होळकर घराण्याचं जेजुरीशी शेकडो वर्षांचं नातं आहे..
सोन्याची जेजुरी म्हंटल की आठवत तो भंडाऱ्यांच्या उधळणीत न्हाऊन निघणारा गड आणि यळकोट जळकोट जय मल्हारचा जयघोष. राज्यासह परराज्यातील देखील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जेजुरीचा खंडोबा, याचा इतिहास देखील शेकडो वर्षे जुना आहे.
जेजुरी गडावरील पहिला ज्ञात शिलालेख अगदी १२४६ पासूनचा आढळून येतो. त्यानंतर १६०८ साली मंदिराचे बांधकाम झाल्याचा शिलालेखामध्ये उल्लेख आहे. पुढे १६३७ मध्ये राघो मंबाजी या सरदारांनी जीर्णोद्धाराचे काम करून सदर बांधली.
त्यानंतर १६५४ मध्ये पुरंदर मिळवल्यानंतर छ. शिवरायांनी जेजुरीला भेट देऊन इथे एक राजवाडा बांधल्याचा संदर्भ चिटणीसांच्या बखरीत आहे. याच बखरीत शिवाजी राजेंचे स्वराज्य उभं राहावे म्हणून शहाजी राजे नवस बोलले होते आणि त्याच नवसाच्या पूर्तीसाठी त्यांनी कर्नाटकी कारागिरांकडून सोन्याच्या मूर्ती बनवून घेऊन त्या अर्पण केल्याचा उल्लेख आहे.
पुढे १७०९ दरम्यान थोरल्या शाहू महाराजांनी जेजुरीला भेट देऊन मल्हारतीर्थाच्या जीर्णोद्धाराचे काम केले. त्यानंतर १७११ ते १७२७ च्या दरम्यान तंजावर येथील भोसल्यांनी इथं भेट देऊन खंडोबा-म्हाळसाच्या मूर्ती अर्पण केल्याचे संदर्भ सापडतात.
मात्र आज जी जेजुरी दिसत आहे ती उभी करण्यात सिंहाचा वाटा आहे इंदोर येथील श्रीमंत होळकर राजघराण्याचा.
जेजुरीचा खंडोबा हे होळकर राजघराण्याचे कुलदैवत होय. याच खंडोबाच्या कृपेने आपण सरदार झालो अशी त्यांची श्रद्धा होती. साधारण १७३५ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी जेजुरी गडाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केलं. त्यानंतर १७३९ ला त्यांनी व चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर लुटीतील दोन पोर्तुगीज घंटा खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या.
पुढे मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी १७४२ ला गडावरील दगडी कमानीचे आणि १७५८ ला गडावरील नगारखाण्याचे काम पूर्ण केले. सभोवारचा सभामंडप, ओवऱ्या आणि इतर ऐतिहासिक वास्तू देखील त्यांनीच बांधल्या.
१७६६ साली मल्हारराव होळकर यांचं निधन झाल्यानंतर जेजुरीची जबाबदारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आली
होळकर वाडा :
श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांनी १७६८ मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वात जेजुरीमध्ये होळकर वाड्याचे काम पूर्ण केलं. तसेच आतमध्ये असलेलं दत्त मंदिर आणि वाड्याच्या समोर असलेलं विठ्ठल मंदिर हे देखील अहिल्यादेवींच्याच इच्छेनुसार बांधलं गेलं.
सध्या या वाड्यात अहिल्यादेवी यांचे स्मारक असून होळकर काळातील दुहेरी बांधकाम बघायला मिळतं. यात प्रामुख्याने दगडी व लाकडी कलाकसुर बघण्यासारखी आहे. या वाड्यावर देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदोरयांचे नियंत्रण आहे.
१९९६ साली या वाड्याचा काही भाग हा महाराजा यशवंतराव होळकर प्राथमिक शाळेसाठी देण्यात आला.
१७७० ला अहिल्यादेवींनी जेजुरी गडाला किल्ल्यासारखी असणारी तटबंदी उभारली. तसेच या तटबंदीसाठी जो दगड वापरला गेला तो पणदरे (ता.बारामती) इथल्या खिंडीतून आणण्यात आला. पणदरे ते जेजुरी या मार्गावर दगडाची वाहतूक केली जात असताना अहिल्यादेवींनी काही पायविहिरी निर्माण केल्या.
पश्चिम, उत्तर व पूर्वेकडील तटबंदीवर होळकरांचे शिलालेख आजही आढळतात.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) प्रतिसमाधी :
१७९० च्या सुमारास श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांच्या प्रतिसमाधीच्या उभारणीचं काम अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनात पूर्ण झालं. आतमध्ये लाकडी मेघडंबरीमध्ये खालच्या बाजूला संगमरवरी शिवलिंग असून मागील कट्ट्यावर मध्यभागी मल्हारराव होळकरांची संगमरवरी बैठी मूर्ती, तर त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती आहेत.
