गावात बातमी आली, पाटलाच्या पोरीने पेशव्यांच्या घोडेस्वाराचं डोकं गोफणीने फोडलं आहे.

गोष्ट आहे अठराव्या शतकातली. अहमदनगरच्या कर्जत जवळच धनगर वस्ती असलेलं चौंडी हे छोटसं गाव. गावच्या पाटलाची मुलगी म्हणजे माणकोजी शिंदेची लेक अहिल्या शेतावर राखनीसाठी आली होती.

बाजरीच्या पिकाची कणसे अगदी टपोरी, भरभरून आली होती. लहानशा झुळुकीने डोलणारे शिवाय ऐटबाज दिसत होते. शेताच्या बांधावर उभी राहून अहिल्या अधूनमधून येणाऱ्या पाखरांच्या थव्यांवर नजर ठेवून होती. मधूनच एखाद-दुसरी हाकाटी देऊन उडत असलेल्या पाखरांच्या थव्याला ती भांबावून सोडत होती, दुसरीकडे वळवीत होती. मात्र तिची गोफण भाला अन तिरकमढा अगदी तयार होते. परंतु वाकडी वाट करून मुद्दाम इकडे कोण येतो ?

तसं बघायला गेलं तर शेजारच्या गावच्या ठाणेदाराकडे कसलं तरी पत्र द्यायला किंवा काही तरी कामासाठी एखादा कोणी वाटसरू तिथून जायचा तेवढचं.

इतक्यात घोड्यांच्या टापांचा आवाज दिशेने येताना वाऱ्यावर उठला. अहिल्या ताडकन उठली. तिने भाला सरसावला. गोफण सज्ज ठेवली अन ‘कोण आहे रे’ अशी हाळी दिली.

“खबरदार, शेतामध्ये घोडी घालू नका उभ्या पिकांची नासाडी करू नका. नाहीतर..”

असे म्हणून हातात भाला घेऊन तो फेकण्याच्या अविभार्वात सज्ज झाली. तेवढ्यात पुढे सरसावलेले ते घोडेस्वार तिचा हा अवतार पाहून वरमले. त्यांचे घोडे थोडेसे मागे हटले. त्यांनी ओळखले की शिवारातील कणसे आता भरून आली आहेत. ते मुकाट्याने मागे वळले.

अहिल्येने आपल्या हातातील भाला खाली रोवून ठेवला. इतक्यात दुसऱ्या एका घोड्याच्या दौडीच्या टापा ऐकू आल्या. तशी अहिल्येने गोफण सरसावली. ती ओरडली.

“थांबा ! शिवारात घोडा उधळू नका. उभ्या पिकाची नासाडी होईल. “

परंतु त्या तिच्या बोलण्याकडे त्या घोडेस्वाराचे लक्ष नव्हते. उलट या थांबलेल्या इतर स्वारांकडे बघून फिदीफिदी हसत त्याने आपला घोडा दुसऱ्या बाजूला वळवला अन आता तो शेताच्या बांधावरून पिकात घोडा घालणार एवढ्यात, रप्पकन गोफणीतला दगड त्याच्या कुशीवर आदळला अन क्षणार्धात तो घोड्यावर लोंबकळू लागला, त्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. त्याच्या बरोबरच्या घोडेस्वारांनी त्याला सावरल आणि परत आपल्या छावणीकडे घेऊन गेले.

अहिल्यासुद्धा आपल्या सख्यांसोबत वस्तीवर परतली. तिची आई खूप घाबरली होती. इतक्यात एक स्वार छावणीवरून आला आहे आणि अहिल्याची चौकशी करू लागला. गावात सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. माणकोजी शिंदे तेव्हा परगावी गेले होते. ते परत आले, वेशीपर्यंत पोहचले तेव्हढ्यात ही बातमी त्यांना कळाली,

अहिल्याने पेशव्यांच्या सरदाराच्या घोडेस्वाराला गोफणीने प्रसाद दिला आहे.

त्यांनी लगोलग अहिल्याला घेतले आणि छावणी कडे धाव घेतली. आपल्या हातून अशी काय आगळीक घडली हे माहिती नसलेलं ते लेकरू वडिलांचा हात घट्ट धरून निघाल होतं, आपल्यामुळे वडिलाना शिक्षा भोगायला लागणार याची काळजी तिला लागली होती.

मल्हारराव होळकर म्हणून मोठ्या सरदाराची ती छावणी होती. हुजर्यांनी या बापलेकीला त्यांच्या समोर नेऊन उभ केलं. अहिल्येच्या गोफणीचा प्रसाद खालेल्ला तो घोडेस्वारही तिथेच होता. माणकोजीनी कुर्निसात केला आणि झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. मल्हाररावानांही काहीच माहित नव्हत. त्यांना कोणीतरी संपूर्ण घटना सांगितली. ते ऐकून ते रागाने लाल झाले. त्यांनी आपल्या सरदारालाचं रागे भरले आणि माणकोजीकडे वळून म्हणाले,

“पाटील तुमची लेक खूप धाडसी आणि गुणी आहे. खुद्द शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तुमची पोरगी महाराजांच्या शब्दानुसारचं चालत आहेत. गुस्ताखी आमच्या माणसाकडून झाली आहे. क्षमा तुम्ही नाही आम्ही मागतो. “

माणकोजीना गहिवरून आले. सरदार मोठ्या मनाचे आहेत याची त्यांना खात्री पटली होती. अहिल्या पुढे आली तिने मल्हाररावांच्या पायाशी डोकं टेकवल. ते म्हणाले,

“औक्षवंत हो बाळ, निर्धास्त हो !”

काही दिवसांनी खुद्द मल्हाररावांची स्वारी माणकोजींच्या घरी आली. सरदार आलेत म्हटल्यावर अख्ख्या गावाची तारांबळ उडाली. अहिल्याच्या आईला समजेना आता काय झालं असावं. माणकोजीनी मल्हाररावांचं आगतस्वागत केलं. सगळी क्षेमकुशल विचारणा झाली. मल्हारबाबा म्हणाले,

“आपली गोफण वाली कुठाय. आम्ही आमच्या मुलासाठी खंडेरावांसाठी तिला मागणी घालायला आलोय. तुमची हा असेल तर आम्ही अहिल्येला सून करून घ्यायचं म्हणतोय.”

माणकोजीना आपल्या कानावर विश्वास बसेना. पेशव्यांचे मोठे सरदार मल्हारराव होळकर आपल्या अहिल्येला सून  करायचं म्हणत आहेत. त्यांच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले. होकार देत त्यांनी मल्हाररावांचे पाय धरले. त्यांनी माणकोजीचे खांदे पकडले, त्यांना उठवलं आणि म्हणाले,

“माणकोजी तुम्ही आमचे व्याही होणार, असं आता वाकायचं नाही. ही लेक लई गुणी आहे, तुमच नाव तर मोठ करेलचं पण आमच्या होळकर घराण्याची सुद्धा कीर्ती वाढवेल.”

माणकोजीची अहिल्या “अहिल्याबाई होळकर” बनल्या. केवळ मल्हाररावांची सून नव्हे तर इंदूरवासीयांची आराध्यदेवता बनली. मल्हारराव व त्यांच्या मुलाच्या निधनानंतर आपल्या राज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली व एक आदर्श राज्यकारभार करून दाखवला. आजही अख्खी मराठी जनता त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणून ओळखते.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Arvind says

    अश्या पराक्रमी राणींना मानाचा मुजरा

Leave A Reply

Your email address will not be published.