औरंगजेबाने पाडलेलं काशी विश्वनाथ मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा उभारून दाखवलं.

उत्तरेत काशीला जा अथवा दक्षिणेतील रामेश्वरम. प्रत्येक मंदिरात तुम्हाला मराठी पुजारी हमखास आढळतील. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय.

मध्ययुगात बाहेरून आलेल्या आक्रमकांनी भारतातील संपन्न मंदिरे फोडली. काहींनी मंदिरातील संपत्ती चोरण्यासाठी तर काहींनी मूर्तीपूजेला विरोध म्हणून. विशेषतः उत्तरेत हा प्रकार जास्त करून पाहायला मिळाला.

याची सुरवात गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून झाली. तब्बल १७ वेळा सोमनाथ मंदिर विध्वंस केलं गेल. यातील सर्वात कुप्रसिद्ध हल्ला गझनीच्या मुहमदाने केला होता.

इसवी सनाच्या दहाव्या शतकात हा हल्ला झाला. काही इतिहासकारांच्या मते मुहमदाने मंदिराच्या विध्वंसाच्या आड येणाऱ्या ५० हजार भाविकांची कत्तल केली. शिवलिंगाचे नुकसान केले. अगणित संपत्ती गोळा केली. अस म्हणतात की मुहमदाच्या काळात हे मन्दिर लाकडी होते. त्याच्या विध्वंसा नंतर एका जैन राजाने दगडी मंदिराची स्थापना केली.

यापुढेही सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याचा सिलसिला चालूच राहिला. पण कोणी ना कोणी भारतीय राजाने त्याचे पुनर्निर्माण केले. या मंदिरातील संपत्तीचे मध्य पूर्वेतील आक्रमकाना आकर्षण होते. अल्लाउद्दिन खिल्जीने देखील सोमनाथ मधून बरीच संपत्ती नेली होती.

मध्यंतरी मुघल सत्ता आली. अकबराच्याकाळात मंदिरावरील हल्ले कमी झाले. 

पण कट्टर धर्माभिमानी औरंगजेबाने हा प्रकार परत सुरु केला. त्याच्या कारकिर्दीत मुघल सत्ता तिच्या चरमोत्कर्षाला पोहचली होती. दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजानी स्थापन केलेले मराठा साम्राज्य सोडले तर त्याला विशेष कोणी आव्हान उरले नव्हते.

याच औरंगजेबाने १६६९ साली काशीच्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस घडवून आणला. त्या जागी मशीद बांधली. १७०१ साली औरंगेजेबाने सोमनाथ मन्दिर असे फोडले की परत बांधताच येणार नाही. तेथील शिवलिंग सुद्धा गायब झाले. एकेकाळच्या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिमाखदार सोमनाथ मंदिराच्या जागी भग्न अवशेष उरले.

हा काळ भारतीय इतिहासातील काळा कालखंड.

मराठी सत्ता देखील संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सैरभैर झाली होती. तरी राजाराम महाराज आणि त्यांनंतर ताराराणी बाईसाहेब यांच्या काळात मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले होते. मराठ्यांच्या पुढे हात टेकून औरंगजेब बादशाह महाराष्ट्राच्या मातीतच मेला.

त्यानंतर हळूहळू मुघल सत्ता लयाला गेली. मराठी सत्ता बलशाली झाली. पेशव्यांनी अटकेपार पेशावर पर्यंत झेप घेतली. पण हिंदू धर्माच्या अभिमानाचे प्रतिक असणारी ही मंदिरे लढाईच्या धामधुमीत दुर्लक्षित राहिली. पानिपतच्या युद्धातील पराभवाने मराठ्यांना काही पाउले मागेच नेऊन ठेवले होते.

पण हा अपमान भरून काढून मराठी सत्तेला दिल्ली पर्यंत नेण्याच काम केल दोन महान वीरांनी. मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे.

मल्हारराव होळकरांनी काशीतील मशीद पाडून तिथे विश्वेश्वराचं मंदिर परत बांधायचा घाट घातला होता. मल्हाररावांकडे प्रचंड सैन्यबळ होते. मात्र काशीतील ब्राम्हणांनी “तुम्ही निघून जाल आणि पातशहा आमची कत्तल करेल’ अशी भीती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे गाऱ्हाणे घातले म्हणून ती मशीद मल्हाररावांनी पाडली नाही.

