अग्रलेखांच्या बादशाहला यशवंतराव म्हणाले, “आजोबांचा खरा नातू शोभतोस !!”

एकेकाळी केसरीचा अग्रलेख छापून आला की सगळीकडे चर्चा व्हायची. लोकमान्य टिळकांनी आपल्या तिखटजाळ शब्दात सरकारचा घेतलेला समाचार मराठी वाचक रोज सकाळी कौतुकाने वाचायचे. इंग्रज अधिकाऱ्यांची चिडचिड व्हायची. भारताचं स्वातंत्र्यलढ्याची दिशा केसरीच्या अग्रलेखांतून ठरवली जायची.

कित्येकदा टिळकांना सरकारकडून अग्रलेखांच्या भाषेसाठी नोटीस गेली, दोनदा तर राजद्रोहाचा खटला देखील भरला गेला.

विशेष म्हणजे हे अग्रलेख बऱ्याचदा टिळकांच्या सहकाऱ्यांनीही लिहिलेली असायची. यात प्रमुख नाव होतं, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. 

खाडिलकर हे पहिल्यापासून टिळकभक्त होते. त्यांच्या लिखाणात टिळकांची लेखनशैली एवढी बेमालूमपणे मिसळली गेली होती की कोणीही केसरी वाचल्यावर त्यांचा लेख कोणता आणि टिळकांचा लेख कोणता हे ओळखू शकत नव्हते.

अस म्हणतात की ज्या अग्रलेखामुळे लोकमान्यांना ६ वर्षे मंडालेमध्ये कारावास सहन करावा लागला तो लेख सुद्धा काकासाहेब खाडिलकर यांनीच लिहिला होता.

टिळकांच्या मृत्यूनंतर केसरीमधल्या टिळकवाद्यांशी त्यांचे राजकीय मतभेद झाले. टिळकांनंतर देशाच्या राजकारणाचा वारसा गांधीजींकडे जाणार आहे आणि हे मला खुद्द लोकमान्यांनी मृत्यूपूर्वी सांगितले होते असा दावा खाडिलकर करायचे. त्यांनी केसरी सोडली.

आता येणारे युग हे गांधीचे आहे, त्या युगाची  पावले काकासाहेबांनी ओळखली आणि ते समजून चुकले की. जुना काळ संपला आहे, ‘नवा काळ’ येत आहे, त्याला आपण पाठमोरे न होता सामोरे गेले पाहिजे. म्हणूनच ‘नवा काळ’ हे पत्रनाम घेऊनच काकासाहेब पुढे सरसावले.

१९२३ रोजी नवाकाळची स्थापना केली. 

गांधीच्या वाटेवरून जातानाही काकासाहेबांनी टिळकशैलीतील अग्रलेखांचा वारसा सोडला नाही. एकदा त्यांच्यावरही जहाल अग्रलेखामुळे राजद्रोहाचा खटला दाखल झाला. त्यावेळी तुरुंगात जाताना आपल्याला मुलाकडे नवाकाळ सोपवला. अप्पासाहेब खाडिलकरांनीही स्वातंत्र्यलढ्याचा अग्रणी वर्तमानपत्र ही नवाकाळची ओळख जपली. खुद्द महात्मा गांधी नवाकाळच्या अग्रलेखांचे चाहते होते.

पुढे स्वातंत्र्यानंतर १९६४ साली अप्पासाहेब खाडिलकरांनी राजीनामा दिला व नाट्याचार्यांचे नातू नीळकंठ उर्फ निळूभाऊ खाडिलकर नवाकाळच्या संपादकपदी आले.

निळूभाऊंचे वय तेव्हा जास्त नव्हते. मात्र त्या वयातही त्यांची विषयाची समज  आणि भाषेवरील पकड वाखाणण्याजोगी होती.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांचा सुरवातीच्या काळापासून निळूभाऊ खाडिलकरांच्यावर विशेष लोभ होता. खाडिलकर आपल्या वर्मानपत्रातून सातत्याने कॉंग्रेस पक्षावर आणि सरकारवर टीकेची झोड उठवायचे तरी यशवंतरावांचा त्यांच्यावरील प्रेम कधी कमी झाले नाही.

