळराव जोशी यांचे या काळात चांगलेच सुत जमले होते असे तत्कालीन वर्तमानपत्रांवरून दिसते. खेरीज गोपाळराव जोशांचे असलेच अन्य उपदव्याप लक्षात घेतले तर प्रेतयात्रेच्या प्रकाराला चिथावणी देणाऱ्यात गोपाळराव जोशी आघाडीला असतील हे गृहीत धरावयासही हरकत नाही.
एक गोष्ट जाणवते ती ही की खुद्द आगरकरांनी हा पोरकट प्रकार फारसा मनाला लावून घेतला असे दिसत नाही किंवा धुळवडीतल्या या प्रकाराला फारसे महत्वही दिलेले दिसून येत नाही.
सुधारकाच्या ६ एप्रिल १८९१ च्या अंकात पत्रव्यवहार या सदरात एख पुणेकराने नाशिकहून पाठिवलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्या पत्रातही प्रेतयात्रेचे जे वर्णन आहे ते पुणे वैभव, केसरी, इंदुप्रकाश या वृत्तपत्रांनी दिलेल्या वर्णनाशी जुळणारे असेच आहे. या पत्राखाली आगरकरांनी जी टिप दिली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. या विषयाची असली चर्चा आता पुरे झाली. याउपर असली पत्रे आम्ही छापणार नाही.
खुद्द आगरकरांनी धुळवडीच्या दिवशी काढण्यात आलेल्या प्रेतयात्रेबाबत तेव्हाही काही लिहलेले आढळत नाही व पुढेही या घटनेचा आवर्जून उल्लेख करण्याइतकी त्यांना ही घटना महत्वाची वाटलेली दिसत नाही.. आगरकरभक्तांनी मात्र कालांतराने या घटनेला इतके महत्व दिले की आगरकरांनी जिवंतपणी पाहाव्या लागलेल्या या प्रेतयात्रेचा निर्देश केल्याखेरीच आगरकरांना श्रद्घांजली वाहणेच आता अशक्य होऊन बसले आहे.
- य.दि. फडके सोबत 25/2/77