महादजी शिंदेनी तर मुघल बादशहाला नामधारी गादीवर बसवून लाल किल्ल्यातून अखंड भारताचा कारभार पाहिला. त्यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रयत्न केला. त्यांनी लाहोरच्या मशिदीवर लावलेले चांदीचे तीन दरवाजे उखडून आणले. अस म्हटल जायचं की हे दरवाजे सोमनाथ मंदिराचे होते. पण गुजरातमधील पुजाऱ्यांनी हे दरवाजे बसवू दिले नाहीत. पुढे हे दरवाजे शिंदेंच्या वंशजांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला लावले.

अखेर या दोन्ही महान सेनानींच स्वप्न पूर्ण केलं मल्हाररावांच्या सूनेनं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

अहिल्याबाईनी आपल्या इंदूर संस्थानातील प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले. रस्ते बांधले, धरणे बांधली, सुरु केल्या,विहिरी उभा केल्या. शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन अनेक कामे केली. मात्र त्या बरोबरच त्यांनी आपल्या राज्याबाहेर देखील अनेक कार्य केले. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली.

परकीय आक्रमणात मंदिरांचा झालेला विध्वंस त्यांना अस्वस्थ करून गेला.

देशभरातील बारा ज्योतिर्लिंग व इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले. त्यांनी हिंदू धर्मातील मानबिंदूना पुन्हा उभारण्याच काम हाती घेतले होते मात्र इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या नाही. उलट आपल्या कार्यातून त्यांनी लोकांना जवळ आणण्याचंच काम केलं.

याच सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर.

औरंगजेबाने हे मंदिर पाडून तिथे मशीद उभा केली होती. पण अहिल्यादेवीनी या मशीदीशेजारीच नवे भव्य मंदिर उभारले. काशीचा मुख्य समजला जाणारा मनिकार्निका घाट बांधला. पुढे शीख राजा रणजीत सिंहाने या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा पत्रा चढवला.
१७८३ साली भग्नावस्थेत असणाऱ्या सोमनाथच्या मूळ मंदिरासमोरच त्यांनी एक नवे मंदिर उभा केले. अस म्हणतात की भगवान सोमनाथाने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिले होते. सोमनाथ ज्योतिर्लिंगांची मातीत गाडली गेलेली मूळ मूर्ती त्यांना मिळाली व त्यांनी त्याची पुनर्स्थापना केली.
विशेष म्हणजे काशी विश्वनाथ व सोमनाथ या दोन्ही मंदिराच्या निर्माणावेळी तिथे मुस्लीम राज्य कर्त्यांचे शासन होते.
पण अहिल्यादेवींच्या मुत्सद्देगिरीमुळे कधीच जिर्णोध्दाराला अडथळा आला नाही. टिपू सुलताननेही अहिल्यादेवींना त्याच्याही राज्यात धर्मकार्ये करू दिली. एवढेच नव्हे, तर त्यांना “तत्त्वज्ञ महाराणी’ असेही संबोधले.

अहिल्यादेवीनी सगळ्या भारत भरात हे कार्य केले. अयोध्येत राम मंदिर बांधले, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, वेरूळ येथील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. केदारनाथ, रामेश्वर, मथुरा, प्रयाग येथे धर्मशाळा बांधल्या. नाशिक, पंढरपूर, जेजुरी येथे मंदिरे बांधली. पैठणला अन्नछत्र सुरु केले. कोल्हापूर, जगन्नाथपुरी येथील मंदिरासाठी पुजाअर्चेची व्यवस्था करून दिली.

महत्वाची बाब म्हणजे त्यांनी संस्थानाच्या पैशातून नाही तर वैयक्तिक संपत्तीतून दानधर्म केला. 

त्यांनी फक्त रया गेलेल्या तीर्थक्षेत्रांना उजाळाच दिला नाही तर शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. याच कारणामुळे त्यांना पुण्यश्लोक ही पदवी त्यांच्या जनतेने दिली.

आजही देशभरातील अनेक गावात, मंदिराच्या ठिकाणी अहिल्यादेवीनी केलेले कार्य मराठी माणसाची मान उंचावत उभे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.