साहेब आपल्याला एवढे प्रेमाने का वागवतात हे खाडीलकरांना समजत नसे. आपल्या निर्भीड पत्रकारीतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या निळकंठ खाडिलकरांनी अखेर एकदा यशवंतरावांना थेट प्रश्न विचारला,

‘ साहेब, मला एक कुतुहल आहे. ‘ नवाकाळ ‘ चा खप तो किती ? पंचवीस हजारही नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात.  हे जग आणि त्यातही राजकारण, हे दिल्याघेतल्याचे असते. मग माझ्याकडे देण्यासारखे काही नसताना तुम्ही मला इतक्या प्रेमाने का वागवता? मोठमोठ्या खपाच्या वृत्तपत्रातील बातमीदारांनाही तुमची अशी आपुलकी लाभत नाही. “

यशवंतराव हसू लागले. पण काही वेळाने ते गंभीर होऊन म्हणाले,

 ” हे बघ , सर्वकाही दिल्याघेतल्याचे नसते. मी काही कुटुंबे आणि काही व्यक्ती मनाने निवडल्या आहेत. मी त्यांना खास आपुलकीनं वागवत असतो. जणू महाराष्ट्राने त्यांची जबाबदारीच माझ्यावर सोपविली आहे.”

यशवंतराव चव्हाण हे काकासाहेब खाडिलकरांच्या लेखणीचे चाहते होते. निळूभाऊ तोच वारसा पुढे नेतील अशी त्यांना अपेक्षा होती आणि ते त्या मार्गाने चालत देखील होते. मग फक्त सरकारवर टीका करतात म्हणून एका उद्यन्मुख संपादकाला दाबण्याएवढ्या कोत्यामनाचे यशवंतराव नक्की नव्हते.

निळकंठ खाडिलकर यांनी नवाकाळच्या अग्रलेखांचा दर्जा सांभाळला. नवाकाळ साठी त्यांनी घेतलेल्या दिग्गजांच्या मुलाखती खूप गाजल्या. त्यांचे अग्रलेख राज्यभर चर्चेचा विषय ठरु लागले.

पुढेपुढे तर अग्रलेखांचा बादशाह ही उपाधी त्यांना मिळाली. यशवंतरावांच्या अपेक्षेला ते खरे उतरले होते.

एकदा नवाकाळ वर्तमानपत्राच्या कोणत्या तरी समारंभासाठी यशवंतराव चव्हाण, कम्युनिस्ट नेते कॉम्रेड डांगे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते एस.एम जोशी असे तीन दिग्गज आले होते. त्यावेळी प्रास्ताविक करताना निळूभाऊ खाडिलकरांनी सध्याची पत्रकारिता, त्यावर झालेले भांडवलशाही व सत्ताधाऱ्यांचे अतिक्रमण यावर जहाल भाषण केले. ते म्हणले,

“पूर्वी वृत्तपत्रांच्या संपादकाचे एक पाय ऑफिस मध्ये तर दुसरे तुरुंगात असायचे तर आजकाल संपादकांचे एक पाय ऑफिसमध्ये तर दुसरे मंत्रालयात असते.”

टाळ्यांचा गडगडाट झाला. निळूभाऊंच्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या कॉम्रेड डांगे आणि एसएम जोशी यांनी देखील त्यांचीच री ओढली. या सगळ्या नेत्यांची भाषणातील जुगलबंदी म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी होती.

आता सत्ताधार्यांचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.

यशवंतरावांनी कम्युनिस्टानां कोपरखळ्या मारत सुरवातीलाच सभा जिंकली. मात्र निळूभाऊ बद्दल बोलताना मात्र त्यांची भाषा सौम्य झाली.

“निळकंठाने आज जे मुद्दे मांडले त्याची स्वतंत्र चर्चा मला करावी लागेल ! फार भेदक होते त्यांचे भाषण !! पण आज एकच सांगतो, हा मुलगा खाडिलकरांचा नातू शोभतो !!”

निळूभाऊ म्हणतात की यशवंतरावांचे ते एक वाक्य मला आयुष्यभर पुरेल एवढी प्रशंसा ऐकल्याच समाधान देऊन गेल. यापेक्षा आता अधिक प्रशंसा शक्य नाही. 

ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले नीळकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. आपल्या अभ्यासू अग्रलेखांनी सरकारला हलवणाऱ्या  संपादकंाच्या  पिढीचे ते शेवटचे वारसदार होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.