राज्याचा कृषिमंत्री राजकारणातून निवृत्ती घेऊन भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी आयुष्य वाहतो..

राजकारण ही अशी नशा आहे की अगदी म्हातारपण सरलं तरी कित्येकांना खुर्ची सोडवत नाही. सत्तेच्या या खेळात निवृत्ती ही अशी नसतेच. अनेकद तर अशी परिस्थिती येते की पुढच्या पिढीचे तरुण नेते अगदी खेचून खुर्चीला चिकटलेल्या जेष्ठांना बाजूला करतात.

मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक असाही नेता होऊन गेला ज्याने फक्त भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी राजकारणातून निवृत्ती घेतली.

डॉ.देवीसिंग चौहान

देवीसिंग चौहान यांचा जन्म २ मार्च १९११ रोजी औसा तालुक्यातील नागरसोगा या गावी झाला. त्यांचं मूळ नाव धोंडुसिंग व्यंकटसिंग चौहान. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. माळावर गुरे वळत त्यांनी आपलं शिक्षण सुरु ठेवलं. प्राथमिक शिक्षण गावीच झालं पण पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडलं. हिप्परगा येथील राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश घेतला.

या शाळेत असतानाच स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्या सारख्या ध्येयवादी शिक्षकांमुळे त्यांच्यावर राष्ट्रभक्ती आणि त्यागाचे संस्कार झाले. तिथेच त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी देखील केली. त्या दिवसापासून त्यांच्या नावापुढे गुरुजी ही पदवी कायमची जोडली गेली.

काही दिवस नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे शिक्षक म्हणून काम केले. अंबाजोगाईच्या योगेश्वरी विद्यालय शिक्षक म्हणून काम केले. स्वामीजींच्या सांगण्यावरून नागपूरला त्यांनी एल एल बीची डिग्री पूर्ण केली. याच काळात स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने हैद्राबाद स्टेट कॉग्रेसच्या संघटनेचे काम करू लागले. तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैद्राबाद संस्थानाच्या जहागिरीतील सारा-कर यांची माहिती गोळा करून ती फ्यूडल ऑपरेशन्स इन हैदराबाद या नावे ग्रंथरूप करून प्रकाशित केली.

नागपूर येथे त्यांची वकिलीची चांगली प्रॅक्टिस सुरु होती. मात्र शिकवण्याची खुमखुमी होतीच. त्यांनी आपल्या काही मित्रांसह उमरगा येथे भारत विद्यालयाची स्थापना केली.

त्याकाळात अशा आडमार्गाच्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी चांगले शिक्षक येत नसत. अखेर बाबासाहेब परांजपेंच्या सल्ल्याने देवीसिंग गुरुजींनी वकिलाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ मुख्याध्यापक म्हणून या शाळेत रुजू झाले.

हा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या समाप्तीचा होता. मात्र सोबतच हैद्राबादच्या नवाबाने भारतात विलीन होण्यास नकार दिल्यामुळे मुक्तिसंग्राम पेटले होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सारा मराठवाडा पेटून उठला होता. देवीसिंग चौहान यांनी देखील यात उडी घेतली.

देवीसिंह चौहान यांना सन १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात स्टेट कॉंग्रेस पक्षातर्फे झालेल्या सत्याग्रहात कारावासाची शिक्षा झाली होती. पण पोलिसी कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्यासारख्या असंख्य वीरांच्या प्रयत्नामुळे हैद्राबादच्या नवाबाला शरणागती पत्करावी लागली. मुक्तिसंग्रामाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये देवीसिंह चौहान गुरुजी यांचं नाव आघाडीवर झळकत होतं.

स्वातंत्र्योत्तर काळात ते कॉंग्रेसचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. मराठवाड्यात अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या.  साखर कारखान्याचे बीज देखील पेरलं. राजकारण आणि समाजकारणात मोठं नाव कमावलं पण त्याचा आर्थिक फायदा कधी करून घेतला नाही.

स्वतंत्र हैद्राबाद राज्याच्या पहिल्याच मंत्री मंडळात शिक्षण व सहकार मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. राज्य पुनर्रचनेनंतर मराठवाडा द्विभाषिक मुंबई राज्यात विलिन झाला. द्विभाषिक मुंबई राज्यातही कृषी, बांधकाम, दळणवळन, शिक्षण खात्याचे उपमंत्री या नात्याने त्यांनी काम केले. लोकसेवा आयोगासारख्या अतिशय महत्वच्या संस्थेवर सदस्य म्हणून देखील त्यांची नियुक्ती झाली.

पण स्वातंत्र्यलढ्यात लढलेल्या त्यागाची शिकवण आचरणात आणलेल्या देवीसिंह गुरुजींच सत्तेच्या चढाओढीत मन रमल नाही. तेव्हा त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन आपलं आयुष्य भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी वाहून घेतलं.

संस्कृत,हिंदी,कन्नड,फारसी,उर्दू, पोर्तुगीज,डच, इंग्रजी आणि मराठी भाषणावर त्यांचं प्रभुत्व होतं.  

इतिहास हा त्यांचा अतिशय आवडता विषय. भाषांच्या इतिहासाच्या सूक्ष्म संशोधनास त्यांनी सुरवात केली. राजकारणी मंत्री म्हटलं की त्यांचा अभ्यास लेखन संशोधन याबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा तयार होते. पण देवीसिंग चौधरी यांनी या प्रतिमेला छेद देण्याचं काम केलं.