ही समाधी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर म्हणून ओळखली जाते.
पूर्वाभिमुख असलेल्या या छत्री मंदिराचे बांधकाम खूपच प्रमाणबद्ध आणि रेखीव आहे. समोरच्या बाजूला चौथऱ्यावर कोरीव नंदीचे शिल्प आहे. तर मंदिराच्या बाजूला दोन स्मारक घुमटी आहेत. या स्मारक घुमटी अनुक्रमे १७७२ ते १७७३ ला निर्माण केली आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव :
पाण्याने ओसंडून वाहत असलेला आणि वर्षानुवर्षे संपूर्ण जेजुरची तहान भागवत असणारा तलाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव. जवळपास १८ एकर जागेवर असलेला हा होळकर तलाव टेकडीच्या सोंडेवर अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिला आहे.
आजही या तलावातून झिरपणाऱ्या पाण्यावर परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांना पाण्याची कमतरता भासत नाही.
गावाच्या नैऋत्य दिशेच्या डोंगरातून ओढ्यामधून वाहत येणाऱ्या पाण्यावर १७७० मध्ये अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव बांधला. त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूला देवपूजेसाठी फुलबाग तयार केली, तर दक्षिण बाजूला चिंचेच्या झाडांची बाग निर्माण केली. आज या बागेचा उपयोग यात्रा काळातील भाविकांच्या निवाऱ्यासाठी देखील केला जातो.
या तलावाच्या बाजूलाच अहिल्यादेवींनी १७७० मध्ये जलकुंडाची देखील पुनर्बांधणी केली. होळकर तलावातील पाणी भूमिगत व्यवस्थेमधून या जलकुंडामध्ये जात असायचं. जलकुंडामध्ये संगमरवरी चार गोमुखातून पाणी पडत असत म्हणून या कुंडाला गायमुख असं पण म्हंटल जायाचं. पुढे या जलकुंडाच्या जागीच जेजुरी नगरपालिकेने भाविक निवास बांधलेले आहे.
तुकोजीरावांच्या नावाबद्दलचे काही गैरसमज :
तटबंदीवर सुभेदार मल्हारराव होळकर व सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या नावाचे शिलालेख असताना देखील इतिहासकार, मल्हारराव व अहिल्यादेवी यांनीच तटबंदी आणि इतर व्यवस्था निर्माण केल्या असे सांगतात. त्यामुळे तुकोजीराव होळकर यांच नाव असून पण त्यांचं नाव का घेतलं जात नाही? याचं कारण म्हणजे होळकरांची दुहेरी राज्यव्यवस्था.
पुढे सुभेदार मल्हारराव यांच्या मृत्यू नंतर होळकरशाहीत दुहेरी राज्यव्यवस्था सुरु झाली.
अहिल्यादेवी होळकरांच्या दुहेरी राज्यव्यवस्था बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर प्रशासकीय गोष्टीवर अहिल्यादेवी नियंत्रण ठेवत असत तर लष्करी कारवायांमध्ये तुकोजीराव प्रत्यक्ष भाग घेत असत.
राणी अहिल्यादेवी होळकर या प्रत्यक्षात सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या काळात (१७६७-१७९५) होळकरशाहीच्या रिजंट महाराणी होत्या.
म्हणजेच जी राजकीय काम होती किंवा जेथे राजकीय खर्च होत असायचे तिथं सरकारी शिक्का वापरला जात असे व सुभेदार पदावर तुकोजीराव असल्यामुळे त्यांचे नाव शिक्क्यावर असायचे.
सरकारी कामे असो किंवा खासगी कामे असो सर्वांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण अहिल्यादेवींचे होते. त्यामुळे या तटबंदीचा आणि इतर कामांचे निर्माण मल्हारराव यांच्या नंतर अहिल्यादेवींनी केला असे इतिहासकार सांगत असावेत. तसेच ही तटबंदी १७७० ला पूर्ण झाली आणि त्यावेळी सुभेदार तुकोजीराव उत्तरेत दिल्ली स्वारीत महादजी शिंदे यांच्या बरोबर होळकर सेन्याचे नेतृत्व करत होते.
होळकर घराण्याच्या या योगदानामुळेच जेजुरीच्या इतिहासात त्यांना प्रचंड महत्व आहे.
संदर्भ : १. jejuri.net
२. ahilyabaiholkar.in
हे हि वाच भिडू.
- ब्रिटीशांना पळवून पळवून हरवणारे एक महाराज होवून गेले तेच आपले यशवंतराव होळकर..
- सलमान खानचे आजोबा इंदौर मध्ये होळकर संस्थानचे पोलीस प्रमुख होते
- अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.