अहिल्यादेवींच्या चोख उत्तराने राघोबा पेशव्यांना इंदौर राज्यावरचा हल्ला रद्द करावा लागला..

अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने राज्यासाठी संपत्ती जमवून ठेवली. या संपत्तीतून देशभरात धर्मशाळा उभारण्यात आल्या. नद्यांवर घाट बांधण्यात आले. जनतेच्या कल्याणासाठी राज्याच्या संपत्तीचा वापर व्हावा यासाठी अहिल्याबाई कटिबद्ध असत.

मात्र हि गोष्ट इतर राज्यातील लोकांना पहावात नव्हती. इतर राज्यांच जावूदे इंदौर राज्याच्या संपत्तीवर खुद्द राघोबादादा पेशव्यांचा डोळा होता. इंदौर राज्यातील संपत्ती आपल्याला द्यावी असा पत्रव्यवहार देखील राघोबादादांनी केला होता.

मात्र अहिल्याबाई होळकर ज्याप्रमाणे लोककल्याणासाठी लढत असत त्याचप्रमाणे शत्रू आपला असो वा परका त्यासोबत प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात देखील लढण्यास तयारीत असत.

त्या धोरणी होत्या. आपल्या एका पत्रात त्या म्हणतात,

माझ्या राज्यावर कोणी आक्रमण केले तर मी तलवार घेवून उभा राहीन.

आम्ही कष्ट घेवून इंदौरची जहागिरी मिळवली आहे. त्यासाठी रक्तही सांडले आहे. आजदेखील आमच्या राज्याच्या रक्षणासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू.

राज्याच्या पैशाच्या बाबतीत त्या कडक शिस्तीच्या होत्या. त्या हिशोब चोख ठेवत असत. त्यांच्या राज्याच्या खजिना नेहमी भरलेला असे. राज्यरक्षणासाठीच त्यांनी ही चोख व्यवस्था ठेवली होती.

राघोबादादा पेशवे यांच्या मनात मात्र हा खजिना बळकावण्याचा मानस होता.

राघोबादादा आपल्या राज्याचा खजिना लुटण्यासाठी इंदौरवर आक्रमण करणार आहेत ही माहिती आपल्या हस्तकांकडून अहिल्याबाईंना समजली. तेव्हा अहिल्याबाईंनी राघोबादादा पेशवेंना एक पत्र लिहले. हे पत्र म्हणजे स्वकीयांसोबत राजकीय चातुर्य कसे दाखवावे याचा उत्तम नमुना म्हणूनच पहावे लागते.

या पत्रात त्या म्हणतात,

आपण एका स्त्रीबरोबर युद्ध करुन स्वत:ची अपकिर्ती करुन घेवू नका. तुमच्या नावाला कलंक लागेल. तो पुन्हा कधीही पुसला जाणार नाही. मी एक स्त्री आहे. प्रामाणिकपणाने प्रजेच्या कल्याणासाठी पैसे मिळवले आहेत. माझ्या प्रामाणिकपणाची सर्वांना जाण आहे.

माझा पराभव झाला तर मला कोणी नावे ठेवू शकणार नाही. पण तुमचा पराभव झाला तर सर्व लोक तुम्हाला नावे ठेवतील. तुमची अपकिर्ती सर्वत्र पसरेल.

राघोबादादांना अहिल्याबाईंचे हे विचार पटले. एका स्त्रीने प्रामाणिकपणे  मिळवलेल्या पैशावर, राज्यावर हल्ला करणे योग्य नाही. अहिल्याबाईंची किर्ती त्यांच्या प्रामाणिकपणामुळे सर्वदूर पसरली आहे. त्यांच्या मागे अनेक लोक आहेत. प्रसंगी आपला युद्धात पराभव देखील होवू शकतो याचा अंदाज त्यांना आला व राघोबादादांनी युद्धाची कल्पना रद्द केली.

राघोबादादा समक्ष अहिल्याबाईंच्या भेटीसाठी आले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे त्यांनी कौतुक केले. अहिल्याबाईंच्या हूशारीमुळे संभाव्य युद्ध टळले. राघोबादादांना योग्य शब्दात सुनावताना तितकाच सन्मान देखील ठेवला याचा विचार करुन एक धोरणी महाराणी म्हणून अहिल्याबाईंची किर्ती सर्वदूर झाली.

संदर्भ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लेखक डॉ. ज्ञानेश्वर तांदळे साधना सेवा प्रकाशन

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.