अग्निपथ योजनेला विरोध नेमकं कोण करतय..?

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लष्करातील नवीन भरती प्रक्रिया ‘अग्निपथ’ची अधिकृत घोषणा केल्यापासून आर्मीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. घोषणा देत सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

ठिकठिकाणी रेल्वेला जाळपोळ करण्यात आली आहे. सिकंदराबाद रेल्वेला लावलेल्या आगीचा मुद्दा तापत देशाच्या इतर राज्यांत देखील पोहोचला आहे.

नक्की कोण कोणत्या राज्यात आंदोलनाने डोकं वर काढलं आहे? सविस्तर बघूया… 

बिहार

अग्निपथ योजनेच्या विरोधात सर्वात पहिले आंदोलन सुरु झालं ते बिहारमध्येच. दोन दिवसांपूर्वी सैन्य भरतीसाठी जी वयोमर्यादा ठेवण्यात आली, आणि सेवेचा कार्यकाळ देखील मर्यादित करण्यात आला, त्याचा निषेध करण्यासाठी बिहारचे सैन्य भरती करणारे विद्यार्थी खळबळून उठले. सर्वप्रथम त्यांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत केली. 

त्यानंतर राज्यातील मुंगेर आणि जहानाबादमध्ये आंदोलकांनी टायर जाळले, बसची तोडफोड आणि रेल्वेला आग लावली. यामुळे या योजनेच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन हिंसक झालं. कैमूरमध्ये विद्यार्थ्यांनी इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लावली, आरा स्टेशनवर दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. 

छपरा इथल्या रेल्वेच्या एसी कोचला आग, गोपालगंजमधील सिधवालिया रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेनला आग, बक्सरमध्ये डुमराव रेल्वे स्टेशनला आग लावून सुविधा एक्स्प्रेसच्या एसी बोगीच्या काचा फोडणं, काशी-पटना एक्स्प्रेस १० मिनिटे थांबवणं, मुजफ्फरपूरमध्ये चाकूर चौकात भररस्त्यात जाळपोळ करणं असे प्रकार घडले आहेत.

नवादामध्ये चक्का जाम करत केजी रेल्वे सेक्शनवरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत करत भाजप आमदारावर हल्ला देखील करण्यात आला.

भाजप आमदार अरुणा देवी कोर्टात जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला गेला ज्यात आमदारासह पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय भाजप कार्यालयाला आग लावण्याचे प्रकार देखील घडले आहेत.

सासाराममध्ये निदर्शकांनी एका पोलिसावर गोळ्या झाडल्या. भाजप कार्यालयाची तोडफोड केली आणि उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या बेतिया या निवासस्थानावरही हल्ला चढवला.

बिहारमधील हा सर्व गदारोळ पाहता रेल्वे प्राधिकरणाने २२ पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. अर्धा डझन गाड्याही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

 

तेलंगणा

तेलंगणात सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली, ज्यात स्टेशनवर स्टॉल्स आणि इतर मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. इतक्यावरच न थांबता सिकंदराबाद रेल्वेच्या खिडक्या तोडण्यात आल्या आणि त्यानंतर रेल्वे पेटवली गेली. याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांनी तात्काळ रेल्वेला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. 

सिकंदराबादमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

 

दिल्ली 

दिल्लीच्या नांगलोई रेल्वे स्थानकावर सकाळी ९.४५ च्या सुमारास तरुण पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. रेल्वे ट्रॅकवर अनेक तरुणांनी झोपून घेतलं. रुळावर आडवे पडत त्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरला. संपूर्ण रेल्वे मार्ग विस्कळीत झाला होता. 

यामुळे हरियाणातील जिंदहून जुन्या दिल्लीकडे येणारी गाडी स्टेशनवरच थांबवावी लागली. नंतर पोलिस, जीआरपी आणि अधिकाऱ्यांनी तरुणांची समजूत काढली, त्यानंतर आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक रिकामा केला.

उत्तर प्रदेश

युपीच्या बुलंद शहरात अग्निपथ विरोधात तरुण रस्त्यावर उतरले. रस्ता अडवून त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा पोलीस आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूंमध्ये मोठी बाचाबाची झाली. फिरोजाबाद, उन्नावमधील आंदोलक विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात फिरोजाबादमध्ये काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

बालियामध्ये रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी जमली होती. मात्र याची कल्पना असल्याने स्टेशनवर सकाळपासून पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे बरंच नुकसान करण्यापासून रोखता आलं. तरी तरुणांनी दगडफेकीचा प्रयत्न केला. 

देवरियामध्ये जिल्हा मुख्यालयातील सुभाष चौक आणि तारकुलवा इथे तरुणांनी आंदोलन केलं. गद्रमपूरमध्ये देवरिया-कास्य रस्ता सुमारे तासभर रोखून धरला गेला. आग्रा आणि अलिगढमध्ये आंदोलन करणाऱ्या तरुणांनी काही बसेसची तोडफोड केली. बरेली, मेरठमध्येही ‘अग्निपथ’च्या विरोधात आंदोलन झालं. अलिगडमध्ये हातात काठ्या घेऊन तरुणांचे गट दिल्ली-गभाना रस्त्यावर दिसले. 