भारतीय इतिहास कॉंग्रेस व अखिल भारतीय प्राच्य परिषद यांच्या इतिवृत्तान्तांवरून देवीसिंह यांचे अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाल्याचे आढळते. तसेच पुण्याच्या भांडारकर संशोधन मंदिर या संस्थेच्या आणि मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिक पत्रांतून त्यांनी लेखन केल्याचे आढळते.

त्यांचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे मराठी आणि दक्खिनी हिंदी (१९७१) हा लेखसंग्रह आहे.

यात दक्खिनी हिंदी १३ व्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत भारताची संपर्क भाषा म्हणून नांदली  व दक्खिनी हिंदी ही आज हिंदी व उर्दू भाषेची जनक भाषा आहे याचा उल्लेख आहे. यातील मराठी साहित्याचा दक्खिनी हिंदी साहित्यावर पडलेला प्रभाव व भाषांनी जी परस्परांशी देवाण-घेवाण केली त्यावरून भाषांच्या जडण घडणीत इतर भाषांचा कसा निकटचा संबंध होता हे स्पष्ट केले आहे.

या ग्रंथाने मराठीत सर्वांना दक्खिनी हिंदीचा परिचय करुन दिला. मराठी आणि खडीबोली या दोन्हीही भाषा एकाच कुळातील असून त्यांच्यात सर्व प्रकारचे सारखेपण आहे पण दक्षिणेत दक्खिनी हिंदीच्या विकासात तेलगू आणि कानडी भाषेचे सहकार्य मिळू शकले नाही हे सप्रमाण सांगितले आहे.

त्यांच्या ऋग्वेदःसमस्या आणि उकल (१९८८) या ग्रंथामुळे त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचले. त्यांच्या संशोधनामुळे प्राचीन भारतातील ऋग्वेदाच्या अभ्यासकांना नवी दृष्टी प्राप्त झाली. भाषाशास्त्राच्या आधारे ऋग्वेदाच्या काळाची मिमांसा करून अनेक शब्दांच्या अर्थाची ओळख त्यांनी करून दिली. ऋग्वेदाकडे ते धार्मिक ग्रंथ म्हणून नव्हे तर आर्य संस्कृतीच्या उदयकाळातील पाऊल खुणांचा दस्तऐवज म्हणून पहात होते.

इतिहासाबद्दलचे त्यांचे आणखी एक महत्वाचे संशोधन म्हणजे भारत इरानी संश्लेषण  हा ग्रंथ.

या ग्रंथात त्यांनी  भारत इरानी यांच्यातील संबंध हे अतिप्राचीन असून इ. स. ५०० पासून या दोन देशातील संबंधाला परत कनिष्काची राजधानी पिशाचूर येथून सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले आहे. इरानी भाषेतील अनेक शब्द भारतातील जुन्या साहित्यात आढळतात. तसेच इरानी राजवटीची नाणी विविध वस्तू कौसंबी, पाटलीपुत्र, रांची, नाशिक या प्राचीन स्थळी मिळतात आणि इरानी भाषेच्या संपर्कातून पैशाची, प्राकृत भाषेची निर्मिती झाली हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखविले.

इरानी व मराठी भाषेच्या देवाण घेवाणीचे दालन मराठी संशोधनाच्या क्षेत्रात उघडले.

भारत व इराण यांच्या भाषांची जननी ही एकच असली पाहिजे. एकाच भाषेपासून या भाषांची निर्मिती झालेली आहे. पर्यायाने या दोन्ही भाषा आर्य गणातील आहेत. त्यामुळे इराणी आणि भारतीय हे आर्यच आहेत. आर्याच्या स्थलांतरात आर्यांचा एक समूह इराणात तर दुसरा भारतात आला हे सांगून भारत आणि इरान यांचे संबंध अतिप्राचीन काळापासून आहेत हे स्पष्ट केले.

जेष्ठ साहित्यिक, ध्येयनिष्ठ शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, श्रेष्ठ संशोधक, संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व आदर्श शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी १९९२ ला देवीसिंग चौहान यांचा मानपत्र देऊन गौरव केला. तसेच सामाजिक, राजकीय व संशोधनासारख्या क्षेत्रात केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल देवीसिंग चौहान यांना मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी डी. लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे पुरस्कार मिळाले. प्राच्य परिषदेमध्ये त्यांचे निबंध वाचल्यानंतर मोठमोठे विद्वान एका राजकारण्याने केलेले हे संशोधन आहे हे ऐकून अचंबित व्हायचे. फक्त नावापुढे डॉक्टरेट लावावी म्हणून केलेलं हे लिखाण नव्हतं तर मराठी व इतर भाषांना समृद्ध करण्यासाठी केलेले प्रयत्न होते.

असं म्हणतात कि देवीसिंग चौहान म्हणजे मराठी भाषाशास्त्राच्या अभ्यासाला  मिळालेली फार मोठी देणगी आहे. राजकारणात मोठमोठ्या पदावर जाणे सहज शक्य असतानाही आपल्या भाषेसाठी आपल्या मातीसाठी झटणारा असा हा नेता विरळच.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.