राजस्थान 

राजस्थानच्या अनेक भागात तरुणांनी आंदोलन करताना केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. जयपूरमधील कलवार रोडवर तरुणांनी एकत्र येऊन करण्यात आलेल्या घोषणाबाजीत अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्याचवेळी जयपूर-दिल्ली हायवे (एनएच-८) देखील विद्यार्थ्यांनी रोखून धरला. 

ठिकठिकाणी होणाऱ्या या विरोधामुळे दिल्ली-अजमेर महामार्गही जाम झाला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूने कोंडी करण्यात आली होती. सीकर, भिलवाडा आणि जोधपूरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

उदयपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शकांनी गर्दी केली, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि एडीएमला निवेदन दिले. 

राजस्थानच्या आंदोलनात राजकीय नेत्यांचा देखील समावेश दिसला. जयपूरमध्ये बानी पार्कच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे हनुमान बेनीवाल यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण एकत्र आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 

बेनीवाल यांनी १५ जूनला सांगितलं होतं की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता आणि त्यांनी सैन्यभरती रॅली आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. 

हरियाणा 

हरियाणाच्या पलवलमध्ये लष्कराची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले. रस्ता अडवून त्यांनी वाहनांना आग लावली. पलवलच्या उपायुक्तांच्या निवासस्थानाला देखील घेराव घातला. तेव्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली.

तर गुरुग्राम-जयपूर महामार्गही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी रोखून धरला. तेव्हा पोलिसांनी मार्ग वळवून वाटेत अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका केली.

रेल्वेला आग लावण्यात आली ज्यात ट्रॅक खराब झाला. रेल्वे स्टेशनवरील मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. गुरुग्रामसहित रेवाडीतील बिलासपूर आणि सिद्धरावली भागात देखील आंदोलनं झाली. तरुण आंदोलकांनी बसस्थानक आणि रस्ते ताब्यात घेतले तर बिलासपूर चौकात निदर्शने करण्यात आली.

हिमाचल प्रदेश

कांग्रा जिल्ह्यातील गागल शहरातील पठाणकोट-मंडी महामार्गावर तरुणांनी पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि भाजप कार्यकर्त्यांची पोस्टर्स फाडली. निदर्शकांनी धर्मशाळेच्या दिशेने मोर्चा वळवला, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

युवक काँग्रेसच्या बॅनरखाली शेकडो तरुणांनी हमीरपूर इथल्या गांधी चौकात निदर्शने केली. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचे पुतळे जाळले.

मध्यप्रदेश

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये आंदोलन तीव्र झाल्याने पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. ग्वाल्हेर इथल्या बिर्ला नगर रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकाच्या कार्यालयातही तोडफोड करण्यात आली. झांसीतही तरुणांनी रस्त्यावर उतरून टायर जाळून निषेध व्यक्त केला.

रेल्वेच्या झाशी विभागाच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या जमावाने अनेक गाड्यांवर दगडफेक केली. त्याचबरोबर सातहून अधिक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या.

महूमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १६ जूनला पाच पोलिस ठाण्यांच्या भागात कलम १४४ लागू करण्यात आले.

पश्चिम बंगाल

बंगालच्या उत्तर २४-परगणा जिल्ह्यात जवळपास १०० तरुणाच्या गटाने निषेध केला. या गटाने भाटपारा इथली वाहतूक रोखून धरली आणि टायर्स पेटवून रस्त्यांवर सोडले.

अशाप्रकारे देशभरात दिल्लीसहित ७ पेक्षा जास्त राज्य अग्निपथ योजनेच्या विरोधात पटून उठली. अजूनही अनेक ठिकाणी आंदोलक तरुणांना थांबवण्यात शांत करण्यात पोलिसांचे आणि स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

आंदोलनामागे कोण आहे?

सेनेमध्ये भरती होण्याचं स्वप्न बघणारे आणि त्यानुसार अभ्यास करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. भारतीय सैन्यातील तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांकडून हे प्रदर्शन करण्यात येत आहे. यामागे कोणती राजकीय संघटना किंवा इतर कोणती संघटना आहे का?

देश की बात फाऊंडेशन, CYSS, AISA, RYA, SFI, आम आदमी पार्टी युथ विंग अशा विद्यार्थांच्या संघटनांनी अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. संयुक्त रोजगार आंदोलन समिती, देश की बात फाऊंडेशन, AISA, SFI, आम आदमी अशा संघटना या आंदोलनात सक्रिय असल्याची माहिती, द स्टेटमन ने दिलेली आहे.

आंदोलकांच्या मागण्या काय?

  • १. सैन्य भरतीसाठी लागू करण्यात आलेली नवीन अग्निपथ योजना केंद्र सरकारने रद्द करावी.
  • २. लष्करातील नोकरी पूर्वीप्रमाणेच दिली पाहिजे. फक्त चार वर्ष कोणालाही सैन्यदलात भरती होण्याची इच्छा नाहीये.
  • ३. वयोमर्यादेचा मुद्दा अन्यायकारक आहे.
  • ४. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली भरती सुरू करावी.

“लष्करात निवड होण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून सराव करत आहोत. अशात आता अचानक सांगितलं जातंय की, केवळ चार वर्षांसाठी कराराच्या कालावधीवर सैन्यात भरती होता येणार आहे. तर आम्ही काय करावं. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही.” 

असं सैन्याची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. 

देश पेटवलेल्या या ‘अग्निपथ’ मुद्याचं नक्की आता पुढे काय होतं, हे बघणं गरजेचं आहे…

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.